सारीपाट भाग १ – Marathi Katha Saripat – Part 1

0
929

Marathi-Katha-Saripat-1

लेखक : अंकुश गाजरे, शेळवे ,पंढरपूर
संपर्क : ankushgajare88@gmail.com

सारीपाट भाग १ – Marathi Katha Saripat – Part 1

ओट्यावर बसल्याली शांताकाकू इवळत-इवळत कशीबशी उठली. तिचं आंग मोडून आलं होतं. अंगात थकवा जाणवत होता. शरीरानं काम करवत नव्हतं. शांताकाकूचा जीव थकला भागलेला झाला होता. डोक्यावरच्या केसानं पांढरं रूप धारण केलं होतं. सुरकुत्यांनी चेहरा घेरला होता. दोन – चार दात हालायला लागलं होतं. दम लागत होता. म्हातारपणानं पार घेरलं होतं.

इवळत-इवळत शांताकाकू चुलीपुढं जावून बसली. चुलीत दोन चार काटक्या सारल्या, दिव्यातलं थोडसं रॉकेल काटक्यावर ओतलं. अंधारात चाचपडत-चाचपडत काड्याचं डबडं घेतलं. काढी ओढली. चुलीत टाकली. भडका उडाल्यागत जाळ झाला. चूल पेटली. चुलीतल्याच पेटलेल्या बारक्या काटकीनं दिवा लावला. अंधुकसा दिव्याचा उजेड घरभर पसरला. चुलीवर तवा ठेवला. काटवट घेतली. डब्यातलं पीठ पाण्यात चुरलं. कशीबशी भाकर थापली. तव्यात टाकली. जाळ पुढं सारला. भाकरीला पाणी लावलं. भाकर उलथत शांताकाकूनं कुंकवाच्या धन्याला हाक दिली,

“व्हय व्हं sss, या हात धुण आत.. भाकरी झालीय…घ्या खाऊनशान..”

इवळत-इवळत ओट्यावरूनच सखाराम तात्यानं आवाजाकडं कान केला, तवर काकूनं पुन्हा आवाज दिला. मग तात्या म्हणला,

“आलू-आलू… हू दी भाकरी सगळ्या…दोघंबी चार – चार घास खावू गी आपून…”

दुसरी भाकर तव्यात टाकत पुन्हा शांताकाकू म्हणली,

“खावून घ्या भाकरी तुमी.. मला भूक न्हाय… एखादी कणकणीवरची गुळी खाल्ल्याबिगर मला दम निघायचा न्हाय… लयच आंग मुडून आलंय.. एखादी इंडूपार गुळी जाऊनशान आणा वाटलंस तर दुकानातनं.. तवर हुत्याल्या माझ्याबी भाकरी…”

“व्हय-व्हय,…आणतू गी..” तात्यानं आवाजाला होकार दिला..

सखाराम तात्या काठीच्या आधारानं उठला. अंगात शर्ट आडकावला. शर्टाच्या खिशात सुट्ट पैसं चापचलं. काठीच्या आधारानं तात्या अंधारातनं दुकानाची वाट चालायला लागला…

शांताकाकूनं तव्यातली भाकरी काढून चुलीच्या आरावर लावली. इकडं-तिकडं नजर टाकली. कालवणाला काहीच दिसत नव्हतं. कोपऱ्यात फक्त दोन कांदं दिसलं. शांताकाकूनं उठून दोन्ही कांदं घेतलं. इळीनं बारीक चिरलं. आरावर लावल्याली भाकरी टोपल्यात टाकली. तापलेल्या तव्यात तेलाची धार ओतून कांदा टाकून कांदवणी केली. तवर सखाराम तात्या ठेचकाळत ओट्यावर आला.

“ही बघ आणली इंडूपार गुळी…” तात्यानं बाहिरनंच आवाज दिला…

तात्याच्या आवाजाकडं बघत शांताकाकू म्हणली,

“आणागी आत गुळी, बरं वाटंल गुळी खाल्ल्यावर जरा… हातबी धुण या आत..घिव भाकरी खाऊन…”

सखाराम तात्यानं भितिला काठी टेकवली. रांजणातल्या पाण्यानं चूळ भरून हात धुऊन तोंडावरनं हात फिरवला. पुन्हा रांजणातला तांब्या भरून घेतला. वाकत इवळत तात्या आत घरात शिरला. शांताकाकूच्या समोर टेकला. तांब्या बाजूला ठेवला. धोतराच्या सोग्यानं तोंड  पुसलं..

