Marathi Kavita – Rahatil Tuze Bhas Tari – राहतील तुझे भास तरी…
कवी – प्रा.संजय छबूराव शेळके.
रयत शिक्षण संस्थेचे,महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे 17
एकांत प्रेमाचा, आकांत हा झाला.
काय शोभा त्याला, आली आज.
जाणिवांचे धागे, तुटूनिया गेले
ऊगवुनी दिन, झाली सांज.
घेऊनिया जिने, गेलीस तु सखे
शब्द कसे मुके, राहतील.
जाणार्या त्या तुझ्या, बेबस पावली
सांज ओलावली, पाहतील.
पाहशिल तुही, स्वप्न प्रकाशाचे
चांदणे मनाचे, त्यात पडे.
पाहतांना जळी, तुच रूप तुझे
प्रतिबिंब माझे, त्यात दडे.
होतो मी वाटाड्या, तुझ्या वाटेतला
तुझ्या जगातला, प्रवाशीच
सोबती तु होती, तरीही एकला
मीच माझ्यातला, एक मीच.
चांदणे सखे ते, मावळून गेले
ऊठवाया आले, सुर्यंबिंब
प्रेम तुझे ओले, मनी पाघंरले
दुष्काळीही झाले, अंग चिंब
तुझ्यासाठी जिणे, विसरुन गेलो
शब्द विसरलो, माझे मीच
तुच विसरली, माझ्या मरणाला
आता सरणाचे, काय चीज
सुन्या या आभाळी, एकलाच मीही
आणि सोबतीही, रात्र सुनी
शांत केले मन, करुन चिंतन
तरीही जतन, प्रित जुनी
दाटतील मेघ, काळोख्या रात्रीला
विज चकाकेल, नभी खरी
विरुन ही जाईल, स्वप्न गडे माझे
राहतील तुझे भास तरी…..
राहतील तुझे भास तरी.
प्रा.संजय छबूराव शेळके.
रयत शिक्षण संस्थेचे,महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे 17
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-46/ […]