सत्यतेची जाणीव – Marathi Katha Satyatechi Janiv

0
1691

Marathi-Katha-Satyatechi-Janiv

लेखिका – शोभना कारंथ
संपर्क – shobhanakaranth@gmail.com

सत्यतेची जाणीव – Marathi Katha Satyatechi Janiv

छोट्या गावात राहणारा राजू, वडील अपंग, आई चार घरची धुणी-भांडी करून घर संसार चालवत होती. वडील  अपंग असले तरी भाजीपाला विकून घराला हातभार लावत असत. जेमतेम घराचा खर्च निघत होता. अशा परिस्थितीत मोठी मोठी स्वप्न बघणारा राजू नेहमी मी पैसेवाला सावकार कधी होईन या आशेवर जगत होता. घराच्या गरीब परिस्थितीने राजू हैराण झाला होता. त्याचे बरोबरीचे मित्र  चांगले चांगले कपडे घालून फिरत असत. कधी पिक्चरला तर कधी पिकनिकला जात असत. हे बघून राजुला आपल्या गरीब परिस्थितीची अधिक जाणीव होत असे. राजू अभ्यासात तितका हुशार नव्हता. परंतु त्याच्या आई-वडिलांना वाटत असे कि राजुने खूप शिकावे तरी गरिबीमुळे पैशाच्या अभावाने ते राजुला शिकवू शकत नव्हते. राजू मात्र मोठी मोठी स्वप्न बघत असे. त्यामुळे त्याचे शिक्षणात लक्ष लागत नव्हते. जेमतेम तो दहावी पर्यंत शिकला आणि घराला हातभार म्हणून तो एका व्यापाराच्या दुकानात काम करू लागला.

राजुला वाटत होते कि व्यापाऱ्याकडून धंद्याविषयी जाणून घेऊन आपण स्वतःचे दुकान काढावे या विचाराने राजू त्याच्याकडे रोज नियमाने कामावर जात होता. प्ररंतु राजुला मालाच्या गोण्यांची देखरेख करण्याच्या कामाला लावले होते. कांदे-बटाटेच्या गोणीतून माल काढून खराब झालेला माल  वेगळा करायचा. कांद्याची सालं काढायची. अशी कामं राजू करत होता. पगारही थोडा मिळत होता.जेमतेम महिन्याला हजार रुपये मिळत होते. त्या हजार रुपयात राजू खुश नव्हता. कारण आईच्या हातात खर्चाला पैसे देऊन स्वतःसाठी जास्त काही उरत नव्हते. तरी राजुने तिथे एक-दीड वर्ष काम केले.

एक दिवस दुकानदार माल आणण्यासाठी मुम्बईला गेला होता. तेव्हा त्याचा मुलगा सतीश दुकानावर बसला. तो राजूपेक्षा दोन-तीन वर्षाने मोठा होता. कॉलेजला सुट्टी असल्याने तो प्रथमच दुकानावर बसला होता. त्यामुळे तो राजुला ओळखत नव्हता. तेव्हा राजू सकाळी दुकानावर आला तेव्हा सतीशने त्याच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे राजुला ओळखले. “तू राजू आहेस कां—-?”  “हो-हो-, मी राजू—”  राजू असे म्हणून आपल्या कामाला लागला. थोड्यावेळाने सतीशने राजुला विचारले कधी पासून इथे काम करतोस—-?”  “दीड वर्ष झालं—-” राजू कांद्याची सालं सोलत म्हणाला. शिक्षण किती झालं—-? सतीशने राजुला विचारले. “मी दहावी पास झालो. परंतु पैशामुळे मी पुढे शिकलो नाही—-” राजुने सरळ साधेपणाने उत्तर दिले. त्याच वेळी एक एजंट आला आणि त्याने सतीश व राजुचे बोलणे ऐकले. त्या एजंटने साबणाची ऑर्डर घेतली आणि जातेवेळी राजुच्या हातात सतीशच्या नकळत स्वतःचे कार्ड दिले आणि “मला फोन कर—-” असे म्हणून तो निघून गेला.

