Marathi Story – Stravalya Bhavana Savalitun – स्त्रवल्या भावना सावलीतून..
लेखक – वैभव प्रदीप गिलाणकर
मध्यरात्रीच्या वेळी शारदाबाई जंगलाच्या अगदी मधोमध असलेल्या त्या तळ्याकाठी आल्या. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर विषण्ण भाव पसरले होते. थरथरत्या हाताने काठी धरत त्या कष्टाने तळ्याकाठी बसल्या, आपली पांढरी साडी त्यांनी अंगभर ओढून घेतली होती. तळ्याचं पाणी अगदी स्थिर होतं, जेव्हा शारदाबाईंच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्या पाण्यात पडले तेव्हाच कुठे तिथून अगदी सौम्य तरंग उठले पण अर्थात त्या दोन-चार अश्रूंच्या थेंबांमध्ये काही संपूर्ण तळ्यातलं निश्चल पाणी अस्थिर करण्याइतकी शक्ती नव्हती. ते पाहून शारदाबाईंनी दुःखाने सुस्कारा सोडून आपली नजर त्या पाण्यावरून वळवली, कारण त्या तळ्याचा तो निर्विकार, थंड (शांत नव्हे!) स्वभाव पाहून त्यांना आठवण झाली ती आपल्या पतीची, डॉ. शरद पांडेंची…
***
‘त्या’ जंगलातल्या आदिवासी वस्तीत एक महाभयंकर रोग पसरला होता. नुसत्या तापाचं निमित्त होऊन दिवसाला कमीत कमी दहा-बारा तरी आदिवास्यांचा मृत्यू व्हायचा. आधीच जंगलात उपजीविकेच्या साधनांची कमतरता, जिकडे तिकडे खुनी दरोडेखोरांचा सुळसुळाट अशा समस्यांनी त्रस्त असलेल्या आदिवास्यांमध्ये या रोगाने अजून दहशत पसरली.
शेवटी सरकारकडून परवानगी घेऊन ज्येष्ठ आणि प्रख्यात डॉक्टर शरद पांडे यांनी दोन महिन्यांपूर्वी जंगलातच एक छोटासा दवाखाना उघडला होता. त्याला लागून त्यांनी एक खोलीही बांधून घेतली व काहीच दिवसात ते आपल्या पत्नी शारदाबाईंना घेऊन तिथे राहायला आले.
डॉ. पांडेंनी जंगलात येताच अगदी निष्ठेने स्वतःला कामात गुंतवून घेतलं, आपल्याकडे आलेल्या रोग्यांवर ते विविध उपचार करुन पाहत होते, त्यांना योग्य ते पथ्यपाणी सुचवत होते. गरज भासल्यास मृत रोग्यांचं शवविच्छेदन करण्याचीही परवानगी त्यांनी मिळवली होती. त्यांच्या येण्याने परिस्थिती बरीच सुधारली म्हणूनच आदिवासीसुद्धा त्यांना लागेल ते सहकार्य करत होते. खरं तर, डॉ. पांडे आणि शारदाबाई दोघेजण वयाने वृद्धच होते पण डॉ. पांडेंनी आयुष्यभर याहीपेक्षा जास्त कठोर परिश्रम केले असल्यामुळे त्यांना जिथे फार काही सोयीसुविधा नाही अशा ठिकाणी राहणं विशेष त्रासाचं वाटलं नाही, शिवाय या कामासाठी त्यांना थेट सरकारकडून मिळणारे उत्तम वेतनही त्यांना उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देत होते पण शारदाबाई मात्र आता वृद्धपकाळाने थकलेल्या होत्या. मात्र डॉ. पांडेंची अपेक्षा अशी होती की शारदाबाईंनी विनातक्रार या कामात सहभागी व्हायलाच पाहिजे कारण यातून सेवा घडणार होती आणि अर्थात, नंतर प्रतिष्ठाही प्राप्त होणार होती. ते शारदाबाईंना उपचारात वापरलेली भांडी, कधी कधी रक्ताळलेली फडकी धुवायला सांगत. डॉ. पांडेंना असं वाटत होतं की पत्नीने पतीची सावली होऊन राहिलं पाहिजे, शारदाबाईंनाही पत्नीने सावलीप्रमाणे पतीची सोबत करावी हे मान्य होतं, पण पतीने पत्नीला अक्षरशः सावलीप्रमाणे पायाला लावून जिथे तो जाईल तिथे फरफटत न्यावं आणि सदैव दुर्लक्षित ठेवावं हे मात्र त्यांना मान्य नव्हतं तरीही त्यांच्या विरोधाचा काहीही परिणाम होणार नाही हे जाणून शारदाबाईसुद्धा स्वतःच्या अंगदुखीकडे दुर्लक्ष करून निमूटपणे सगळी कामं करत. त्यांना आता डॉ. पांडेंच्या वैद्यकीय व्यवसायाशी असलेल्या एकनिष्ठतेचा कंटाळा आला होता आणि तसंच मनापासून काळजीही वाटत होती. दिवसभर घरात रोग्यांचा घोळका जमलेला, डॉ. पांडे सदैव त्यांच्या सहवासात यामुळे शारदाबाई त्यांना समजावायच्या कि,