“वाढ” तात्यानं शांताकाकूंकडं बघत आवाज दिला.

मुक्यानच शांताकाकूनं ताटली घेतली. एक भाकरी त्यात मोडून ठेवली. दोन पळ्या कांदवणी वाढली. ताटली तात्यासमोर सारली. दुखणं आल्यानं काकूला घास गोड लागत नव्हता. नरड्याच्या आत घास जात नव्हता. काकूनं मनाशी विचार केला, ‘आपण उपाशी झोपलो तर नवऱ्याला घास गोड लागंल का…? म्हणून बळंबळं काकूनं कोरभर भाकरी ताटात वाढून घेतली. तोंडात घास फिरत होता. तशीच कोरभर भाकरी पोटात ढकलली. जात नसताना.. कुंकवाच्या धन्याला आनंदात बघण्यासाठी. तात्यानंबी इवळतच कशीबशी ताटातली भाकरी संपवली..

हात धूत-धूत तात्या म्हणला,

“ आण त्यातली आर्धी गुळी… माझंबी आंग मुडून आलंया.. लयंच दुखायला लागलंया… खातू मीबी आर्धी गुळी… तेवढंच जीवाला बरं वाटंल…”

शांताकाकूनं हातानंच गोळीचं दोन तुकडं केलं. एक तुकडा तात्याच्या हातात दिला. तात्यानं अर्ध्या गोळीचा तुकडा नरड्याच्या आत ढकलला. वरनं पाण्याचा घोट घेतला.

सखाराम तात्या भिताडाच्या, काठीच्या आधारानं उठला. बाहिर जाऊन ओट्यावर टेकला. शांताकाकूनं भांडी आवरून खरकटं मोडलं. दोन वाकळा घेतल्या. बाहेर ओट्यावर एक हातरली. एक पायथ्याला टाकली.

शांताकाकू सखाराम तात्याकडं बघत म्हणली,

“ टाका आंग… झोपा… गुळी खाल्लीया तुम्ही.. दडपून झोपल्याबिगर बरं वाटायचं न्हाय..”

“व्हय-व्हय” म्हणत तात्या बसूनच हातरुणावर सरला.

शांताकाकूकडं बघत तात्या म्हणला,

“उसवशी आण तिवढी.. आणि टाक तू बी आंग… तुलाबी बरं वाटंल जरा…”

शांताकाकूनं दोन उसवश्या घरातनं आणल्या. एक तात्याच्या उशाला टाकली, दुसरी आपल्या उशाला टाकली. हातरूणावर आंग टाकलं. तात्यानंबी आंग टाकलं.

गार मंद वाऱ्याची झुळूक वाहत होती. शेजाऱ्यांच्या घरातून भांड्या-कुंड्याचा आवाज येत होता. बारकं बाळ रडल्याचा आवाज येत होता. शेजारच्या दुसऱ्या घराच्या मागून कुत्रं भुकल्याचा आवाज येत होता. लांबून कुठूनतरी स्पीकरवर गाण्याचा आवाज येत होता. बारकासा गुरांच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज बाकी आवाजात मिसळत होता…

तात्या – काकू दोघंबी हातरूणावर शांत पडून होती. कितीतरी वेळ निघून गेला होता. दोघांचंबी डोळं मिटत नव्हतं. घरात बारका दिवा मिणमिणत होता. बाहेर अंधार भुडुक पडला होता.

आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. बारकासा चंद्र एका कोपऱ्याला झोपायला चालला होता. बोचरं गारटं पसरायला लागलं होतं. सखाराम तात्या, शांताकाकू दोघंबी कुठल्यातरी विचारात गढून गेली होती. दोघंबी आयुष्याची मोजदाद करत होती. गोळाबेरीज करत होती. आयुष्यात बेरजेपेक्षा वजाबाकी जास्त झाली होती. म्हणूनच की कायं दोघंबी आभाळाकडं एकटक बघत होती… डोळं सताड उघडंच ठेवलं होतं. सखातात्या पार खंगला होता. म्हातारपणानं वाकला होता. सरळ ताट चालता येत नव्हतं. दालफाडं आत बसली होती. डोळ्याची बूबळं खोबण्यात आत घुसली होती. डोक्याची केसं पार पिकली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. हातापायावरच्या शिरा ठळक नजरेस पडत होत्या. फाटलेल्या गोणपाटागत तात्या झाला होता. छपराची राखण करत बसणं एवढंच तात्याचं काम. दुसरं कामच होत नव्हतं.

