असंही एक लॉक डाऊन – Marathi Story

1
338
Marathi Story – Asahi Ek Lockdown – असंही एक  लॉक डाऊन

Marathi Story – Asahi Ek Lockdown – असंही एक  लॉक डाऊन

लेखक – श्रीपाद टेंबे

सकाळी सकाळी गावात पेपर आला आणि सगळीकडे एकच धांदल उडाली. दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरात  त्याचबरोबर देशाच्या इतर भागात कसलं तरी वेगळेच संकट आले आहे.  या संकटामुळे हजारो माणसं मृत्युमुखी पडले आहे अशी काहीतरी बातमी होती. आणि म्हणूनच सरकारने संपूर्ण देश बंद केला आहे . ही बातमी  गावात वाऱ्यासारखी पसरली आणि आता कुठे उघडलेली दुकानं पुन्हा बंद झाली.सोबत कायम गजबजलेले रस्ते देखील अर्ध्या तासात रिकामे झाले.

इकडे शिरप्या आपली न्याहारी संपवत आला होता.खाणे संपवून लगेचच शामा पहेलवान कडे जाऊन मस्त पैकी गप्पा करायचा. आणि मग पुन्हा पोटात कावळे ओरडू लागले की घरी जेवायला यायचा.त्याच्या डोक्यात एक छान कल्पना घोळ घालत होती. त्यांनी हात धुवून ते आपल्या शर्टाच्या बाह्यांना  पुसले.तो घरातून बाहेर पडायच्या तयारीतच होता. तेवढ्यात त्याची बायको घरात शिरली.

“कुठे निघाले सकाळी सकाळी ? हादडून झालं की निघाले आपले गावभर उंडारायला. कामधंदा काही  करायचा नाही, नुसते खायला काळ आणि भूमीला भार”. चंपाने खड्या आवाजात विचारलं.

खरं तर चंपा सकाळी गावातील इतर बायांच्या सोबत पाटलाच्या शेतावर कामाला गेली होती. तिला घरी यायला अजून वेळ होता.पण तिला लवकर आलेलं पाहून शिरप्याला आश्चर्यच वाटलं.

“तू एवढ्या  लवकर आली पण” ? शिरप्याने विषय बदलण्याचा  प्रयत्न केला.

“हो आत्ता तुम्ही पण घरातच बसा. कोणतीतरी कोरोना कां मरोना महामारी आली आहे, म्हणून सरकारने देशातील सगळा व्यापार बंद करून जनतेला घरातच बसायला सांगितले आहे’. शेतातून आणलेली भाजी बाजूला ठेवत चंपाने एका दमात सिरप्याला सांगितले.

कसलं संकट, कसली बंदी आणि कसली महामारी आणि ते आपल्याच गावात कां? असे अनेक प्रश्न शिरप्याच्या मनात एका मिनिटात येऊन गेले. परंतु त्याची उत्तरे मिळवण्यासाठी त्याला घराबाहेर पडणे आवश्यक आहे हे त्याला चांगलंच माहित होतं.

“बरं बरं त्या कोरोनाला बघतो मी, तू आपली दुपारच्या जेवणाची तयारी कर”. चंपाला उत्तर देत शिरप्या पायात आपली चप्पल घालत घराबाहेर पडला देखील.

तो घरातून निघाला खरा पण रस्त्यावर एक काळ कुत्रं सुद्धा नजरेस पडले नाही. एकदम भयाण शांतता आणि निर्मंनुष्य रस्ता शिरप्याने त्याच्या अख्या जिंदगीमध्ये बघितला नव्हता. हा पण मागे तीन वर्षापूर्वी दादा पाटील गेले तेव्हा गावतील सगळा बाजार बंद जरूर होता पण लोकांची वर्दळ चालू होती. दादा पाटलासारख्या देवमाणसासाठी गाव बंद असणे एकवेळ साहजिक आहे, पण  आज गावात सगळं काही ठीक असतांना असं भकास गाव बघून शिरप्या चांगलाच विचारात पडला होता. त्याचं डोकच चालत नव्हतं. तसं त्त्याला नव्ह्तही म्हणा. एकुण काय वातावरण बघून शिरप्या चाट पडला होता हे नक्की.