“उपचार करताना तुम्ही स्वतःसुद्धा खबरदारी घेत जा, नाहीतर ह्या रोगट लोकांचा वणवा एके दिवशी तुम्हालाच केव्हा प्राणघातक दाह देईल हे सांगता येत नाही…”
पण डॉ. पांडेंनी औषधांच्या बाटल्या निरखत थंडपणे सुस्कारा सोडला,
“एवढी वर्षं माझ्यासोबत राहूनही तू असा विचार करत असशील तर खरंच मला कीव करावीशी वाटते तुझी. असो, या औषधांच्या बाटल्या नीट लावून ठेव” आणि ते परत आपल्या दवाखान्याच्या खोलीत गेले. डॉ. पांडेच्या या रुक्ष, निर्विकार स्वभावात झिरपून ओलावा निर्माण करू शकेल इतकी शक्ती एवढ्या वर्षांनंतरही शारदाबाईंच्या स्त्रवणाऱ्या भावनांमध्ये आली नव्हती. पण शेवटी शारदाबाईंची भीती खरी ठरली…
एके दिवशी सकाळी डॉ. पांडे खोलीतून बाहेर का आले नाही हे पाहायला शारदाबाई गेल्या. पलंगावर झोपलेल्या डॉक्टरांना उठवण्यासाठी हात लावताच त्यांच्या तप्त अंगाचा स्पर्श लागून त्या दचकल्या. डॉ. पांडे झोपेतच जखमी जनवरासारखे कण्हत होते, त्यांची अवस्था पाहून शारदाबाई घाबरून गेल्या पण लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं. आजपर्यंत त्या डॉ. पांडेंची सावलीच झाल्या होत्या, त्याचा आता त्यांना उपयोग होणार होता. या रोगावर उपचार करताना त्यांनी डॉक्टरांना अनेकदा पाहिलं होतं, त्याचीच उजळणी करून त्यांनी डॉक्टरांची दिवस-रात्र सेवा करायला सुरुवात केली पण त्यांना याचं भान नव्हतं कि एकदा काळ आला कि तो जीवाभोवती मृत्यू कोष विणतोच –
***
शारदाबाईंच्या मनाचा स्मृतीसरितेतून चालणारा हा प्रवास एकदम थांबला कारण त्यांना तळ्याजवळच्या झाडींमध्ये सळसळ ऐकू आली. त्यांनी त्या दिशेला पाहिलं तर एक मानवाकृती सावली त्यांना झाडींमध्ये उभी दिसली; त्या सावलीच्या हातातल्या कुऱ्हाडीचं पातं चंद्राच्या प्रकाशाने अंधारातही लखलखत होतं. रात्रीची हीच वेळ जंगलातल्या खुनी दरोडेखोरांची अंधारातून बाहेर येण्याची वेळ होती हे शारदाबाईंना आठवलं. गळ्यात चमकणाऱ्या सोन्याच्या मंगळसूत्रावर आपोआप त्यांचा हात गेला. त्यांनी पाहिलं, ती मानवाकृती आता हळूहळू झाडींमधून बाहेर येत होती. आवंढा गिळून शारदाबाई काठीच्या आधाराने एकदम उठल्या आणि घराकडे जाण्याचा रस्ता त्यांनी धरला. मागून वाळक्या पानांवर, खड्यांवर पडणारी संथ पावलं त्यांना जशी ऐकू येऊ लागली तसा त्यांनी चालण्याचा वेग वाढवला, मागून येणारी पावलंसुद्धा वेगाने जवळ येऊ लागली. मग शेवटी शारदाबाई भरभर चालत “डॉ. पांडे चिकित्सालय” अशी पाटी लावलेल्या, हिरव्यागार दाट झाडींनी वेढल्या गेलेल्या छोट्याशा खोलीजवळ आल्या व त्यांनी भराभर बंद दारावर थाप मारायला सुरुवात केली. मागून येणारी दरोडेखोराची ती मानवाकृती आता पळतच त्यांच्या दिशेला येऊ लागली! शारदाबाईंनी शेवटी दारावर हातातल्या काठीनेच कर्कश्श आवाज होईल असे प्रहार केले आणि तेव्हाच मागून पळत येणाऱ्या त्या आडदांड दरोडेखोराने हातातली कुऱ्हाड समोर फेकली!
