निरगाठ – Marathi Katha Nirgath

2
2369

Marathi-Katha-nirgath

लेखक – रघुनंदन देसाई
संपर्क – nandandesai7@gmail.com

निरगाठ – Marathi Katha Nirgath

मितालीला एअरपोर्ट वरून पुण्यातील घरी येता येता पहाटेचे चार वाजून गेले होते.जवळपास दोन वर्षांनी ती पुण्यात येत होती.यावेळी आईने अगदीच आग्रह केला म्हणून नाहीतर स्वतःच्या इच्छेने ती काही घरी आली नसती.एकतर सततचा तोच तोच लग्नाचा कंटाळवाणा विषय,त्यामुळे येणाऱ्या पलाशच्या नात्याच्या कटू आठवणी आणि कोणतेही ठोस उत्तर न मिळता केवळ मनात रेंगाळणारे  एकटेपणाचे विचार यापासून ती कायम पळ काढत होती.खरंतर इतकी vulnerable आणि insecureती कधीच नव्हती किंवा आपण तसे आहोत याची तिला जाणीव नव्हती.पण;पलाशशी असलेले तिचे नाते तुटले आणि ती आतून पार कोलमडून गेली.जीव ओवाळून टाकावा इतके प्रेम ज्याच्यावर केले त्याच्या आणि आपल्या नात्याला अर्थपूर्णता न येणे या इतके मोठे दुर्दैव ते काय अशी खंत तिच्या आत खोलवर होती.सहजीवन म्हणजे काय,जोडीदाराच्या अनुरूपतेचे नेमके निकष काय असे  अनेक गुंतागुंतीचे  प्रश्न तिच्या मनात होते आणि केवळ प्रेम हे या साऱ्या प्रश्नांचे उत्तर नाही हे तिला कळून चुकले होते.साथीदाराबरोबरचे नाते अपयशी होते म्हणजे नेमके काय होते हे बाहेरून बघणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीला कधीच कळू शकत नाही.ती केवळ त्या नात्याची हार नसते,तर ते एक प्रश्नचिन्ह असते,तुमच्या निवडीवर,आत्मविश्वासावर आणि खरंतर संपूर्ण व्यक्तिमत्वावरच..ज्याचे उत्तर मिळेलच याची खात्री नसते.इतक्या सहज दुसऱ्या व्यक्तीशी नाते कसे जोडू मी? आणि पुन्हा तोच मनस्ताप,एकटेपणा आला तर काय करू?त्यापेक्षा आत्ता आहे तशी स्वतंत्र,स्वावलंबी आहे यात काय कमी आहे?असा सगळा विचार मिता करत होती.

“रानडे सदन”मध्ये मितासाठी आईने संध्याकाळी एक छोटीशी पार्टी ठेवली होती.जवळचे मित्रमैत्रिणी,नातेवाईक असा लहानसा कार्यक्रम.माईआज्जी मात्र तिच्या अनुवादाच्या कामासाठी बंगलोरला गेली होती.मिता आणि आज्जीची खूपच छान गट्टी होती.मिताला आज्जीविषयी नितांत आदर होता.वयाच्या सत्तरीतही आज्जीचा उत्साह,तिचे कामावरचं प्रेम,जगण्याचा व्यापक दृष्टिकोन आणि सतत नावीन्याचा ध्यास तिला थक्क करायचा.नेमकी आज्जी आता इथे नसल्यामुळे तिला थोडी रुखरुख वाटत होती.आईने पार्टीत मिताची ओळख अनेक नव्या लोकांशी करून दिली.मितालाही छान वाटले.एकतर इतक्या  काळानंतर ती अशा खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठी वातावरणात आली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी आईने पुन्हा एकदा मिताच्या लग्नाचा विषय काढला.पार्टीत ओळख करून दिलेल्या मंदारला मिताने निदान एकदातरी भेटावं आणि यासंदर्भात बोलावं असा आईचा आग्रह होता.तोसुद्धा मितासारखाच अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक होता.मिता चिडून यावर काही बोलणार इतक्यात बाबा म्हणाला,”मितू,आत्ता काहीही बोलू नकोस.शांतपणे विचार कर अगं.आम्हाला कसलीही घाई नाही आणि तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही.आणि हो,अगं माईने बंगलोरला जाताना तुझ्यासाठी एक पत्र दिलं आहे,ते सांगायचंच राहिलं.माईच्या अभ्यासाच्या टेबलच्या पहिल्या कप्प्यात असेल.नक्की वाच..”माईआज्जीचं पत्र म्हणजे मितासाठी खजिनाच होता.मंदारचा विषय तिथेच टाकून मिता ते पत्र वाचायला धावली.माईआज्जीच्या खोलीत तिच्या अभ्यासाच्या टेबलावर खूप पुस्तके होती.मिताने घाईने पहिला कप्पा उघडला आणि ते पत्र घेतलं.माईआज्जीच्या खोलीला जुन्या काळाचा,आठवणींचा एक दुर्मिळ सुगंध होता.पुस्तकांचा सहवास होता.मिताला आज्जीबरोबर तिथे तासनतास गप्पा मारायला खूप आवडायचं.मिताने त्या खोलीतील तिची लाडकी खुर्ची घेतली आणि माईआज्जीच्या सुरेख हस्ताक्षरातलं ते पत्र वाचायला सुरुवात केली.

