लेखक : मंगेश उषाकिरण अंबेकर
संपर्क : mangeshambekar@gmail.com
काटकसर – Marathi Katha Katakasar
मंजिरी आणि राघव नुकतच लग्न झालेल एक नवं कोर जोडपं, लग्नला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले, कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्याकडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते. मंजिरीनच्या हळुच विचारल, “राघव, तु टीप का नाही दिली त्या वेटरला.”
“का त्याने तुला मागितली होती का?” राघवने तिला मिश्कीलपणे प्रतिप्रश्न केला.
“तसं नाही रे, मी दोनतीन वेळा ओब्जर्व केलं की तु कोणाला टीप देत नाही, कंजूस कुठला?.”
राघव हलकस गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढें चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेलाच एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा,अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती.
तीने चुलीवर पातेलं ठेऊन त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजुला टाकली. मंजिरी हे सगळं पहात होती आणि राघवच पण लक्ष त्या बाईकडे गेलं.
तिथून थोडंस पुढे येत नाही की मंजिरी राघवला बोललीच, “बघ भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅग मध्ये थोडंस पाणी विसळुन ते पण काढून घ्यायचे सांगते, किती हा कंजूसपणा.” मंजिरीचा लग्नापासून ते आतापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग, शेवटी असा नकळत बाहेर पडलाच.
राघव ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली फक्त पुन्हा जरासा हसला. राघवचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याच्या अबोला मंजिरीला अजून खिजवून गेला. आता मंजिरीला काही राहवेना आणि शेवटी तिने त्याला बोलत करण्यासाठी परत खनकावून बोललीच, “अरे, बघतोस काय शुंभा सारखा, बोल काहीतरी, किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा.”
राघव चेहऱ्यावर तेच मिश्किलहसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहचले होते. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाssडकन जोरात लावला. “अग, इतक्यात जोरात दरवाजा लावायची काय गरज, माझा राग त्या दरवाज्यावर कशाला काढतेस.” शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच.
“अरे हो सॉरी हा मला तर लक्षातच नाही आल की, एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील.” चढ्या आवाजात मंजिरी बोलली.
“पण तू का चिडचिड करतेय एवढी, उगाच स्वतःला त्रास,शांत हो जरा” राघव तिला समजवण्याचा प्रयन्त करू लागला.
“चिडू नाहीतर काय करू, जाऊदे…..तूझ्या सारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहेत तुम्ही सगळे” एवढं बोलून मंजिरी गप्प झाली.
“अग,हो… हो….हो…रागाच्या भरात, तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोहचलीस मंजू. शांत हो बघू तू पहिले.” हे राघवच बोलणं ऐकून मंजिरी थोडीका होईना शांत झाली पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली.
राघवने वाटेत गाडी पेट्रोलपंपाकडे वळवली.
“मंजू तुझ्याकडे दोन हजार आहेत का असतील तर त्याला दे आणि त्याला सांग दोन हजाराच पेट्रोल भर.”
आधिच चिडलेल्या मंजिरीने तावातावात कारची काच खाली करत गाडीच्या डाव्याबाजूला उभ्या असलेल्या कामगाराला हाताची दोन बोटे उंचावुन पेट्रोल भरण्याचा इशारा केला.
कामगाराने दोन हजारच पेट्रोल भरलं. मंजिरीने पर्स मधून दोन हजार काढले आणि कामगाराच्या हातावर टेकवले आणि काच वर केली. राघव कार सुरू न करता तिच्याकडेच बघत राहिला.
“अरे चल आता दिले त्याला पैसे.” डोळे मोठे करत मंजिरी बोलली.
“मंजू अग हे काय तू त्याला दोन हजारच दिले, टीप कुठे दिली.” राघव अगदी मिश्कीलपणे बोलला.