दुसऱ्या दिवशी लगेच राजुने त्या एजंटला फोन केला. तेव्हा एजंटने त्याला मुंबईला यायची तयारी आहे कां—-? म्हणून विचारले. “तेव्हा राजुने हा महिना पूर्ण करून मी पक्का येईन—” असे सांगितले. राजुला पुन्हा आशेचा किरण दिसू लागला. पुन्हा त्याच्या डोळयासमोर मोठी मोठी स्वप्न दिसू लागली. राजुला महिना पूर्ण कधी होईल असे झाले होते. राजुने मुंबई विषयी आपल्या मित्रांकडून ऐकले होते. मुंबई म्हणजे एक स्वप्ननगरी आहे, मंबई म्हणजे पैशाची रंगीत दुनिया आहे, मुंबईला आलेला माणूस धनवान बनतो. राजू दुकानात इमानदारपणे काम करत होता. कामावरून घरी येऊन राजुने हि मुंबईला जाण्याची गोष्ट आपल्या आईला सांगितली. परंतु आई राजुला मुंबईला पाठवायला तयार नव्हती. कारण तिला माहित होते कि मुंबई जेवढी चांगली आहे तेवढीच ती भयानक आहे. नवखा माणूस मुंबईच्या नगरीत कुठे गुरफटला जाईल सांगता येत नाही. म्हणून राजुची आई आपल्या एकुलत्या एक मुलाला दूर जाऊ देत नव्हती.”आई, मी जर इथेच राहिलो तर आपले हे दिवस बदलणार नाही. आपल्याला शेवटपर्यंत या अशा गरिबीत दिवस काढावे लागतील. तू आणि बाबा किती कष्ट करतात कि त्यातून माझे शिक्षण हि होत नाही. म्हणून मी मुंबईला जायचे म्हणतोय—–” राजू आईला समजावून सांगत होता. “ठीक आहे, परंतु आपली स्वतःची काळजी घे आणि तिकडे तुझी राहण्याची सोय कुठे आहे—-?” आईने राजुला विचारले. “अगं, तू काळजी करू नकोस. त्या एजंटने मला बोलावले म्हणजे काहीतरी व्यवस्था असेलच नं—-” असे म्हणून राजुने आपल्या आईचे समाधान केले.

एक महिना पूर्ण होताच राजू मिळालेल्या पगारातून मुम्बईला जाण्यास निघाला. त्याप्रमाणे राजुने त्या एजंटला मुम्बईला येत असण्याविषयी फोन केला. राजुने देवाला तसेच आपल्या आई-वडिलांना नमस्कार करून घराबाहेर पडला. आठ-दहा तासाने मंबई गाठलं जाणार होतं. राजू आपल्या सीट वर बसून बाहेर बघत बघत पुन्हा मोठी मोठी स्वप्न बघू लागला. मनातून तो खूप खुश होता. कारण त्याला धनवान बनण्याची संधी आयुष्यात मिळाली होती. राजुने आईने दिलेला पोळी-भाजीचा डबा काढून जेऊन घेतले आणि तो स्वप्न बघत बघत झोपून गेला. सकाळी उठला तर बाँम्बे सेंट्रल यायला एक तास बाकी होता. राजुने थंड पाण्याने तोंड घुवून फ्रेश झाला आणि केसावरुन कंगव्याचा हात फिरवला. देवाचे स्मरण करून चहावाल्याकडून चहा घेऊन मंबईच्या चहाचे भुर्के मारू लागला. थोड्या वेळाने मुम्बईला जाणारी लोकं आपले सामान घेऊन उभे राहू लागले. तेवढ्यात एक भिकारी राजू समोर येऊन उभा राहिला. राजुला त्याची दया येऊन त्याने त्याला खिशातून पाच रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले. बाँबे सेंट्रल येताच सगळ्यांची झुंबड बघून राजू पाठीच उभा राहिला. सगळे उतरल्यावर राजू शेवटी उतरला. “काय मुंबईची लोकं आहेत, त्यांच्यात काही माणुसकी नाही—-” असे म्हणून तो पुढे पुढे चालू लागला आणि एजंटला शोधू लागला. थोड्या वेळात एजंट समोर येऊन राजुची बॅग घेऊन मालाडला जाणाऱ्या गाडीच्या दिशेने चालू लागला. राजुला सगळेच नवे होते.मात्र तो तो एजंटच्या बरोबरीने चालत होता.

