Marathi Kavita – Arth Abhalacha Gahira – अर्थ आभाळाचा गहिरा
कवी – गौरव भिडे
फुलूनी आले चराचर, बरसती पाऊसधारा,
धारांमधूनी उलगडे अर्थ आभाळाचा गहिरा..
वियोग आभाळाचा, परी धरणीशी नाते जुळे,
गात्रागात्रातूनी सृष्टीच्या चिंब पाऊस कोसळे
येथल्या कणाकणाशी पावसाचे नाते आगळे
स्पर्श पावसाचा होता, लाट किनारी उसळे
अशा पावसात सजे तरुंचा सुरेख मनोरा,
धारांमधूनी उलगडे अर्थ आभाळाचा गहिरा..
मनास मोहिनी घाली, हा ऋतूंचा ऋतुराज,
शब्दांची या उडे धांदल, वर्णावया साज ..
मोद शिंपीत पाऊस होई चहूकडे विराज
वा-यासवे पावसाचा दूरवरी घुमतो गाज ..
गिरक्या घेत भिरभिरणारा जणू हा भोवरा,
धारांमधूनी उलगडे अर्थ आभाळाचा गहिरा..
पाऊस होता शांत, हळूच डोकावे ऊन
चहूकडे हिरवेपण डौलात येई उमलून..
हळूहळू वाढे ऊन, तापून जाई अंगांग,
पुन्हा एकदा आभाळी बहरे पाऊसरंग
युगानुयुगे रंगे ऊन पावसाचा हा खेळ सारा,
धारांमधूनी उलगडे अर्थ आभाळाचा गहिरा..
गौरव भिडे .
धनकवडी , पुणे – ४३
८६०५८७६३१४