शिप्याचा एक खास माणूस होता जो गावात नक्की काय घडलं आहे याची माहिती देऊ शकतो. तो म्हणजे त्याचा मित्र बबन, बबन न्हावी . गावातल्या मुख्य चौकात बस स्टॉपला लागून बबन आपलं टपरीवजा दुकान चालवत होता. साधारणपणे  चाळीस एक वर्षे जुनं होतं दुकान . प्रथम बबनचे आजोबा नंतर बबनचे वडील आणि त्यांच्या नंतर बबन अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या धंद्यात लोकांची यशस्वीपणे हजामत  केली गेली. गोड आणि बोलघेवड्या  स्वभावामुळे तो समोरच्या माणसाच्या मनातील सगळी माहिती काढून घेण्यात तरबेज होता. एकंदरीत बबन चांगलाच लोकप्रिय होता. गावात आणि देशात नेमकं काय घडलं आहे  किंवा काय चाललंय याची सगळी माहिती बबनकडे असलीच पाहिजे  आणि तोच आपल्याला नक्की माहिती देऊ शकतो  असा शिरप्याचा अंदाज होता.

गावात नेमकं कोणते संकट आले असेल याचे वेगवेगळे अंदाज बांधत शिरप्या बबनच्या दुकानासमोर येऊन पोहचला. चौकातल्या इतर दुकांनाप्रमाणेच त्याला बबनचे दुकान देखील बंद दिसले. चौकात असलेली पूर्ण सामसूम बघून शिरप्याला प्रकरण एकदम गंभीर असल्याची खात्री पटली. कदाचित आपल्या देशाने शेजारच्या राष्ट्रासोबत युद्ध पुकारलं असून  आपल्या गावाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून  सरकारने गावाच्या ग्रामसेवकाला पत्र पाठवून गाव काही दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले असतील अशी पुसटशी शंकाही त्याच्या मनात येऊन गेली. पण खात्रीशीर माहिती मिळण्यासाठी बबनची भेट होणे अतिशय गरजेचं होतं. चौकातून दहा मिनिटाच्या अंतरावर त्याचे घर होतं. आणि यावेळेला तो घरीच असला पाहिजे असा अंदाज मनाशी बांधून त्याने चौकातुन त्याच्या घराची वाट धरली.

शिरप्या बबनच्या घरी पोहचला तेव्हा गावातील बरीचशी मंडळी अगोदरच त्याच्या घरी जमा झालेली दिसत होती. शिरप्याला त्या गर्दीत तिथेच एका कोपऱ्यात त्याचे रोजचे मित्र नाम्या आणि पक्या देखील दिसले. त्यांना पाहून शिरप्याला जरासं हायसं वाटलं. परंतु ते दोघेही आपल्याला न सांगता परस्पर बबन्याकडे आले याचं थोडंस वाईट देखील वाटलं.

बबनच्या घराच्या अंगणात सर्वजण घोळका करून उभे होते. शिरप्याने सगळ्यांच्या चेहऱ्याकडेएक नजर टाकली. आणि त्याला ताबडतोब जाणवलं की सगळेचजण त्याच्या इतकेच घाबरलेले आहेत. शिरप्याने लगबगीने पुढे जाऊन त्या गर्दीमध्ये सामील झाला.  थोड्याच वेळात बबनने आज गावावर नेमकं काय संकट आलेले आहे याची माहिती द्यायला सुरवात केली. बबनने सांगितलेली माहिती म्हणजे दुकानात त्याला वेगवेगळ्या लोकांकडून मिळालेल्या माहितचं तिखट मीठ मसाला लावलेलं मिश्रण होतं. बबनच्या प्रत्येक शब्दागणिक गर्दीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील काळजी वाढतच होती.शेवटी आपल्यावर सोपवलेली एक महत्वाची कामगिरी पार पडल्याचे  भाव चेहऱ्यावर आणत बबनने आपलं शेवटचंवाक्य संपवलं आणि तो तडक आपल्या घरात निघून गेला. बबन घरात जाताक्षणीच त्याच्या घराजवळ जमलेली गर्दी देखील पांगली.आणि आता बाहेर शिरप्या, नाम्या आणि पक्या फक्त शिल्लक राहिले होते.