एजंट राजुला आपल्या रूमवर घेऊन गेला. रूमवर एजंट एकटाच राहत होता. घरात सर्वत्र विकायचा माल  पडलेला होता. दुसऱ्या दिवसापासून एजंटने राजुला आपल्या बरोबर जाण्यास तयार होण्यास सांगितले. राजुने स्वतःची तयारी करून देवाला नमस्कार करून नव्या जीवनाची सुरवात केली. एजंटने सर्व दुकानदारांची ओळख करून दिली. “या या ठिकाणी तुला मालाची ऑर्डर घेऊन माल  पोचता करायचा आहे. तुझं काम बघून मी तुला महिन्याचा पगार ठरविन—-” एजंट म्हणाला. एजंटालाही असाच मुलगा हवा होता कि तो पळून जाणार नाही आणि गावचा असल्याने कमी पगारात काम करून घेता येईल. सहा महिन्यात राजुने सर्व काम शिकून घेतले. दुकानदाराशी कसे बोलायचे त्याची ट्रिक शिकून घेतली. राजू तसा हुशार मुलगा होता. त्यामुळे तो या लाईनीत चांगलाच तयार झाला. राजुला महिन्याचे तीन हजार रुपये देण्याचे ठरविले. राजू मेहनत करत होता. स्वतःच्या खर्चासाठी दोन हजार रुपये ठेऊन हजार रुपये आईला देत होता. त्या दोन हजारातून एजंटला द्यावे लागणारे रूमचे भाडे व जेवण-खाणं भागवायचे होते. त्यामुळे मंबईसारख्या ठिकाणी रहायचे म्हणजे मुश्किल होतं होते. तरी त्याने दोन वर्ष तिथे काम केले. दोन वर्षानंतर एजंटने त्याचा पगार वाढवून पाच हजार रुपये पगार केला. त्याच पगारात त्याने ड्रायविंग शिकून घेतले. सायकलने माल  पोचता करण्याऐवजी तो टेम्पोने माल घेऊन जाऊ लागला. परंतु पगार कमी असल्याने एका दुकानदाराच्या ओळखीने राजुच्या इमानदारीवर खुश होऊन त्याला एका कंपनीच्या मालकाकडे त्याच्या गाडीचा ड्राइवर म्हणून काम मिळाले. तो मालक त्याला दहा हजार रुपये पगार द्यायला कबूल झाला. म्हणून दोन वर्षाने राजू त्या कंपनी मालकाकडे काम करू लागला. राजुने त्या पगारातून स्वतःची भाड्याने रूम घेऊन राहू लागला. दिवसेन दिवस राजुची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. म्हणून नेहमीप्रमाणे दर महिन्याला तो आपल्या आई-वडिलांना भेटायला जात असे. तसेच यावेळी सुद्धा तो गावी गेला आणि जाताना आई-बाबांसाठी कपडे, मिठाई व एक चांगला मोबाईल घेऊन गेला. त्याचे आई-बाबा हे बघून  खूप खुश झाले. आपल्या मुलाची प्रगती बघून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. “राजू , कधीही या आई-बाबांना विसरू नको, आणि त्या परमेश्वरालाहि आठवण ठेव. आपण एक दिवस वैष्णव देवीला जाऊन येऊ—-” राजुची आई भावविवश होऊन म्हणाली.” हो–हो–आई ,नक्कीच जाऊया—” असे म्हणून राजुने आईचे समाधान केले.