शांताकाकू पार म्हातारी झाली होती. चेहऱ्यावर पार सुरकुत्या पडल्या होत्या. अंगावर मास्कांड राहीलं नव्हतं. पार अंगाचा सापळा झाला होता. पालीगत आंग पांढरं फेक पडलं होतं.. पण… जिवाच्या उदारानं म्हातारीला खुरपायला जावं लागायचं… ‘होतंय तवर काम करायचं…. जगायचं… न्हाय हुणा की जीव सोडायचा…’ अशा विचारानं शांताकाकू खुरपायला जात होती. काम करत होती. दिवस पाठीशी टाकत होती…

तात्याच्या-काकूच्या पोटाला वंशाचा दिवा आला होता. हसतं खेळतं आयुष्य होतं… आनंदात-मजेत दिवस जात होतं… आनंदी- आनंद होता. संसाराचं फूल उमललं होतं…. बहरलं होतं… काकू-तात्यानं स्वप्न पेरली होती, नातवाला – नातीला मांडीवर खेळवायचं दिवस जवळ आलं होतं…. सूनबाईच्या हातचा वाफाळलेला चहा प्यायचा होता. लेकाचा वेल मांडवाला न्यायचा होता. बसून खायचं दिवस आलं होतं… पण…. नियत खोटी निघाली…. सरळ आणि चांगल्या माणसाच्या पायात ख्वाडाच पडतो…. नियतीनं डाव टाकला, ख्वाडा घातला… झाडासारखं पोरगं एकाकी देवाघरी गेलं…. वेलीचं फूल उमलायच्या – फुलायच्या अगोदरच गळून पडलं. वंशाचा दिवा विझून गेला…. मांडवाला जाणारा वेल जळून गेला. वाफाळलेला चहा आटून गेला. दोघा नवरा-बायकोवर संकटाचं आभाळ कोसळलं. आयुष्याचा आधार एकाकी वादळात झाड कोसळावं तसा कोलमडून पडला. दोघांच्या आयुष्याचा सारिपाट झाला. दोन्ही जीव एकाकी झालं. तात्यानं मातीचं तोबर भरलं… तोबऱ्याबरोबर दु:ख गिळलं… एकाकी आयुष्य जगत दोघांनी आयुष्याची कढ गाठत आणली. आयुष्याची होडी किनाऱ्यावर आणून लावली. दु:खात सोबतीला कोणी नसतं… तात्याच्या सोबतीला जवळची नातेवाईकही कधी जवळ आली नाहीत… साधा भावनिक आधारही कोणी दिला नाही.. हुंदक्याचा आवंढा गिळत दिवस पाठीशी टाकलं. तात्याचा आधार काकूला आन काकूचा आधार तात्याला.. दोन्ही जीव एकमेकावर अवलंबून. एकमेकाच्या आधारानं-हिंमतीनं दोघं दिवस काढत होती. आयुष्याचा सारिपाट खेळत शेवटचा दिवस उजाडण्याची दोघं वाट बघत होती….

उशीर झालं सखातात्या शांताकाकू नुसतंच आभाळाकडं एकटक बघत होती. आंधार भुडुक पडला होता. आता शांतता पसरली होती. शेजापाजारची लोकं झोपली होती. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज बंद झाला होता. मंद गार वाऱ्याची झुळूक होतीच. रातकिड्यांचा तेवढा बारकासा आवाज काकूच्या अन तात्याच्या इवळण्याच्या आवाजात मिसळत होता. तात्या-काकू कोणीच कोणाला बोलत नव्हतं.

उशिरानं शांताकाकूच आभाळकडं बघत म्हणली,

“ व्हय व्हं sss, झोप लागंन्हाय व्हय…?

काकूच्या आवाजानं तात्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला,

श्वास सोडत तात्या म्हणला,

“झोप लागलीय व्हय ….? आगं, आयुष्यच बिगर झोपीचं गेलंय… झोप कधी लागलीच न्हाय.. अन आता तर ती कशी लागंल…? न्हाय.. न्हाय… माझं जरा चुकलंच… लागंल गी आगं झोप… शांत लागंल… वर गेल्यावर तर लागंल ना…!”