एकंदरीत बबनने त्याला निरनिराळ्या लोकांकडून मिळालेली माहिती बाहेर उभ्या सगळ्यांना ऐकवली होती. त्या माहितीचा सारांश थोडक्यात या तिघांनी असा काढला की शेजारच्या कुठल्यातरी राष्ट्राने आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी कोरोना व्हायरस असं विचित्र नाव असलेल्या माणसाला आपल्या देशात रोगराई पसरविण्यासाठी पाठवलं आहे. बबनने दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस नावाचा माणूस कमीजास्त दिसायला आपल्यासारखाच असून तो एखाद्या माणसाच्या जवळ जाऊन त्याला खो देतो. खो मिळालेला माणूस काही वेळाने आजारी पडून अंथरुणाला खिळतो, आणि चार पाच दिवसातच त्याचा आत्मा अनंतात विलीन होतो. या व्हायरस नावाच्या क्रुर माणसाने देशात आतापर्यंत हजारो निष्पाप जीवांचे बळी घेतले असून सरकारकडे किंवा पोलिसांकडे त्याला पकडण्यासाठी कोणताच उपाय उपलब्ध नव्हता. त्यामुळे  सरकारने ताबडतोब देशातील वाहतूक, उद्योग व्यापार ,शाळा कॉलेज बंद केल्याचे  आणि देशातील सगळ्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर न पडण्याचा  आदेश जारी केला आहे.घाबरून जाऊन लोक हळूहळू घरातच राहिली, आणि त्यांच्या गृहोद्योगामध्ये व्यस्त झाली. बाहेर रस्त्यावर दोन पायाचा माणूस नावाचा प्राणी सोडून इतर सगळे चार पायाचे प्राणी अधूनमधून गावात सभा घेवू  लागले.  त्यामुळे त्या कोरोना व्हायरस नावाच्या माणसाला पकडायला किंवा मारायला एकही माणूस सापडेनासा झाला.

दोन दिवसांनतर आलेल्या सरकारच्या माहिती प्रमाणे तो व्हायरस आपल्याच गावाकडे यायला निघाला असून तो केंव्हाही आणि कोणत्याही क्षणी आपल्या गावात पोहचू शकतो. म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी गावचे सरपंच मरतुकडे पाटील यांना फोन करून  ताबडतोब गाव बंद करा असा आदेश दिला. बबनचे बोलणे ऐकून आपल्या गावावर एक भीषण संकट आले आहे किंवा येणार आहे याची तिघांचीही खात्री पटली. काहीशा चिंतातूर मुद्रेने तिघेही एकमेकांशी काहीही न बोलता बबनच्या घरून निघाले आणि थोड्याच अंतरावर असलेल्या पक्याच्या घर्री जाऊन बसले.

“मी तुला सांगतो हा व्हायरस का फायरस  नावाचा माणूस नक्कीच शेजारच्या राष्ट्रामधून आला असेल बघ. कारण त्या देशातील लोक फारच दुष्ट म्हणजे अगदी राक्षसासारखे असतात’. पक्याने बसल्या बसल्या विषयाला तोंड फोडलं.

त्याला उत्तर देतांना नाम्या म्हणाला, “’तो कोणत्यापण देशातून येवू दे , त्याला आपल्या गावात येण्यापासून कसं थांबवायचंयाचा विचार पण केला पाहिजे . काय शिरप्या, बरोबर आहे  ना माझं म्हणणे”?

शिरप्या कसल्यातरी विचारात मग्न झाला होता. ” होय गड्यांनो आपल्याला या व्हायरसला थांबवायला हवं हे नक्की. असं किती दिवस आपण सगळ्यांनी घरात बसून राहायचं. महत्त्वाचे म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये शेजारच्या बोरगावात जत्रा आणि तमाशाचा फड रंगणार आहे. तो इतके वर्ष चुकवला नाही आणि आता या वर्षी त्या व्हायरसपायी कशाला चुकवायचा”.  शिरप्या वैतागून म्हणाला.