दोन तीन वर्षात राजुच्या कामावर गाडीचा मालक खुश झाला. राजुची इमानदारी बघून राजुचा पगार पंधरा हजार रुपये झाला. परंतु राजुची कामाची जबाबदारी पहिल्यापेक्षा अधिक वाढली. राजुला आता अधून मधून रात्र पाळी देखील करावी लागत होती. त्यासाठी राजुला गाडी मालकाने आपल्या बंगल्या बाजूची एक रूम राहायला दिली. त्यामुळे त्याचे रुमभड्याचे पैसे वाचू लागले. त्यातच त्याने पैसे पाठवून गावचे मातीचे घर सिमेंट-विटांनी पक्के बांधून घेतले. राजुची आई सुद्धा आता कपडे-भाड्याची कामे करत नव्हती. मात्र भाजीचा  धंदा चालूच होता. राजुच्या मुख्य गरजा तर भागवल्या जात होत्या. तरी सुद्धा राजुला समाधान नव्हते. राजुला आता स्वतःच्या मालकीचा फ्लॅट खरेदी करण्याची स्वप्न दिसू लागली. परंतु ड्राइविंगच्या पगारातून फ्लॅट घेणं मुश्किल होतं. राजू नेहमी उडपी हॉटेल मध्ये जेवायला जात असे. त्याचे ते नेहमीचेच हॉटेल झाले होते. त्या हॉटेल मालकाशी त्याची चांगलीच ओळख झाली होती. राजुच्या मनातही हॉटेल मालक बनण्याची स्वप्न दिसू लागली होती. म्हणून बोलता बोलता त्याला समजले कि इथला मॅनेजर सोडून गेला आहे. तितक्यात हॉटेल मालकच राजुला म्हणाला “यहा एक मॅनेजरकी जरुरत है, कोई है तो बोल देना—” हॉटेल मालक म्हणाला. “अगर मैं आऊ तो चलेगा—?” राजुने हसत हसत विचारले. “अगर तुही आता है तो सोचनेकी बात हि नाही, कबसे आयेगा बोल—? असे म्हणत त्यांनी बोलणी करून राजू एक महिन्याने मॅनेजर म्हणून काम करू लागला. राजू आता मंबईत राहुन हुशार झाला होता. थोडं थोडं इंग्रजीही बोलू लागला होता. राजुच्या बोलण्याच्या स्टाईलने त्याचा प्रभाव हॉटेलवर पडत होता. हॉटेलचा धंदा दिवसेन दिवस वाढत होता.हॉटेलचा मालक राजुच्या कामावर व त्याच्या इमानदारीवर खुश होता. त्याची तीन-चार हॉटेल्स असल्याने या हॉटेलची जबाबदारी राजुवर टाकायची असा तो विचार करत होता. त्याप्रमाणे दोन-तीन वर्षाने राजुला या हॉटेलची जबाबदारी दिली आणि राजुला पार्टनर म्हणून करून घेतले. राजुची मेहनत आणि मालकाचा पैसा या आधारावर राजू इमानदारीने काम करू लागला. चार-पाच वर्षाने राजुला मंबईची हवा लागू लागली. धंद्यातील फसवेगिरीच्या वाटा तो समजू लागला. फसवेगिरीच्या जोरावर तो दुपटीने पैसा कमवू लागला. मालकाला खोटे हिशोब दाखवून त्याला लुटू लागला. वर्कर लोकांचा पगार वाढवत नव्हता. अशाप्रकारे  पैसा कमावून फ्लॅट व गाडीचा मालक झाला.

आपल्या मॅनेजरच्या जागी नेमणूक केलेल्या शरद वर राजू खुश होता. शरद इमानदारीने काम करत होता. स्वभावाने शांत तर वागणुकीने सरळ साधा होता. श्रीमंत घराण्यातला होता. त्याच्या वडिलांचा दुधाचा धंदा आणि फळांचा धंदा होता. परंतु वडील भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमवत होते हे शरदला अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे त्या दोघात नेहमी वाद-विवाद होतं असत. म्हणून शरद घर सोडून मंबईला कामानिमित्त आला होता. शरदच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेपण होते. समाधान हे त्याच्या व्यक्तित्वाचे वैशिष्ठ होते आणि हे वेगळेपण राजुला शरदकडे आकर्षित करत होते. म्हणून राजुला शरद विषयी जाणून घ्यायचे होते. राजुला वाटायचे कि माझ्याकडे सर्व काही असूनही माझ्या मनाला समाधान नाही. परंतु शरद आपलं सर्व काही सोडून मंबईला आला होता. त्याला नोकरी करण्याची गरज नव्हती. वडिलांच्या कमाईवर त्याला अवलंबून रहायचे नव्हते. त्यातच त्याचे वेगळेपण दिसून येत होते. त्यामुळे दोघांचे संबंध मित्रत्वाचे झाले होते.

