वळू’, `विहीर’, `देऊळ’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करणारे श्री. उमेश कुलकर्णी यांनी पुण्यात येत्या जानेवारी महिन्याच्या (2013) पहिल्या आठवड्यात आरभाट निर्मितीतर्फे ’लघुपट निर्मितीसाठीची कार्यशाळा“ आयोजित केली आहे. या कार्यशाळेत लघुपटासंबंधीच्या सर्व गोष्टीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
लघुपट आणि चित्रपट यांच्यामध्ये `लघुकथा’ आणि `कादंबरी’ इतकाच मोठा फरक आहे. त्यामुळे एकाच पातळीवर त्यांची तुलना होवू शकत नाही म्हणूनच लघुपटासंबंधी आवश्यक त्या सर्व बाबींचे ज्ञान होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे श्री.उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. चित्रपटक्षेत्रात येवू पाहणाऱया उत्साही आणि हौशी तरूणांना ही कार्यशाळा म्हणजे एक सुवर्णसंधी असेल, असे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यशाळेत लघुपटाच्या निर्मितीबाबतच्या मुलभूत संकल्पने बरोबरच कथा, पटकथा, अनुवादाच्या संकल्पना, निर्मितीपूर्व आणि निर्मितीनंतरचे व्यवस्थापन तसेच कलाकार आणि बिगर कलावंतासमवेत साधला जाणारा संवाद, कर्मचारीवर्गाचे व्यवस्थापन आणि लघुपट महोत्सवाची तयारी आदी सर्व गोष्टीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही कार्यशाळा सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी खुली राहणार आहे. या कार्यशाळेत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून माहिती दिली जाईल.
नॅशनल फिल्म अरकाईव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड येथे ३, ४, ५ आणि ६ जानेवारी २०१३ रोजी कार्यशाळा भरविण्यात आली आहे.