त्या दोघांकडे काहीशा रागाने बघत पक्याने आपली कैफियत मांडली. तुम्हाला तमाश्याची काळजी पडली आहे. आणि माझ्या घरात खायला धान्य नाही. घरात बसून राहिलो तर माणसाने खायचं काय”?

पक्याच्या बोलण्यात तथ्य होत.  गावातले अर्धेअधिक रोजंदारीवर आपला संसार रेटत होते. शेतीचे काम नसायचे तेंव्हा तालुक्याच्या गावाला मिळेल ते काम करून पोटापुरते मिळवायचे. आणि बहुतेकांनी गावातील सावकाराकडून पैसे व्याजाने उधार घेतले होते. ते कर्ज किंवा उधारी फेडण्यासाठी कामधंदा तर करावाच लागणार होता.

पुढचा अर्धा एक तास तिघांनी एकमेकांना आपापल्या समस्या सांगितल्या.पक्याची बायको जवळपास पाच वर्षानंतर माहेरी जाणार होती, आणि तिच्या भावाच्या लग्नाच्या निमित्ताने चांगली महिनाभर राहणार होती. पण गावावर एवढं मोठं संकट येणार आहे म्हणून तिने माहेरी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. पक्याने गावात काहीतरी उद्योगधंदा सुरू करावा या हिशोबाने दोनच आठवड्यापूर्वी तालुक्याच्या बँकेत अर्ज केलेला होता. त्या बँकेच्या बाबुला आणि साहेबाला चहा पाण्याचा खर्च दिला असल्यामुळे त्याचे कर्ज प्रकरण मंजूर व्हायच्या मार्गावर होते. पण आता या व्हायरसच्या संकटामुळे आता घरातच बसावं लागणार होतं. नाम्याचा असा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता, पण आता चुपचाप घरातच बसावं लागणार आहे या विचारानेच तो वैतागला होता.

थोडक्यात आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आणि गावाला या संकटातून वाचवावं लागणार आहे या निष्कर्षाप्रत तिघेही आले. परंतु मुख्य अडचण अशी होती की करायचं तर नक्की काय करायचं हे तिघांनाही माहित नव्हते. हा कोरोना व्हायरस दिसतो कसा, चालतो कसा, रंगाने काळा की गोरा या संदर्भात बबनने काहीच सांगितले नव्हते. एक नक्की होतं की या व्हायरसने आतापर्यंत हजारो माणसांचा बळी घेतला होता, त्यामुळे तो निश्चितच अंगापिंडाने मजबूत आणि उंचपुरा असला पाहिजे असं मत शिरप्याने व्यक्त केले. तर नाम्याच्या म्हणण्यानुसार तो वेगवेगळे मुखवटे घालत असावा त्यामुळे कदाचित पोलीसांची यंत्रणा अजूनपर्यंत पकडू शकली नाही. थोडक्यात काय तर कानुनके  हाथ लंबे वगैरे काही नसतात .कानुनके हाथ जर लंबे असते तर आज एवढे लोक लंबे कसे काय होऊ शकतात.. एकंदरीत काम जबाबदारीचं आणि जोखमीचं असल्यामुळे ते काळजीपूर्वक आणि नीट पार पाडणे गरजेचं होतं.

बराच वेळ काथ्याकूट केल्यावर शिरप्याने पुढाकार घेतला आणि ठरवलं की रोज सकाळ,दुपार,संध्याकाळ आणि रात्री गावात गस्त घालायची. गावात कोणत्याही नवीन माणसाला येऊ द्यायचं नाही. गावातील प्रत्येक माणसाच्या हालचालीवर, बोलण्यावर बारीक लक्ष ठेवायचं. रोज जर असं लक्ष ठेवलं तर गावात व्हायरस आला रे आला की लगेच पकडून त्याला तालुक्यावरून पोलीस येईपर्यंत चौकातील झाडाला बांधून ठेवायचं. मग सरकारने जे काही त्या व्हायरसला पकडण्यासाठी बक्षिस ठेवलं आहे त्याची  आपसात समान वाटणी करायची.