एक दिवस राजू व शरद एकत्र जेवताना राजू म्हणाला  “शरद, तुझ्याकडे पैसा असूनही तू  श्रीमंती सोडून इथे का आलास—? मी तुझ्याजागी असतो तर इथे आलोच नसतो, तू इथे येण्याचा उद्देश काय—?” हे मला जाणून घ्यायचे आहे. “आज माझ्याकडे सर्व काही आहे. तरी अजून मला पैसा कमवायचा आहे. माझ्या नावाने पाच-सहा फ्लॅट्स असतील तेवढ्याच चार-पाच गाड्यांचा मालक असेंन—” राजू गर्वाने बोलत होता. त्याच्या बोलण्यात एक अहंकार होता. तेव्हा शरद त्याला शांतपणे म्हणाला “सर, या सगळ्या –इच्छा–इच्छा–इच्छा  याचा कुठेतरी शेवट हा असणारच नं—” या इच्छा आयुष्याच्या कुठल्या नं कुठल्या वाटेवर थांबणारच नं—” हा इच्छांचा शेवट जोपर्यंत माणूस जाणून घेत नाही तोपर्यंत या इच्छांच्या धावत्या वाटेवर धावतच राहतो—” शरद शांतपणे बोलत होता. “मग हा इच्छांचा शेवट कुठे आहे—? राजुने विचारले. “सर, ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यायला हवे. तरच मी तुम्हाला समजाऊ शकतो—” शरद म्हणाला. शरदच्या घरी असे काय आहे कि मला माझ्या शंकेचे उत्तर सापडेल—?” या विचाराने राजुला अधिकच उत्कंठा वाढली.

शरद घरी जाण्यासाठी मुद्दाम राजुने हॉटेल मालकाच्या मुलाला एक दिवस गल्ल्यावर बसावयास सांगितले आणि शरदच्या रजेच्या दिवशी राजू शरदच्या घरी गेला. शरदच्या घरी खुर्ची टेबल च्या विना काही नव्हते. मात्र टेबलवर तत्वज्ञानाची बरीच पुस्तके लाईनीत लावलेली होती. त्यावरून शरदला तत्वज्ञानाची पुस्तकं वाचण्याची आवड आहे असे दिसत होते. परंतु राजुला पैशा शिवाय काहीच दिसत नव्हते. पैसा म्हणजेच सर्व काही, पैशाने सर्व काही विकत घेता येते. राजू या भूमिकेचा मुलगा होता. शरदने राजुला खुर्ची पुढे करून बसावयास सांगितले आणि स्वयंपाक खोलीत जाऊन लिंबाचे सरबत आणले. सरबत पिऊन शरदने राजुला पहिल्या खिडकीकडे चलण्यास सांगितले. राजुने त्या खिडकीतून बाहेर बघितले. समोर एक सरकारी हॉस्पिटल होते. काही पेशंट हॉस्पिटलच्या आवारात व्हीलचेअरवर बसून “थ्रो बॉल ” खेळतं होते. त्यात काही जणांचे दोन्ही पाय गेले होते तर कोणी एक पायाने अपंग होता तर कोणी एक हाताने अपंग होता. तर कोणी स्ट्रेचरवर जखमी अवस्थेत विव्हळत होता. तर काही म्हातारे अपंग केविलवाणीपणे बेडवर पडलेले होते.

हे दृश्य पाहून राजू उदास झाला. ते बघून शरद म्हणाला, खरे सुख हे आपल्या अवती भवतीच असते. ज्यावेळी आपण अपंग किंवा विकृत माणसांना बघतो तेव्हा त्याच्याविषयी आपल्याला एक करुणा निर्माण होते. त्या अपंगांची अगतिकता, परावलंबी जीवन, त्यांची मानसिक दुर्बलता बघून आपण आपल्या शरीराकडे बघून स्वतःला नशीबवान समजतो. त्या परमेश्वराचे आभार मानतो. म्हणजेच सुदृढ शरीराचे महत्व समजून येते. सुदृढ शरीर हा संपन्नतेचा ठेवा आहे हे कळून येते. यातच खरे सुख आहे. कारण शरीर चांगले तर सर्व सुखांचा आस्वाद घेता येतो. शरीर अपंग तर सारी सुखं शरीराप्रमाणे अपंग होऊन समोर उभी राहतात. अर्थात ती निरर्थक ठरतात.

राजुला कळून चुकले कि शरीर हा आपला अनमोल खजाना आहे, शरीर चांगले असले तर आपण कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकतो. पैसा सर्व काही आहे हि माझी चुकीची समजूत होती. त्यावरून त्याला एक उदाहरण आठवले कि एक माणूस एवढा श्रीमंत होता कि अमाप पैसा होता. परंतु त्याला असा आजार होता कि डॉक्टरांनी सांगितले कि तुम्हाला मीठ खायचे नाही. मीठ जर खायचे नाही तर तो त्या पैशाचा कसा उपभोग घेणार—-? पैसा असेल तर त्याचा उपभोग घेता यायला हवा आणि त्यासाठी प्रथम शरीर सुदृढ हवे. हे राजुला कळून चुकले.