“प्रिय मितू,

सर्वांत आधी खूप सॉरी बाळा..मी तिथे आत्ता नाहीए  म्हणून.खरंतर मी तुला एअरपोर्टवर घ्यायलाच येणार होते अगं..पण कामासाठी अचानक बंगलोरला जावे लागतंय.आता फोनवर बोलणे होईलच आणि मी येईनच लगेच एका आठवड्यात,तेव्हा पोटभर गप्पा मारुयात आणि खूप धमाल करूयात.मला काही इंग्रजी चित्रपटांविषयी तुझ्याशी बोलायचे आहे आणि माझ्या नवीन कामाविषयीसुद्धा सांगायचे आहे.पण खूप दिवसांपासून एक गोष्ट तुला सांगायची होती.राहून जात होते ते सांगणे.म्हणून खास त्यासाठी हा पत्रप्रपंच.इथे पत्र लिहीताना एक ठेहराव असतो बघ. मला तो आवडतो.असो. तर ही गोष्ट आहे रजनीची.लहानपणी ज्या तन्मयतेने गोष्ट ऐकायचीस ना तशी एक.बघ आवडतीये का?

साधारण पन्नास वर्षांपूर्वीची हो गोष्ट आहे बरं का..साधारण विशीतल्या रजनी परांजपेची.सांगलीतल्या एका मोठ्या वाड्यात रजनी तिच्या आई ,बाबा,आज्जी आणि चार भावंडांसोबत राहात होती.घरात सर्वात धाकटी असल्याने लाडात वाढलेली ही मुलगी.त्यात लहानपणापासूनच हट्टी,बंडखोर आणि चिडखोर स्वभाव.अगदी तुझ्यासारखा.एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की ती पूर्ण होईपर्यंत हिची तगमग आणि त्रागा सुरूच.रजनीच्या आईला फार घोर लागून राहायचा.ती रजनीला समजवायची,रागवायची पण ही कधी बधली नाही.रजनीला कवितांची,लेखनाची,साहित्याची भारी आवड.ती सुद्धा कविता करायची.तारुण्यातले सगळेच रंग भारी मोहक.रजनीही त्या रंगांने रंगलेली.ती तिच्या कविता,लेखन फक्त माधवला ऐकवायची.’माधव’,तिचा सर्वांत जवळचा आणि लाडका मित्र.दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम.’जन्मजन्मांतरीचं नातं’ असं ते म्हणत या नात्याला.माधवलाही साहित्य आणि कलेची मनापासून आवड होती.”कुसुमाग्रज”त्याचे आवडते कवी होते.त्यांच्या “विशाखा” काव्यसंग्रहातील कविता तो इतक्या सुंदर वाचायचा कि रजनी थक्क व्हायची.जाईच्या फुलांची ओंजळ तो नेहमी रजनीवर उधळायचा.गंधित जग होते त्या दोघांचं.त्यांनी त्यांचं स्वतःचं, हक्काचं जग तयार केलं होतं.त्यात तिसऱ्या व्यक्तीला प्रवेश नव्हता.फक्त रजनीच्या जिवलग मैत्रिणीला ‘सरिताला’हे माहीत होतं.बाकी कुणालाही नाही.”माधव”रजनीच्या अगदी विरुद्ध.त्याचा स्वभाव इतका शांत,संयमी आणि हळवा होता की  रजनीला कधीकधी त्याची खूप काळजी वाटायची.रजनीचा हट्टीपणा,तिची चिडचिड तो शांतपणे समजून घ्यायचा.माधवशिवाय आपल्या आयुष्याची कल्पना रजनीने स्वप्नातही केली नव्हती.