शिराप्याने आपला हा प्लॅन नाम्या आणि पक्याला सांगितला. अर्थातच त्या दोघांना या प्लॅनवर आक्षेप असण्याचंकाहीच कारण दिसत नव्हतं. पण एवढी मोठी जबाबदारी केवळ या तिघांकडून पार पडण्याची शक्यता कमीच होती. त्यासाठी आणखीन काही गावकऱ्यांची मदत लागणार होतं. मग त्या तिघांनी ठरवलं की गावातील किमान दहा पंधराजण या गस्त घालणाऱ्या पथकामध्ये सामील करायचे म्हणजे त्या व्हायरसला पकडणे अधिक सुलभ होणार होतं. मग ठरल्याप्रमाणे तिघेही गावातील प्रत्येक घरी गेले. प्रत्येक घरात जाऊन शिरप्याने आपला प्लॅन समजावून सांगितला. एक दोन चार घरे वगळता सर्वांनाच यांनी तयार केलेली योजना पटली.  योजना पटण्यासारखीच होती. असं किती दिवस घरांत बसायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता. रोज सगळ्याचं काहीना काही बाहेर कामे असायचीच. त्यामुळे हो नाही म्हणत बारा तेराजण या गस्ती पथकात सामील झाली. शिरप्याचे हे व्हायरसला पकडण्यासाठी तयार केलेल्या गाव संरक्षक  पथक तयार होईपर्यंत संध्याकाळ झाली . पुढे कसं करायचं  आणि कोणी गस्त घालायची याची सगळी माहिती देण्यासाठी शिरप्याने गावच्या मारुती मंदिरात पहिली सभा आयोजित केली.

नदीकाठच्या मारुती मंदिरात संध्याकाळी सहा वाजता गावकऱ्यांची बरीच गर्दी जमली होती. यामध्ये शिरप्या,नाम्या, पक्या  आणि गस्ती पथकात सामील झालेली तरुण पोरं देखील हजर  होती. बाकीचे गावकरी गावात कोणता नवीन उपक्रम सुरु होतो आहे, हे जाणून घेण्यासाठी जमले होते. काहीजण घरात बसून बसून कंटाळली होती, म्हणून हातपाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले होते. सगळ्यांना शांत बसण्याची विनंती करून शिरप्याने सभेला सुरवात केली. गावात येण्यापासून व्हायरस नावाच्या माणसाला कसं थांबवायचं याचा मजबूत प्लॅन तयार होताच. गावची एक बाजू डोंगराने  आणि दुसरी बाजू नदीने वेढलेली होती. त्यामुळे या दोन बाजूंनी कोणी गावात येण्याची शक्यता धूसर होती. उरलेल्या दोन्ही बाजूला गाव संरक्षण पथक दररोज गस्त  घालेल. तीन तीन जणांचा गट तयार करून सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र गस्त घालणार होते. सोबत स्वत:च्या संरक्षणासाठी लाठ्याकाठ्या वापरायच्या यावर सगळ्यांचे एकमत झाले. एकंदरीत सभा उत्साहात पार पडली. आणि गावाचे गाव संरक्षण पथक तयार झाले.

दुसरा दिवस उजाडला . सकाळी सात वाजता ठरल्याप्रमाणे पथकाचे सगळे सभासद पुन्हा एकदा मारुतीच्या मंदिरात लाठ्याकाठ्या घेऊन आले. शिरप्याने तिघा तिघांचे गट बनवून त्यांना जागा ठरवून दिल्या. आणि उरलेले काहीजण गावातच घरोघरी फिरून लोक घरातच राहतील याची काळजी घेणार होते. कोणत्याही बाहेरच्या माणसाला गावात प्रवेश द्यायचा नाही असं एकमतान ठरलं. या व्हायरस माणसाकडे चेहरा बदलण्याची शक्ती असू शकते अशी शंका असल्याने कदाचित तो एखाद्या आपल्या ओळखीच्या माणसाचं रूप धारण करून येऊ शकतो. त्यामुळे बाहेरच्या कोणालाही  गावात येऊ द्यायच नाही आणि गावातील गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणालाच गावाबाहेर जावू द्यायच नाही. असं शिरप्याने सगळ्यांना आवर्जून बजावलं.

