Marathi Kavita – Bhiti – भीती
कवयित्री – नीता शेंडे
आज तुलाच सांगणार आहे .
तु समोर येताच मिटणाऱ्या पापण्यांच गुपित.
धडधडणाऱ्या काळजाला घेऊन मुठीत.
पहिल्यांदाच धाडस करुन ,
तुझ्याच डोळ्यात डोळे घालुन,
पाहणार आहे तुला डोळे भरून.
मी का नाही जाणल या आधी,
अंतर्बाह्य अनुभवलेल्या तुला?
आजच कसं झालं हे धाडस ?
हे ही ऐकवायचय तुला.
तुला पाहुन आक्रसुन जाणारी मी
आज कुशीत घेऊन जोजावत श्रांत करणार तुला.
गुदमरणाऱ्या श्वासाला मोकळं करत
भरभरुन घ्यायचंय आत जीवनाला.
मला माहित झालंय मोकळ्या श्वासा इतकं काहीच नाही किमती.
मी घाबरले की तु होतेस मोठी.
मी सामोरी आले की तु होतेस छोटी
*भीती ग,*
आज तुलाच सांगणार आहे .
तु समोर येताच मिटणाऱ्या पापण्यांच गुपित.
धडधडणाऱ्या काळजाला घेऊन मुठीत.
नीता शेंडे