लगेच शरदने राजुचा हात पकडून दुसऱ्या खिडकीकडे राजुचे लक्ष वेधून घेतले. राजुने बाहेर बघितले तर एक सुंदर गणपतीचे मंदिर होते. त्याच बाजूला प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यलाय होते. राजुला हे बी,के,विश्वविद्यलाय नवीनच वाटले. म्हणून राजुने उत्सुकतेने विचारले कि या विश्वविद्यालय मध्ये काय शिकविले जाते—-? त्याच्या या प्रश्नाला शरद शांतपणे उत्तर देऊ लागला. “हे विद्यालय म्हणजे हि एक गीता पाठशाळा आहे—-” राजुने बघितले कि गीता पाठशाळेत अनेक जण पांढरे शुभ्र कपडे घालून शांतपणे  जात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतुष्टता दिसत होती . काही तरी प्राप्त झाल्याचा भाव चेहऱयावर दिसत होता. मंदिरात सुद्धा आरती होत होती. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्नतेचे होते. गीता पाठशाळेच्या गेटवर दोन स्लोगन बोर्ड लावलेले होते. एक स्लोगन होते कि “अच्छा सोचेंगे तो स्वतः अच्छा कर्म करोगे” आणि दुसरे होते कि “इच्छा मात्रं अविज्ञा ”

“सर, या दृश्यातून आपल्याला हे समजते कि या शरीराचा संपन्नतेचा ठेवा देणाऱ्या ईश्वराला शुक्रिया म्हणण्याऐवजी या मायावी सुखाच्या आकर्षणात अडकून त्याला आपण विसरून जातो. आपल्या खोट्या अहंकाराने आपल्या सफलतेचे सारे श्रेय स्वतःला देतो. मात्र असफलतेचे खापर त्याच्या माथी मारतो. जेव्हा शरीर असाध्य रोगाने पछाडले जाते तर कधी जीवनात असाध्य परिस्थिती येते किंवा एकाकीपणाचे सावट पसरते तेव्हा स्मृती येते ती त्याच दयाळू ईश्वराची. त्याच्याच चरणी शांती मिळते. म्हणजे इकडून तिकडून फिरून फिरून शेवटी माणूस त्याच्याच चरणी आश्रयाला येतो. कारण हेच ठिकाण आहे कि मनाला खरी शांती त्यातून मिळणारे खरे सुखं त्याच्याच चरणी आहे—”  राजुला आपल्या मनातील एक एक प्रश्नाचे उत्तर हळू हळू मिळत होते. “शरद हे ज्ञान तू कुठे घेतलेस—? राजुने विचारले. “सर, हे तत्वज्ञान या समोरील गीता पाठशाळेत मला मिळाले. त्यांची मी पुस्तकंही वाचतो आणि संध्याकाळी रोज एक तास तिथे बसून ईश्वरीय ज्ञान ऐकतो. माणूस कितीही शिकलेला असो परंतु प्रत्येक माणसाला या ईश्वरीय ज्ञानाची गरज आहे. कारण या गीता ज्ञानानेच जीवनाची सत्यता कळून येते. जीवन जगण्याची कला कळून येते. माणूस जीवनभर सुखासाठी जी धडपड करतो, इच्छांच्या पूर्तीसाठी धावत असतो. मायावी सुखाला खरे सुखं समजतो आणि एक दिवस असा येतो कि त्या एका क्षणाला तो सर्व काही इथेच सोडून रिकाम्या हाताने या मायावी दुनियेचा निरोप घेतो. इथेच सर्व इच्छा थांबून जातात. सारी धडपड शांत होते. मग जाताना तो काय घेऊन जातो—? याचे सत्य ज्ञान माणसाने घेणे  आवश्यक आहे. “इच्छा मात्रं अविद्या” हे या ज्ञानाचे सत्य सर आहे. यातच खरे सुखं आहे.