गाव संरक्षण पथकाचा पहिला दणका बसाल तो पांडू गवळ्याला. पांडू नेहमीप्रमाणे गावात दुध टाकायला शेजारच्या गावातून येत होता. परंतु त्याला गस्तीवरच्या गटाने गावाचं वेशीवरच अडवलं. गस्त घालणाऱ्या पोरांच्या हातात लाठ्याकाठ्या बघून बिचारा पांडू गावाच्या वेशीवरूनच मागे फिरला. अगदी हाच प्रकार पेपर टाकणाऱ्या गोपाळच्या आणि भाजी विकणारी गंगूबाईच्या बाबतीत घडला. एकंदरीत गाव संरक्षण पथकाने आपले काम जोमाने सुरु केलं होतं.गाव संरक्षण पथकाचे गस्तीचे कामं हे असं  सुरु होऊन चार-पाच दिवस पार पडले होते. एवढे दिवस गावातील लोकांनी दुध, भाजीपाल्याशिवाय काढले. शिरप्या, नाम्या, पक्या आणि त्यांच्या गस्त पथकातील दहा-बारा मंडळींनीसुद्धा न कंटाळता आणि थकता आपले काम चोख बजावत होते.

साधणपणे एक आठवड्यानंतर या अघोषित कैदेला गावातील सगळेच कंटाळून गेले.  हळूहळू गावातील मुलंक्रिकेट खेळायला बाहेर रस्त्यांवर उतरली. बायका किती दिवस चूप राहणार ! अगदी असह्य झाल्याने त्या देखील गप्पा मारायला बाहेर पडू लागल्या. म्हातारे व इतर लोकं देखील आपापल्या अड्डयांवर जमू लागले. पण गस्त घालणाऱ्या पथकाने आपल्या जवळ असलेल्या लाठ्यांचा धाक दाखवून त्यांना घरात बसवण्याचा प्रयत्न देखील केला. पण त्या लोकांमध्ये कोणाची आई, बहिण, वडील भाऊ, तर रस्त्यावर खेळणारी त्यांचीच मुलं होती. एकंदरीत आता गावकऱ्यांचा धीर सुटत चालला होता हे मात्र नक्की. पण खरी गम्मत पुढेच होती. एक दिवस स्वत: शिरप्या गावाच्या वेशीवर गस्त घालत होता. तालुक्याच्या गावातून गावच्या सरपंच्याकडे त्यांचे पाहुणे त्यांना महत्वाच्या कामासाठी भेटायला म्हणून आले होते. ठरलेल्या नियमाप्रमाणे शिरप्याने त्यांना गावात प्रवेश नाकारला. पण पाहुणे देखील इरेला पेटले होते, त्यातून ते सरपंचांना भेटायला लांबून आले होते. प्रकरण खूपच हातघाईवर आले. दोघांची बाचाबाची होवून मारामारीपर्यंत आले. त्या तुंबळ युद्धात पाव्ह्ण्यांना काठीचा निसटता प्रसाद पण मिळाला. शिरप्याने आपल्या गस्ती पथकातील बाकीच्या साथीदारांना देखील मदतीला बोलावले तेव्हा सगळा तामझाम बघून पाव्हणे मनातून किंचित हादरलेच. जास्तीचा तमाशा नको म्हणून त्यांनी आपल्या घरी जाणारी वाट पकडली. ते तर बरं झालं गावचे सरपंच मरतुकडे त्या दिवशी गावात नव्हते पण गावातील लोकांना दोन तीन दिवस रवंथ करायला एक विषय मिळाला.