मोठ्यानं श्वास घेवून तात्यानं सोडला, तात्याच्या आवाजात थरथरपणा जाणवत होता. तात्याच्या बोलण्यानं काकू गंभीर झाली. इवळत हातरूणावर जाग्याला उठून बसली. तात्याकडं बघत म्हणाली,

“आसं का व्हं येड्यावानी बोलताय…?

“कशाला बोलतूय येड्यावनी शांता…? न्हाय येड्यावानी बोलंत.. खरं तेच बोलतूय … आयुष्याची चित्तरकथा झाली आपल्या… आयुष्याचा सारीपाट खेळलो आपण… हारलो त्यात आपण… देवानं नुसताच अंधार दिला. उजेड दिला तोबी विझवून टाकला. काय पाप केलं होतं आपण….?

“आवं SSS, आपण न्हाय पाप केलं… नियतीम्होरं कुणाचं काय चालतं का…? आवं नियतीम्होरं देवाचं चाललं न्हाय… लोकं आता परतेक वर्षी पांडुरंगाला आळंदीवरनं – देहुवरनं पंढरपूरला चालत येतात… आठवा बर माऊलीचा छळ केलेला लोकांनी.. किती सोसलं माऊलीनी आणि त्यांच्या भावंडांनी… आता तेच लोक माऊलीच्या पाया पडायला येतात. देव आसून त्यांनी भोगलं- सोसलं आपुन तर माणूसाय… आल्यालं भोग भोगावंचं लागत असत्यातंय मनुष्य जन्मात… दगडाला देवपण उगं येतं का….? न्हाय येत… छनी-हातोड्याचं ठोकं सोसावच लागत्यातं… तवा कुठं देवपण येतं… तुम्ही वंशाच्या दिव्याचं घिवून बसलाय…. आव्हSSS, त्या शेजारच्या तुकाभावचं आन राधा आक्काचं हाल बघा… देवानं पदरात दोन ल्याक घातलं, कोण संभाळतुय आत्ता…? दोघंबी ल्योक बायकाच्या दावणीला बांधली. आयुष्यात सारं कमावल्यालं घेतलं लेकांनी, ह्या दोघांकडं फुटकी कवडी दिकून न्हाय… बसलेत दोघं म्हातारा-म्हातारी शेवटचा श्वास घेण्याची वाट बघत… त्यापरास आपलं बरं न्हाय का….? वंशाला दिवा आसला काय आणि नसला काय… अखेरचा शेवट सगळ्यांचा सारखाच.. बेवारसच मरावं लागतंय सगळ्यांना… आता ही सगळं राहू द्या… तुमाला म्हायताय… त्या वरच्या आळीच्या पांडाआबाचं काय झालं…. तुम्ही गेलताच की त्यांच्या धनीला, लय शिकवला पोराला. अमेरिकेत तिकडं कुठं मोठी नवकरी लागली. लगीनबी त्यानं तिकडंच केलं. त्याला टरकभर पगार हुता… पांडाआबा मेला तर साधा धन द्यायलाबी पोरगा आला न्हाय. मातीलाबी आला न्हाय. गावातल्या लोकांनीच धन दिली शेवटी. बेवारसच मेला ना पांडाआबा.. आसलं दिवस येण्यापरीस वांझुटं राहील्यालं बरं न्हाय का ?

“खरं बोलतीय गं सगळं तू… पण…”  तात्या अर्धच बोलला. शांत बसला. काकूच्या लक्षात आलं…

पुन्हा काकू म्हणली,

“पण काय…? बोला गी पुढं ..”

तात्यानं पुन्हा श्वास घेवून सोडला. मग म्हणला,

“झालं गेलं विसरलोय गं आता… पण मला आता दुसरीच काळजी लागून ऱ्हायलीय गं…. आपल्या दोघांची जोड फुटली तर !! मागच्याचं कसं व्हायचं…? मन स्वतःला खातंय गं… पोखरत चाललंय मन आतल्या आत… सवय झालेय गं दोघांना एकमेकांची आता…”

काकूनं कपाळालाच हात लावला.