लगेच राजुला आपल्या आईची आठवण झाली. आईने सात-आठ महिन्यापूर्वी सांगितले होते कि आपण वैष्णव देवीला दर्शनाला जाऊन येऊ. परंतु राजुने पैशाच्या पाठी राहून आईची इच्छा पूर्ण केली नव्हती तर कधी देवळात जाण्याचेही त्याला भान राहिले नव्हते.नेहमी राजू सकाळी देवाला पाया पडत असे. परंतु आता ते ही तो विसरून गेला होता. इच्छांच्या जाळ्यात  स्वतःला गुरफुटून घेतले. शरद प्रमाणे मी सुद्धा गीता पाठशाळेत किंवा सत्संग मध्ये गेलो असतो तर माझी दिशा भूल झाली नसती किंवा मी केलेल्या दुष्कृत्याप्रती एक भय राहिले असते आणि मी माझ्या वाईट प्रवृतीवर ताबा ठेऊ शकलो असतो. मी माझ्यावर नियंत्रण ठेऊ शकलो असतो. राजू स्वतःला सावरत होता. तरी राजुच्या चेहऱ्यावर पच्छातापच्या छटा दिसत होत्या.

शरदने राजुला त्याच्या विचारातून जागृत करण्यासाठी बोटाची टिचकी मारली आणि पुढच्या खिडकीकडे राजुला घेऊन गेला. त्या खिडकीतून एक आश्रम बघितला. त्या आश्रमात सगळे वृद्ध होते. त्यात काही त्यांच्या मुलांनी आपल्या माता-पित्यांना अडगळीत टाकलेल्या वस्तूप्रमाणे त्यांना आश्रमात टाकून पैसा कमावण्यासाठी परदेशात निघून गेले होते. तर काही वृद्ध आपले राहण्याचे हेच ठिकाण आहे अशी मनाची समजूत घालून आनंदात राहत होते. तर काहींच्या चेहऱ्यावर विवंचना दिसत होती कि आपला मुलगा आपल्याला बघायला केव्हा येईल—? या अपेक्षेने वाटेकडे खोल गेलेल्या डोळ्याने आतुरतेने वाट पाहत होते. तर काही शेवटची घटिका मोजत होते.

हे बघून राजुचे डोळे पाणावले. तेवढ्यात शरद म्हणाल, “आज माणूस पैशाच्या अधीन एवढा झाला आहे कि त्याला पैशापुढे काहीच दिसत नाही. त्या पैशाने फक्त आपली तिजोरी भरत असतो. परंतु तो पैसा सत्कारणी कसा लावावा याचे त्याला भान राहत नाही. तरी अशीही काही लोकं आहेत कि आपल्या दानशूर भावनेने या वृद्धांसाठी आपल्या कमाईतला काही हिस्सा दान म्हणून देतात. आपला पैसा सत्कारणी लावून गुप्त दानाने  सेवा करतात. यातच खरे आंतरिक सुखं मिळत असते. मनाला शांती मिळते. परंतु माणूस आपल्या एशोआरामासाठी तो पैसा उपयोगात आणतो—-”

राजुला कळून चुकले कि मी सुद्धा काय केले—? बरेच दिवसात आई-बाबांची  विचारपूस न करता त्यांना एका आश्रमा प्रमाणेच ठेवले आहे. फक्त महिन्या महिन्याला त्यांना पैसे पाठवतो. परंतु या पैशापेक्षा माझ्याकडून मिळणारे प्रेम अधिक मूल्यवान आहे. ते सुद्धा मला भेटण्याच्या प्रतीक्षेत असतील. वाटेला डोळे लावून बसले असतील. राजू गरीब स्थितीत सुद्धा तो भिकाऱ्याला पाच-दहा रुपये देत होता. परंतु या चार-पाच वर्षात त्याने आपला पैसा  असूनही सत्कार्याला लावला नाही किंवा परमार्थासाठी दान केला नाही. हे लक्षात येताच राजुला स्वतःची स्वतःला कीव येऊ लागली. शरद्प्रमाणे समाधानी मन आपले नाही याचे कारण राजुला समजून आले. या आंतरिक सुखाला आपण कसे परके झालो याचे त्याला ज्ञान मिळाले.

राजुचे मन बरेच हलके झाले होते. उत्सुकतेने त्याने शरद बरोबर पुढच्या खिडकीतून बाहेर बघितले. तर एक स्मशान दिसत होते. एक चिता जळत होती. आजूबाजूला मित्र संबंधी आणि नातेवाईक शांतपणे उभे होते. त्यात कोणी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत होते. अश्रू वाहण्यात चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळे दिसत होते. कोणाचे खरोखर दुःखाचे अश्रू होते तर कोणाचे ” आमचं आता कसं होईल—?’ या अर्थाचे अश्रू होते. तर कोणाचे आपापल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल कि नाही—? हिस्सा मिळाला तर तो  किती मिळेल—? जेणेकरून आम्ही आलिशान फ्लॅट तर खरेदी करू—‘ अशा स्वार्थीपणाचे अश्रू होते. त्यासाठी खोट्या मुखवट्याने कोणी त्याच्या कर्तृत्वाची महिमा करत होते. तर कोणी स्वभाव गुणाची महिमा गात होते. काही वेळाने सर्व साथीदार एक एक करून निघून गेले. चिता मात्र जळत होती. स्मशानात भयाण शांतता होती. त्यातून त्या चिताकडे  बघून खाली पडलेल्या लाह्या खाण्यासाठी कावळे काव काव करत होते.

