MarathiBoli Competition 2016 – माय यात तुझी चूक काय?
आजही उभा आहे मी
शांत आणि हताश
काहीच नाही हाताशी
पण…माय यात तुझी चुक काय ?
वाढलो,बागडलो याच भूमीत
कसली,नांगरली ही तेवढ्याच कष्टानं
पण पावसानं दिला दगा
उरला नाही घास तोंडाचा
पण ….माय यात तुझी चूक काय ?
कर्ज काढलं माय तुझ्या भरवश्यावर
पोरांच्या शिक्षणासाठी
तेही आता फिटेनासं झालंय
पोरांच शिक्षण बंद पडून
दोन वेळचं जेवण मुश्किल झालयं
मेटाकुटिला येतो जीव
पोरांचा केविलवाणा चेहरा पाहून
आईच दुःखन बायकोचं जीव तुटनं
एक एक दिस उगवतो अन्
मावळतोही तसाच
पण …माय यात तुझी चूक काय ?
सोडून दयावसं वाटतं सारं
फासं लावून आत्महत्या करावी
पण…विचार येतो
तीच हिंमत या परिस्थितीशी
सामना करायला वापरावी
म्हणूनचं,
उठतो,सर्व त्राण विसरून
चालू लागतो,सर्व दुःख बाजूला सारून
हीच गाठ मनी बांधून की,
आपली माय आपल्या लेकराला
अस् वार् यावर सोडायची नाय
अन् तेच सांगतो तूला माय..
…यात तूझी काहीच चूक नाय !!!