सरकारी नोकरीसाठी माधवची खटपट चालू होतीच.त्याला नोकरी मिळाली की दोघांनाही घरी सांगता येणार होतं.घरच्यांचं म्हणणं काय असेल याची दोघानांही कल्पना नव्हती पण जे काही होईल त्याला दोघांनी मिळून तोंड द्यायचं त्यांनी ठरवलं होतं.त्या दिवशी संध्याकाळी माधव रजनीला भेटायला आला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेलाच होता.रजनीने खोदून खोदून विचारले तेव्हा कळलं  की त्याला कामासाठी मुंबईला जावे लागणार होते.तिकडे त्याचा मामा होता.नोकरीसंदर्भातच काहीतरी काम होतं पण;माधवला मुंबईला जायची अजिबातच इच्छा नव्हती.नेमके कारण त्यालाही सांगता येत नव्हतं पण;खूप अस्वस्थ वाटत होतं.रजनीने त्याला समजावलं.व्यावहारिक जगात अनेकदा भावनांना बाजूला ठेवून योग्य आणि अयोग्य याचे निर्णय कोरड्या कर्तव्याच्या कसोटीवर घ्यायचे असतात.रजनीने त्याला जाण्याचा आग्रह केला.माधवही नाईलाजाने का होईना जायला तयार झाला.मुंबईला जायच्या आधी संध्याकाळी माधव आणि रजनी त्यांच्या  नेहमीच्या ठिकाणी भेटले.त्यादिवशी मात्र त्यांचा नेहमीचा आनंद,उत्साह आणि खळाळ नव्हता.निघताना माधवने रजनीला डोळे भरून पाहिले.तिच्या डोक्यावर हक्काने हात ठेवलाआणि जाताना नजर चुकवून तो घाईघाईत निघून गेला.रजनीचे डोळे पाणावले आणि मितू, विचित्र गोष्ट अशी की  माधव गेला तो परत कधी आलाच नाही.रजनीचे आयुष्यच गोठून गेले त्या जागी.ती रोज त्यांच्या नेहमीच्या जागी जायची.दिवसदिवस त्याची वाट बघायची.सरिताही असायची तिच्यासोबत.माधवचा नेमका पत्ता तिला माहित नव्हता त्यामुळे त्याला नेमके कुठे आणि कसे शोधायचे हेच तिला माहित नव्हतं.माधवशिवाय तिला दुसरं जगच नव्हतं आणि आता हे जगच तिच्यासाठी हरवलं होतं.शिवाय हे सगळं घरी सांगायची सोय नव्हती आणि नेमके सांगणार तरी काय आणि कसं?नक्की काय झालंय हे तिचं तिलाच कळत नव्हतं.आपल्याला फसवणाऱ्यातला माधव नाही हे तिला पक्कं माहित होतं.पण मग घडलं काय?कुठे गेला तो?काय झालं त्याला?निघतानाची त्याची अस्वस्थता न ओळखता आपणच त्याला मुंबईला जायला भरीस पाडलं..आपण त्याला  समजून घ्यायला कमी  पडलो का?यासारख्या असंख्य प्रश्नांनी तिला भंडावून सोडले होतं.

आतातर घरच्यांनीही रजनीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती.पुण्यातलं एक स्थळ सर्वांनाच आवडलं.पसंत पडलं.मुलाचं नाव “भास्कर”होतं.पुण्यातल्या स.प महाविद्यालयात तो मराठीचा प्राध्यापक होता.रजनी माधवशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणं शक्यच नव्हतं.पण हे धीटपणे सर्वांना सांगायला आता माधवच नव्हता.रजनीला स्थळाला होकार देणे क्रमप्राप्तच होतं. तिची प्रचंड चिडचिड व्हायची.ती स्वतःला त्रास करून घायची.सगळ्याचा राग-राग करायची पण;सरिता सोडून बाकी कुणालाही ह्याचं नेमकं कारण कळत नव्हतं.भविष्याबाबतची काळजी आणि मुळातलाच हट्टी,चिडखोर स्वभाव यामुळे हे होतं असावं असं घऱच्यांना वाटायचं.रजनी स्वतःच्या लग्नात अजिबातच खुश नव्हती.ती केवळ शरीराने तिथे होती.मन मात्र अजूनही आर्ततेने माधवला हाकारत होतं.पण;माधवचा प्रतिसाद काही आला नाही..शेवटपर्यंत…