“अरे, पंपावर कोणी टीप देतं का, त्याला कसली टीप तो तर त्याचं काम करतोय.” मंजिरी बोलली
“देअर यु आर! अबसोलुटली राईट, हेच तुझ्यापहिल्या प्रश्नाचं उत्तर, तो वेटरही त्याचच काम करत होता, ज्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो. मंजू त्या वेटरला इच्छा नसतांनाही आपण स्वतःहुन त्याचा स्वाभिमान का दुखवायचा.”
“म्हणजे, तुला नेमकं काय म्हणायचं” मंजिरने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
“जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाचच त्याचा आत्मभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमर कडूनही असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या. कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं यात खरंच काही अर्थ आहे का?, त्या पेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल, नाही का?” राघवच्या या ह्या विश्लेषणावर मंजिरी कडे उत्तर नव्हते . ती एकदम शांत झाली.
राघवने पुन्हा गाडी सुरू केली आणि मंजिरीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर बोलता झाला.
” मंजू मलाही प्रचंड चिड आहे मम्मीपप्पांच्या ह्या अश्या वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट आर्धीच घ्यायची काय तर म्हणे एवढ्याश्या लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही, नव्या साबनाला कायम विरघळलेल्या साबनाचा तुकडा चिपकलेलाच असायचा.
दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच, त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब.
नवीन कपडे सणालाच घेतल्या जायचे, सणाला काय म्हणतोय मीपण….. दिवाळी…. फक्त दिवाळीलाच घेतले जायचे, त्यातपण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोण्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचं ‘अरे ही तर दामल्यांची बॅंजोपार्टी दिसते.’
बाजारात पप्पांनसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिम्लेटच्या गोळ्या पडायच्या. आम्हीपण शहाणे होतो आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो त्यावेळी आपसूकच फुगा भेटायचा.
कॅडबरीच चॉकलेट म्हणजे ‘ना पोटला ना ओठाला फक्त पैश्याचा वाटोळा’ ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही, हा पण त्यामुळे दात शाबुत राहिले तेवढं मात्र खरं.
एकदा कलर टिव्ही घ्यायचं ठरलं होतं घरून दुकानात आणि दुकानातून घरी ये पर्यंत कलरच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये रूपांतर झालं होतं. बारावीत लुना मागितली होती तर अटलसची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ्फsss काय काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मीपप्पा .” आतापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा राघव, एवढं बोलून दीर्घ स्वास सोडत एकदम गप्प झाला.
मंजिरी त्याच बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघतच राहिली. त्याला बोलतांना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली.
“चला आता पासून तुपण या दामले घराण्यात सामील झालीस. पण तुला खर सांगू मंजू, त्यांच्या ह्या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैश्याची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेता वेळी आली. कधी देव्हाराच्या मागे तर कधी साखरेच्या डब्ब्यात गुपचूप लपवलेल्या पैश्याची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड, लोणची विकून साठवलेल्या पैश्याची किंमत आजीच्या आजारपणाच्या
वेळी आली आणि पप्पांच्या फाटक्या बनियानाची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझं इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळी पहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असतांना मम्मी पप्पांनी चुकूनही कधी कोणाच्या पैश्याची मदत पडली नाही किंवा पडलीही असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. अस करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं ते कळलंच नाही.
ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू ही शकलो नसतो. कधीकधी फार वाटत की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाही पण आज कळतं त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींच मोल कळल नसत, आणि मोलच कळले नसते तर आज मिळणार सुखही आळणी वाटलं असतं.” हे सांगतांना राघवचे पाण्याने डबडबले होते.
हे सगळं ऐकून मंजिरीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्यांची कार घरच्या समोर येऊन थांबली. दोघे कारमधेच बसून राहिले. मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावरने आपलं डोकं टेकवत म्हणाली “सॉरी राघव, मला कळलं…..मम्मीपप्पांनीं जे सगळं केलं ते खरचं बरोबरच होतं, पण आता तुम्ही दोघे एवढं कमावता झालात आता तरी साठवलेल्या पैश्याचा एन्जॉय घ्यावा आणि आता नाही तर कधी करणार ते एन्जॉय. एवढीच माझी अपेक्षा आहे.”
राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीच डोक थोपटत बोलला, “असं नाही ग…. त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही ह्या काटकसरीत टप्प्या-टप्प्याला करून घेतली, फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटातो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमधे तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त त्या बेनटेक्सच्या बंगड्यामधे.
पप्पांना कधी जुन्या टूव्हीलरच्या खरेदीमधे तर मंडई मधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामधे. ते दोघेही त्यांच्या काटकसरीत वाचलेल्या पैश्याचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहे.” राघव एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. राघवने स्पिकर ऑन केला.
राघव : “हा मम्मी बोल, पोहोचलात का?
राघवची मम्मी : “हो राघू आम्ही पोहचलो पंढरपुरात.”
राघव: “बरा झालाना तुमचा प्रवास”
मम्मी: “अगदी व्यवस्थित बघ फक्त दोनशे रुपयात पोहचलो.” फक्त दोनशे रुपये सांगताच राघव आवक झाला.
राघव: दोनशे!!!! अग मी तर तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमधे बसवलं होतं, मग सातशेचे दोनशे कसकाय?”
मम्मी: अरे राघू, तुला माहितेय ना तुझ्या म्हाताऱ्याला ए.सी.चा त्रास होतो, म्हणून आम्ही ती गाडी सोडून एस.टी.च्या बसमध्ये येऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला तोही फक्त दोनशेत.” राघव हसला आणि डोक्या हाथ लावत बोलला.” कशे ग तुम्ही”
मंजिरीचे डोळे मम्मीचे बोलणं ऐकून पाणावले आणि चेहऱ्यावर हलकस हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत ती ही बोलती झाली, “लव यु सो मच मम्मी-पप्पा, काळजी घ्या आणि लवकर या, मिस यु बोथ, मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटतेय.”
मम्मी: “अरे मंजू, थँक् यु बेटा, तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला राघू आहे सध्या, आणि हो तुला सांगायचं विसारलेच.”
मंजिरी: “काय मम्मी?”
मम्मी: “अग घरात तुम्ही दोघंच म्हणून….”
‘म्हणून’ नंतरच्या पॉजला मंजिरी आणि राघव दोघेही बावरली.
मंजिरी: “म्हणून काय मम्मी?”
मम्मी:” म्हणून…. म्हणून काही नाही ग…. दुधावाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली मी.” राघव आणि मंजिरी दोघ खदखदून हसु लागले.
मंजिरी: “ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी नका करू, एन्जॉय करा.”
मम्मी: “दोघेही अशेंच हसत रहा, चल आत्ता गजानन महाराज्यांच्या भक्तनिवसात पोहोचलो, मग करते नंतर कॉल”
मंजिरी : “ओके बाय”
राघव: “ओके बाय, काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची”
मम्मी: “हो आणि तू दामलेंच्या सुनेची काळजी घे.”
“पाहिलंस ना मंजू, कसे पोहचले त्यापेक्षा पैशे वाचण्याचा आनंदच त्यांना जास्त, एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करूकरू ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्याछोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैश्यांचाच आनंद घेतात. त्यांनी झटकन फेकुन न देता विसळुन घेत एकएक थेंब थेंब करून सगळं साठवलं म्हणून सुखाचं एवढं मोठं तळ साचलय. छोटतल्या छोट्या गोष्टींचीही कदर केली म्हणून आज ते इथवर पोहोचले नाहीतर दारिद्र्य तर वाट पाहतच होतं.”
मंजिरीचा मम्मी-पप्पा विषयी आदर वाढला होता.ल, संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता. मंजिरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राघवचा खांदा केव्हाच भिजला होतो. मंजिरी “खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत, मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच.”
समाप्त
लेखक: मंगेश उषाकिरण अंबेकर
Thank you team