असेच दोन आठवडे पार पडले. आता मात्र गावकरी खरंच कंटाळले होते. घरातील रेशनपाणी संपत आलं होतं, सोबतच जवळ असलेले पैसे देखील संपले होते. घरातील धान्याचा साठा संपत आला होत. मुलांच्या  शाळा बुडत होत्या. बायका घरात नवऱ्याशी रोज भांडून वैतागल्या होत्या कारण त्यांच्या नवऱ्याच्या वागण्यात काहीच सुधारणा दिसून येत नव्हती. म्हाताऱ्या लोकांकडे फक्त झोपून राहणे एवढाच पर्याय शिल्लक राहिला होता. त्यामुळे त्यांना बऱ्याचवेळी थोडं देखील खट् झालं तर पुष्पक विमान आल्यासारखे वाटायचे, आणि त्यामुळे काही काळ घरातील वातावरण गंभीर असायचे. काही वेळाने खोकल्याची उबळ आल्यावर वातावरण सुरळीत व्हायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पंधरा दिवसात व्हायरस का कोण तो आलाच नव्हता. त्यामुळे आता घराबाहेर पडायला काही हरकत नाही असं गावकऱ्यांच म्हणणं होतं. पण शिरप्या आपल्या म्हणण्यावर आणि आपल्या पथकावर ठाम होता. गाव संरक्षण पथकामुळेच व्हायरस गावात आला नाही या गोष्टीवर शिरप्याचा विश्वास होता. महत्वाचं म्हणजे इतके दिवस जर गावाने कळ सोसलीच आहे, तर अजून काही दिवस असचं चालू राहू देऊ या या मताचा शिरप्या आणि त्याचे मित्र होते. शेवटी गावाने एकमताने बनवलेल्या गाव संरक्षण पथक नावाच्या व्यवस्थेपुढे गावकऱ्यांच काही चाललं नाही.

इकडे गाव संरक्षण पथकामध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. रोज रोज गस्त घालून सारेचजण वैतागले होते. एवढे दिवस गस्त घालून काहीच निष्पन्न झालं नव्हतं. आता तर बाहेरून येणारे देखिल गाव संरक्षण पथकाच्या धाकामुळे  येत नव्हते. कित्येकांचे तंबाखू आणि बिडी काडीच्या तुटवड्यामुळे हाल सुरु झाले होते. चिडचिड वाढली होती. रात्री गस्त घालणाऱ्या मंडळींचे झोपेचं पार खोबरे झालं होतं. अशातच गस्ती पथकातील दोनजण कंटाळून चालले गेले. ते दोघे गेले ते गेलेच पुन्हा परतलेच नाही. त्यांचाच कित्ता आणखीन काही जणांनी गिरवला. हळूहळू गाव संरक्षण पथकाला गळती लागली. गस्त सुरु झाल्यापासून तीन आठवड्याच्या शेवटी शिरप्या, नाम्या, पक्या आणखिन दोघेजण असे पाचच जण शिल्लक राहिले. पुढल्या दोन दिवसात ते दोघेजण पण गेले. आता फक्त गाव संरक्षण पथकात शिरप्या, नाम्या आणि पक्या हे तिघे शिल्लक राहिले.  या त्रिकुटाने अजून यशाची आशा सोडली नव्हती, आणि तसही त्यांना दुसरे कोणतेच काम नव्हते. या व्हायरसला काहीही झालं तरी गावात येऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी जमेल तशी गस्त चालू ठेवली.

अशाच एका रात्री हे तिघेहीजण गावातल्या रस्त्यावर गस्त घालत होते. तेव्हा त्यांना शंकराच्या मंदिरात काहीतरी हालचाल दिसली. सगळ गाव बंद असतांना मंदिरात कोणीतरी आहे याचा अर्थ बाहेरून कोणीतरी आला आहे याची त्यांना खात्री झाली. कदाचित इतके दिवस आपण ज्याच्या मागे आहोत तोच व्हायरस आपली नजर चुकवून गावात शिरला असेल असा विचार शिरप्याने बोलून दाखवला.  त्यासरशी ते तिघेहीजण लगबगीने मंदिराकडे जाण्यास निघाले. मंदिराजवळ पोहोचताच त्यांच्या लक्षात आले की या व्हायरस नावाच्या माणसाने त्याच्यासोबत मदतीला आणखीन एकाला आणलेलं आहे. त्या दोन व्यक्ती मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून काहीतरी करत आहे  हे त्यांना दिसले.  गावात प्रवेश करून लोकांना मारण्याआधी देवाच्या पाया पडून त्याचे आशीवाद घ्यावेत हा उद्धेश या दुष्ट लोकांचा असला पाहिजे, असा विचार शिरप्याचा रिकाम्या डोक्यात आला. त्याने आपल्या हातातली लाठी मजबूत धरली आणि नाम्या , पक्याला नजरेनच खुण करून गाभाऱ्याच्या दिशेने कूच केलं. चालतांना तिघांनी बऱ्यापैकी सावधगिरी बाळगली पण गाभाऱ्याकडे पोहोचताच आतमधल्या त्या दोघांनाही यांची चाहूल लागली. मजबूत बांधा, चांगली उंची, झुबकेदार मिश्या, कमरला सुरा, एका हातात टॉर्च बघून हाच व्हायरस असला पाहिजे आणि तो दुसरा त्याच मदतनीस असला पाहिजे अशी तिघांचीही खात्री पटली.

