Marathi Story – कधी कधी माझं मला कळतच नाही …!

0
2467

Marathi Story – कधी कधी माझं मला कळतच नाही

Marathi-story-marathiboli

दोन दिवसांपासून डोळे चुरचुरत होते , मागच्यासारखे इन्फेक्शन झाले की काय ….? म्हणून लगेच दॄष्टि हॉस्पिटलला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन परस्पर ऑफिस सुटल्यावर जायचे नक्की झाले . संध्याकाळी ट्रेन मधून उतरले ती दवाखान्याच्या दिशेने जावे की नाही मी …. ? पण नाही … माघी गणपती निमित्त आमच्याकडे मोठी जत्रा भरलेली आहे …! जाता जाता ती जत्रा रस्त्यावरच! भरगच्च निरनिराळ्या वस्तु बांगड्या , क्लिपा , घरगुती उपयोगी सामान …. वा वा वा … मी तर नुसती खुष नाही ते सर्व पाहुन काय काय घेऊ नी काय नाही …. वेडी झाले नुसती …!! आणि मग झाली ना माझी शॉपिंग सुरु …!! हे घे … ते घे …अहं तेही घे … हं हे तर घेतलेच पाहीजे ! असं कसं हे पण घे … ! माझी शोप्पिंगबाई ऐकाला तयारच नाही …! अरे भैया ये क्या … कितना महाग देता है …! दुकानवाला एक किंमत सांगायचं माग मी मोठी हुशारच आहे टाटा बिर्ला थाटात बिजिनेस डील करुन ती वस्तु अर्ध्या किंमतीत मिळवायची …! (खरं तर त्याने मला उल्लू बनवलेले असणार ही शंका मध्येच चिमटा काढायची … ) मग , हं भैयाजी मुझे पता है ये वस्तु इससेभी सस्ती होगी नं ! आणि तो भैया दात निकालके मस्त हसला की समजायचं …! मै उल्लुही बनी थी …!!! पण तोपर्यंत पुढच्याच्या पुढ्यातल्या पायपुसण्या मला खुणवायच्या (खुणवायच्या की मस्तच भुलवायच्या …!!)

अशी खरेदी करत करत निघाले … आणि समोर दवाखाना दिसला …! दातांचा … !! आणि मला माझ्या डोळ्यांची आठवण झाली…. खरेदिला जरा आवरले. पर्स तपासली फक्त सातशे रुपये उरलेले …!! एव्हढयात माझा दवाखाना भागेल …? मनात मोठी शंका आणि हातात हे येवढे सामान घेऊन हॉस्पिटल मध्ये प्रवेश केला! माझ्याकडे जुनी फाईलही नव्हती ! हं नाव बोला … रिसेप्सनिस्ट माझ्या लहानग्या लेकीच्या मैत्रीणीची आईच होती . ( या बाईंशी मी तिची मुलगी माझ्या लेकिला मारते म्हणून भांडले होते ) अश्या ओळखीचा फायदा घेऊन त्या बाईंना जरा कचरत , थोड़े चाचरत तोंडभर हसु आणत “तुम्ही आर्याची आई नां ? हो ! आणि त्या मस्त हसल्या ! मग मी धीर करून विचारलेच ” किती फी होईल हो ?” त्यांनी न कळून … भुवया ताणुन डोळे मोठे करून … पाहिले . मग मी माझी शॉपिंग दाखवून … अहो लक्षात नाही राहिले हो मी दवाखान्यात निघाले आहे ते …! त्या सगळं समजून हसल्या .आणि विचारले , ” किती उरलेत ? सातशे !! ” मी उत्तर दिले, तीनशे कंसल्टिंग फी आणि औषधे होतील . ” डोळे तपासून मी बाहेर पडले.

फाईलवर डॉक्टरांनी औषधे लिहून दिली होती. समोरच्या मेडिकल मध्ये गेले , हसून विचारले , औषधोका कितना होगा ? त्याने हिशोब केला . ढाईसो …! म्हणजे आपले औषधांचेहि भागेल ! औषधे घेऊन परत निघाले … जत्रेतून… मघाशी अर्धवट सोडलेली बरणी … कपांचा सेट … खूणवलंच त्यांनी !! गेले आणि उरलेले सगळे रुपये संपवले … हा हा हा दिल खुष हो गया … !! ढीगभर पिशव्या , पर्स , फाईल कशातरी सांभाळत , सावरत … निघाले … !! आता घरापर्यंत स्पेशल रिक्शा करावी लागणार …!

आणि लक्षात आले रिक्शावाल्याला द्यायलाही पैसे उरले नव्हते …! तेव्हढ्यात एक ट्रेन आली … रिक्षेला गर्दी वाढायच्या आत रिक्शा पकडली . चार सीट मिळतात गर्दीत क्शावाल्यांना, मग आम्हा स्पेशल वाल्यांना कोण विचारतो … ?

रिक्शा ज़रा पुढे आल्यावर हळूच अतीव मायने रिक्शावाल्या दादाला बोलले , भाऊ … तुम्हाला माझ्या घराजवळ थोडवेळ थांबावे लागेल हं …. ! माझं वाक्यही धड़ पूर्ण होऊ न देता … मी असं बोलते नाही तर तो उसळलाच … ओ … काय पण तुम्ही ताई … आधी नाही का बोलायचं … धंद्याच्या टाईमाला खोटी करता माझी … ( तो सगळं न सांगताच समजला होता ! अशी त्याला उल्लू बनवणारी मी पहिलीच नसावी ) आता तुम्ही उतरणार कधी … वर जाणार कधी … आणि माझे पैसे देणार कधी ? फोन लावा फोन लावा घरी … खाली आणून देतील कुणीतरी पैसं ! “भाऊ, माझं घर वर नाही खालीच आहे !” पण नाही ओ घरी कोण पण नाही …!! पण मग तर तो जास्तच उसळला …. आणि त्याच्या दुप्पट त्याची रिक्शा उसळायला लागली ! आदळत आपटत फास्ट मध्ये कशीतरी रिक्शा घराजवळ आली . दरम्यान मी इथून तिथून पर्स मध्ये हात घालून चिल्लर गोळा केली … एखाद कागदी नोट … तीस रुपये त्याच्या हातावर ठेवले … ” भाऊ ” ! तुमचं नशीब चांगलं म्हणून मिळाले …! आणि मग तो शेवटचा उसळला “काय वो तुमी ताई …. फुकाट टेन्शन वाडीवला माझा , तुमचाबी नशीब चांगला म्हणून यवस्थित पोचल्या घरी…!! ख्या ख्या ख्या … !!! मी सेंकंदभर स्तब्धच ! , आणि मग मीपण ख्या ख्या ख्या … करीत रिक्षेतुन सामाना सहीत उतरले…! खरंच कधी कधी माझं मला कळतच नाही …!!!

“समिधा “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here