पुण्यात रजनीच्या सासरच्यांचा खूप मोठा वाडा होता.सांगलीसारखाच.बाहेर मोठा झोपाळा होता.घरात सासूसासरे,आज्जेसासू,धाकटा दीर आणि एक नणंद होती.नव्या सुनेचे सर्वांनाच भारी कौतुक.लग्नानंतर घरच्यांनी रजनीचं नाव बदललं.रजनीसाठीही स्वतःच्या नावासोबत माधवचं  नाव नसणं अमान्यच होतं.त्यामुळे तिनेदेखील बदललेले नाव स्वीकारलं.मात्र मनातला राग,त्रागा,खदखद सारं तसंच होतं.एक अढी होती तिच्या मनात.लग्न झाल्या दिवसापासूनच रजनी तिच्या पदराला एक गाठ मारायची.माधवसाठी.ती गाठ स्वतःवरच्या,माधववरच्या,देव आणि नशिबावरच्या रागाची गाठ होती.याशिवाय ती काही करूही शकत नव्हती.सांसारिक जबाबदाऱ्या तिच्या अंगावर येऊन पडत होत्या.तिचा स्वतःवरचा राग,तिचा त्रागा भास्करला कळायचा.पण;त्याचं नेमकं कारण त्यालाही माहित नव्हतं.त्याचीही तगमग व्हायची.नव्या संसारातला उत्साह आणि आनंद रजनीच्या आणि त्याच्या नात्यात नव्हता.अगदी श्रावणातले सणवार,जेवणावळी,नवरात्र,दिवाळसण हे सर्व करत असतानाही पैठणीची गाठ मात्र कधी सुटली नाही.संसारातल्या कर्तव्याला रजनी कधी चुकली नाही त्यामुळे बाकीच्यांसाठी अगदी आदर्श जोडपं होतं.भास्करने मात्र रजनीला नेहमी तिचा स्वतःचा वेळ दिला.कधीच लग्नाच्या नात्याला आणि स्वतःला रजनीवर लादले नाही.भास्करची समंजस साथ,त्याचा ठेहराव रजनीला आवडू लागत होता तरीही माधवचं तिच्या मनातलं स्थान भास्करला संपूर्ण स्वीकारण्यात अडथळा ठरत होतं.काळ सर्वांवरचं जालीम औषध आहे असं म्हणतात, रजनीलाही ते अनुभवास येऊ लागलं.आपल्या आणि माधवच्या बाबतीत जे घडलं त्यात भास्करची काहीही चूक नव्हती हे तिला आधीपासूनच माहित होतं.आता भास्करच्या सहवासाने तिने ते अधिक समंजसपणे स्वीकारायचे ठरवलं.तिने जाणीवपूर्वक तिला होणारा त्रास हळूहळू कमी करायचा ठरवला.एकदा मुंबईवरून येताना तिने भास्करच्या खांद्यावर  हलकेच डोकं ठेवलं आणि साश्रूनयनांनी,स्वतःला सावरत आपल्या मनातील माधवची प्रतिमा जाणीवपूर्वक पुसायचा प्रयत्न केला आणि शांतपणे आपल्या पदराला असलेली गाठ सोडवली.खऱ्या अर्थाने मोकळं होण्याचा प्रयत्न केला.तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या या आव्हानात्मक काळात भास्करने तिला खूप सांभाळून घेतलं.कधीतरी माधवच्या आठवणीने तिला प्रचंड त्रास व्हायचा पण भास्करच्या असण्याने हळूहळू तो ही कमी होत गेला.नंतर एक दिवस सरिता पुण्याला येऊन भेटली तेव्हा तिच्याकडून रजनीला कळालं की माधव मुंबईला गेला तो परत कधी घरी आलाच नाही.तिकडच्या ट्रामच्या अपघातात कदाचित तो गेला असं म्हणतात पण;खात्रीपूर्वक काहीच सांगता येत नाही.त्यादिवशी मात्र  रजनी अक्षरशः धाय मोकलून रडली.सगळेच बांध फुटत होते.सगळं सगळं वाहून जात होतं.रजनी आणि माधवच्या नात्याला आणि विरहाला त्यांच्या  हक्काचा आणि गरजेचा पूर्णविराम मिळाला होता.