आता वेळ न दवडता त्या दोघांवर हल्ला करून त्यांना आपला हिसका दाखवावा आणि गावावरचे संकट दूर करून हिरो व्हावं हा विचार एकाचवेळी तिघांच्यामनात आला आणि ते पुढे सरसावले. पण खरा हिसका त्या दोघानीच दाखवला.त्या तथाकथित व्हायरस नावाच्या माणसाने जोरदार ठोसे लावून शिरप्याला पार जमिनीवर लोळवल. त्याच्या अंगावर नाम्या धावून जाताच एका जबरदस्त लाथेमध्ये त्याला फुटबॉल सारखे उडवून लावले. त्या लाथेचा दणका एवढा जबरदस्त होता की त्याच्या डोळ्यासमोर अंधारीच आली आणि तो पुन्हा उठलाच नाही. इकडे पक्या त्या व्हायरसच्या सोबत असलेल्या माणसाच्या  अंगावर धावून गेला, पण त्याने पक्याला अत्यंत चपळाईने जमिनींवर पाडले आणि त्याची जमेल तशी पिटाई करण्यास सुरवात केली. ही हाणामारी काही काळ सुरु राहिली आणि त्या दोन अनोळखी आकृत्यांनी त्या तिघांच्या लाठ्या वापरून त्यांनाच सळो  की पळो करून सोडलं.

गावातली दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ती शंकराच्या मंदिरात झालेल्या चोरीच्या बातमीने. सगळं गाव बंद आहे याचा फायदा घेऊन कोणीतरी गावात घुसलं आणि मंदिरातील दानपेटी फोडून सगळे पैसे घेऊन पसार झाले होते. इथे शिरप्या,नाम्या, आणि पक्या आपापल्या घरात कण्हत पडले आणि बायकोकडून आपले अंग शेकून घेत होते. गावात घुसलेल्या त्या व्हायरस आणि त्याच्या साथीदाराने त्या तिघांनाही चांगलाच प्रसाद दिला होता. रात्रीची गस्त घालणे या तिघांना चांगलेच महाग पडलं होतं. महत्त्वाचे म्हणजे या त्रिकुटाने स्थापन केलेलं गाव संरक्षण पथक देखील बरखास्त झालं होतं. गावातील पोरं पुन्हा एकदा रस्त्यावर बागडू लागली होती. म्हातारे कोतारे कुणाचं पुष्पक विमान आले यावर झाडाच्या पारावर बसून तंबाखूची पिंक टाकत चर्चा करू लागली. बायका पुन्हा घोळक्याने गप्पा मारायला घराबाहेर जमू लागल्या. अनेकांच्या तंबाखू आणि बिडी काडीचा प्रश्न सुटला. गावातल्या मागे पडलेल्या लफडींना पुन्हा उत आला. एकंदरीत गाव पुन्हा सुखी झाल्याचं पाहून सगळ्यांना आनंद झाला कारण गावात कधीही न आलेल्या व्हायरसचा कसाही का होईना नायनाट  झाला असं समजून सगळे आनंदात होते. 

श्रीपाद टेंबे.

मोबाईल-  ९१५८०८८०४२.

इमेल-       shripad.tembe@mail.com

पत्ता-        ए-३०१, पारिजातक को-ऑप.हौ. सोसायटी,

               नवश्या मारुती मंदिराचं मागे,

               सिंहगड रस्ता, पुणे. ४११३०३०.

================================================================

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here