“काय तुम्ही..? कुठला इचार करताय..? उगं डोक्याला खुराक लावून घेताय तुम्ही… सात नद्या उतरायच्यायत आजून… जीवाला आलंय तुमच्या… तुम्ही झोपा शांत… माझं ऱ्हायलं बाजूलाच… तुमचं नवीनंच कायतर… त्यला बुड बी न्हाय …अन शेंडा बी न्हाय…”

तात्या काकूकडं बघत म्हणला,

“बर राहुदी माझं.. तुझं काय ती सांग. काय बोलायचाय तुला…?”

काकू थोडंसं हसत म्हणली,

“मला वाटतंय आपण तुळजापूरला जाऊन इवया… मला भवानी मातेचं दर्शन घ्यायचाय… लय दिवस झालं मी देवीला जाईन-जाईन म्हणतीया… जाणंच व्हईनाय… जाऊ या आपण… जायचं ना..?

काकूनं श्वास सोडला…

तात्या हासत म्हणला,

“व्हय-व्हय… जाऊया… तुला जिथं-जिथं जाऊ वाटतंय… तिथं- तिथं आपण जाऊया… तुझ्या मनातली सारी सपनं आपण पुरी करूया…आता राहिलंय काय आपल्या आयुष्यात…? दोन दिसात जाऊया.. तवर तुबी बरी हुचील… मीबी बरा व्हईन…”

काकूचा चेहरा फुलला… काकू उत्साहात-आनंदात म्हणली,

“मग परवाच जाऊया की आपण… मी आता बरीच व्हतीय…”

“व्हय-व्हय..जाऊया परवाच.. झोप आता. मीबी झोपतो, लय रात झालीया…”

सखातात्यानं तोंडावर पांघरून घेतलं. शांताकाकूनं भवानी मातेचं डोळ्यासमोर रूप आठवत डोळं मिटून घेतलं. रात्र गडद होत गेली… दोघांच्या इवळण्याचा आवाज हळूहळू बंद झाला. नुसताच रातकिड्यांचा आवाज घुमत राहिला…

शांताकाकूनं सामानाची आवरा-आवर केली. पिशवी भरली. घरातील भांडी-कुंडी व्यवस्थित ठेवली. अंगावरचं लुगडं बदलून नवं घातलं. शांताकाकूच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत होता. भवानी मातेच्या दर्शनाचा योग आला होता. सखातात्या बाहेर ओट्यावर हनूवटीला हात टेकून भिताडाला पाट देऊन बसला होता. पांढऱ्या दाढीची खुटरं हाताला टोचत होती. तोंडावर निरव शांतता पसरली होती. साखतात्या कसल्यातरी विचारात गढून गेला होता.

शांताकाकूनं फुटक्या आरशाची काच तोंडाम्होरं धरली.करंडात बोट बुडवून मोठं कुंकू कपाळाला लावलं. चेहरा आणखी टवटवीत दिसायला लागला. काच ठिवून दिली. पिशवी उचलली. एक बोचखा काखत मारला. घराच्या बाहिर पडत तात्याकडं बघत शांताकाकू म्हणली,

“व्हय व्हं sss, ही धरा बोचका अन पिशवी…कवाड लावती मी..”

सखातात्या विचाराच्या तंद्रीतून बाहिर आला. काठीचा आधार घेत वाकत उठला. पुढं सरला. पिशवी हातात घेतली. बोचका हातात घेवून खाली ठेवला. मोडकं कवाड शांताकाकूनं पुढं केलं… जूनं कुलूप नुसतंच आडकावलं…

थरथरत्या ओठानं काकूकडं बघत तात्या म्हणला,

“व्हय गं शांता, पैसं घेतलं का घरातलं सगळं बरूबर…? चोरी-बिरी व्हायची इथं… पुन्हा काय करायचं…? घी बरूबर सगळं पैसं..”

“व्हय-व्हय…घेतल्यातंय..”

“सगळं घेतलं का.. ?”

“व्हय घेतल्यातंय..”

शांताकाकूनं बोचखा काखत मारला. घराकडे वळून नजर टाकली. घर डोळ्यात साठवलं. आक्खी हयात त्या छपरात गेली होती. आयुष्यभर आधार त्याच घरानं दिला होता. जिवाभावाचं घर झालं होतं. घराविषयी जिव्हाळा निर्माण झाला होता. त्या घराला डोळ्यात साठवून काकूनं मान वळवली. तात्या पुढं काठीच्या आधारानं रस्ता चालायला लागला …मागं काकू चालायला लागली. रस्ता मागं – मागं जात होता…

भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here