माधव रजनीच्या आयुष्यातून गेल्यापासून तिने कविताच करणं बंद केले होतं.भास्करच्या साथीने आणि प्रोत्साहनाने तिने पुन्हा कविता करण्यास सुरुवात केली.लेखन करण्यास सुरुवात केली.रजनीच्या पुढील शिक्षणासाठीदेखील भास्करचाआधीपासूनच आग्रह होता. भास्करमुळेच तिच्या जगण्याला नवे आयाम मिळत होते.भास्करचा सर्वार्थाने साथीदार म्हणून स्वीकार करताना तिने माधवबद्दल त्याला सर्वकाही सांगून टाकले.भास्करला याची जाणीव होतीच.त्यानेही सगळं समजून घेतलं.आयुष्याच्या प्रत्येक चढउतारावर तिला भास्करची समंजस आणि प्रगल्भ साथ मिळाली.”Still waters run deep”असं म्हणतात ना तसा होता भास्कर.त्यामुळे त्याचं आणि रजनीचं सहजीवन अर्थपूर्ण होऊ शकलं.मात्र;रजनीने आपल्या पदराची गाठ सोडलीच नसती तर काय?तिने आयुष्य मोकळ्या मनाने स्वीकारायचे ठरवलं म्हणून भास्कर आणि ती यांत रंग भरू शकल्या.तिच्या हट्टीपणामुळे याला उशीर झाला असेल पण ती वास्तवाला,आयुष्याला भिडली आणि मग आयुष्याने तिच्यासाठी पुन्हा तशीच जाईच्या फुलांची ओंजळ दिली.

मितू,मी हे सगळं तुला का सांगते आहे हे न कळण्याइतकी तू मूर्ख नाहीस.पण;माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगते की प्राक्तन आणि नशिबाला तुम्ही खिजगणतीत नाही टाकू शकत.प्रयत्नांचं महत्त्वही याने अजिबातच कमी होत नाही मात्र आयुष्याला आपलंसं करायची,स्वीकारायची ताकद मात्र नक्की वाढते.पलाशच्या आणि तुझ्या नात्यातील आधुनिक गुंते कदाचित मला कळणार नाहीत पण;तुझी तगमग रजनीसारखीच आहे हे मला समजतंय.एका नात्याच्या अपयशाने सहजीवनाविषयी मनात कटुता आणि अढी बाळगू नकोस.आयुष्याच्या या आनंदयात्रेत एखादी वाट निसरडी आली म्हणून काय झालं,अनुरूप आणि समर्थ सोबतीला निवडलास तर प्रत्येक क्षणाचा सोहळा होईल.स्वतःतच स्वतःला बंद केलंस तर मात्र छोट्या छोट्या आनंदांना मुकशील.रजनीने पुढे जायचा निर्णय घेतला तेव्हा तिची तगमग हळूहळू कमी झाली.ती तिथेच गोठून राहिली असती तर?तिच्या गुंतागुंतीच्या कोड्यात ‘माधव’ हा कितीही महत्वाचा आणि मोहक तुकडा असला तरीही शेवटी  तो एक तुकडाच.संपूर्ण कोड्याचे उत्तर नाही. रजनीच्या आयुष्यातले ‘माधव’नावाचे सोनेरी पिंपळपान तिच्या मृत्यूबरोबरच जाईल पण त्यासाठी तिने आपलं संपूर्ण आयुष्य पणाला नाही लावलं…तिच्यासाठी माधव एक सुंदर आठवण आहे पण ते तेवढंच.तू कितीही नाकारलंस तरी तुझ्यातला खोलवरचा एकटेपणा जाणवतो मला..मितू,आधीची पायरी सोडलीस तरच पुढच्या पायरीवर जाता येईल ना तुला.आणि आम्ही सगळे आहोतच की तुझ्यासोबत… कायम.

मितू,एक सांगते, मी भेटले आहे मंदारला.चांगला मुलगा आहे तो.निदान एकदा भेटूनतरी बघ.आपल्या दोघींच्याही आवडत्या “Tuesdays with Morrie”मधे आहेच ना,”Dont let go too soon but;dont hold on too long.”मी माझ्या पदराची गाठ सोडवली.तू कधी सोडते आहेस?मी वाट बघते आहे.

तुझीच माईआज्जी,

श्रीमती.मालती भास्कर रानडे.

पत्र वाचून मितूचे डोळे पाणावले. तिने मोबाईलमधला आज्जीचा फोटो घट्ट उराशी धरला.तितक्यात तिच्या शेजारील बंद असलेली खिडकी झपकन उघडली.मंदारला निदान भेटून बघूयात का असा विचार करत मितू आज्जीला फोन करण्यासाठी बाहेर धावली. गाठ थोडीशी का असेना सैल होत होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here