हे पाहून राजुचे मन उदास झाले. ते बघून शरद म्हणाला ” सर, माणूस जीवनभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत वैभवासाठी जी धडपड करतो, त्या म्रुगजळाप्रमाणे तहानलेला मृग पाणी समजून उन्हात चमकणाऱ्या तापत्या रेतीतून धावत असतो. परंतु त्याला पाणी न मिळता तो तहानलेलाच राहून जातो. तशीच माणसाची गत होते. खरे सुख समजून तो मायावी  आकर्षणापाठी धडपडत असतो. आपल्या इच्छा पूर्तीसाठी त्या मृगाप्रमाणे व्याकुळ होतो. एक इच्छेतून अनेक इच्छांची निर्मिती होत असल्याने तो असंतुष्टच राहतो आणि शेवटी या मायावी दुनियेचा सर्व वैभव इथेच सोडून रिकाम्या हाताने निरोप घेतो. शेवटी स्मशानात काव काव करणाऱ्या कावळ्याप्रमाणे संबंधी लोकांची स्वार्थ बुद्धीने प्रॉपर्टी हेतू काव काव सुरु होते. म्हणजे हे सारे वैभव   कां गोळा करतो—? त्या वैभवासाठी कां एवढी धडपड करतो—? त्या मायावी वैभवाच्या मोहात कां अडकून जातो—? हे सर्व आहे ते क्षणभन्गुर आहे हे समजूनही अविवेक  बुद्धीने त्याच्यापाठी पळत असतो—” शरद जे काही बोलत होता ते राजुला पटत होते. राजू काही वेळ स्तब्धच बसून राहिला आणि विचार करू लागला.

“खरंच, मी सुद्धा हेच केले. आज मी धडपड धडपड करून पैसा कमवत आहे तो कोणासाठी—? माझ्या मनाच्या समाधानासाठी, माझ्या इच्छेपुर्तीसाठी नं—? परंतु पैसा असूनही मला मानसिक समाधान नाही, माझ्या इच्छेला अंत नाही तर त्या पैशाचा, वैभवाचा काय उपयोग—? शेवटी हे सारे वैभव इथेच सोडून मला रिकाम्या हाताने दुसऱ्याच्या चार खांद्यावरूनच जायचे आहे. तर त्यात मी काय मिळवले—–? फक्त पैसा–पैसा–पैसा करून जीवन व्यर्थ घालवले. आज शरदने माझे डोळे उघडले. या पैशाचा सदुपयोग करायचा आहे. दुसऱ्याच्या कल्याणार्थ उपयोग करायचा  आहे. जेणेकरून त्या गरजू व्यक्तीचे आशीर्वाद शेवटपर्यंत मला साथ देतील. तीच माझ्या पुढील जन्माची पुंजी असेल—”

राजुला जीवनाची सत्यता कळून आली. जीवन जगण्याची कला समजली. त्या दृष्टिकोनातून खऱ्या सुखाच्या दिशेने जीवन जगण्याची पायवाट पकडण्याचा संकल्प केला. “शरद, तू आज मला जीवन म्हणजे काय—? हे दाखवून दिलेस. खरी सुखाची परिभाषा पटवून दिलीस. तुझा मी शतशः आभारी आहे. असे म्हणून राजुने आनंदाने शरदला कडकडून मिठी मारली आणि पैशापेक्षा अमूल्य असा ठेवा गवसल्याच्या प्रसन्नतेने नवीन जीवनाची सुरवात करण्यास शरदचा निरोप घेतला.शरद मात्र खिडकीमधून दिसणाऱ्या दृश्यांना   सखोलपणे न्याहाळत उभा राहिला. कारण त्यातच त्याला खरे सुख मिळत होते आणि त्यातून आंतरिक शांतीची अनुभूती होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here