शारदाबाई दरवाज्यासमोरून बाजूला सरल्या आणि जसा डॉ. पांडेंनी दरवाजा उघडला, त्यांना काही कळायच्या आतच “घप्प!!”, असा आवाज करून त्या छोट्याशा कुऱ्हाडीने त्यांची छाती फाडून आतल्या आत हृदय छेदलं!
शारदाबाई निर्विकार भावनेने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पतीचा देह नुसत्या बघत उभ्या होत्या.
तो दरोडेखोर दबकत दबकत त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याने पाहिलं, डॉ.पांडेंच्या फाटलेल्या छातीतून ऊतू जाणाऱ्या ऊन रक्ताचा पाट शारदाबाईंच्याजवळ जाताच बर्फासारखा गोठून गेला आणि हे पाहताच त्या दरोडेखोराच्या रापलेल्या चेहऱ्यावर भयाचा थर चढला.
“तुझं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये”, शारदाबाईंचे कठोर शब्द ऐकू येताच तो भानावर आला, “मी सांगितल्याप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाटही लावायची आहे, लक्षात आहे ना? आत जा.”
त्याने थरथरत मान डोलावली व डॉ. पांडेंचा निष्प्राण देह ओलांडून तो आतल्या शवविच्छेदनाच्या खोलीत गेला. रोगाने मेलेल्या आदिवास्यांच्या मृतदेहांमधून त्याला शारदाबाईंचा फिकट, पिवळसर झालेला देह ओळखायला वेळ लागला नाही, त्याने तो उचलून बाहेर आणला आणि काहीच वेळात आसपास पडलेल्या लाकडांची एक चिता रचून त्यावर ठेवला. हे सगळं करून तो परत शारदाबाईंजवळ येऊन उभा राहिला. शारदाबाईंनी प्रथम आपलं मंगळसूत्र त्या दरोडेखोराच्या हातात दिलं, त्यांच्या काटक पण थंड हाताचा अगदी सौम्य स्पर्शही त्या दणकट पुरुषाला जीवघेणा वाटला.
“याचे चांगले पैसे मिळतील. आता जा आणि जाण्याआधी चिता पेटव”, त्या म्हणाल्या. दरोडेखोराने चितेला अग्नी दिला आणि मग मात्र तो तिथून जीव मुठीत घेऊन पळून गेला.
शारदाबाई अजूनही आपल्या पतीच्या निष्प्राण देहाकडेच पाहत होत्या, एक हुंदका देऊन त्या म्हणाल्या,
“रोगात तुमची सेवा करून मी तुमच्याभोवती विणला जाणारा मृत्यूचा कोष फक्त काढलाच नाही, तर त्या दिवसांत तो स्वतःभोवतीही पांघरला जात होता याचीसुद्धा पर्वा केली नाही. पण… पण तुम्ही… कामाशी एकनिष्ठ राहून मी जिवंत होते तेव्हा माझ्या मनाची विटंबना तर केलीच पण मेल्यानंतर माझ्या देहाचीही विटंबना केलीत? साधा अग्निसंस्कारही केला नाहीत? त्यामुळे आयुष्यभर तुमच्यामागे चिकटलेल्या या सावलीला मृत्यूनंतरही जीवाची एक अशांत छाया बनूनच या अभद्र जागेत अडकून राहावं लागलं… पण शेवटी अन्याय असह्य झाल्यावर सावलीलाही कळतं की मुक्त होण्यासाठी आपल्या कृतघ्न धन्याचे पाय कापल्यावाचून पर्याय नाही…”
सकाळपर्यंत चितेतली सर्व लाकडं जळून मागे फक्त आकाशापर्यंत जाणारा धुराचा स्तंभ शेष राहिला होता आणि त्यातल्या शवाची राख हवेच्या फुंकरीने मुक्त होऊन चोहीकडे उडत होती.
समाप्त