MISS (My Innocent School Story) – आठवण(एक शाळेतील गोष्ट)
दुपारची वेळ होती. मी, माझ्या समोरील असलेल्या खिडकीतून बाहेर बघत होतो. बाहेर रखरखीत उन पडले होते. सर्वांचा लंच झाला होता. डोळ्यावर एकप्रकारची तंद्री आलेली. सकाळच्या सत्रात सर्वांनी आपापली कामे बऱ्यापैकी उरकलेली होती. ऑफिसमध्ये साहेबसुद्धा नव्हते त्यामुळे सर्वाना आता आराम करण्यासाठी वेळ मिळाला होता. बाहेरचे उन डोळ्यांना त्रास देत असले तरी आतील ए.सी. च्या वाऱ्याने अंगावर काटा उभा राहत होता. अशा या वातावरणात ऑफिसमध्ये सगळे सुममध्ये असताना अचानक बाहेर अंधार दाटून आला. कोणाच्याही मनी नसताना ते आभाळ एकदम पावसाचे ढग घेऊन आले. त्याचबरोबर सर्वांमध्ये एक उत्साह निर्माण झाला. अचानक जोराचा वारा सुटला अन वीज गेली. सगळीकडे अंधार पसरला. सर्वांनी आपापले कॉम्पुटर धडाधड बंद केले. सर्वजण येणाऱ्या पावसाची उत्सुकतेने वाट पाहू लागले.
“स्यान, ती खिडकी उघड ना!” केसी माझ्या समोरच्या खिडकीकडे हात दाखवत म्हणाली.
मी मागे वळून एकदा तिच्याकडे पहिले. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मला वाटले आता जर पाउस आला तर ही नक्कीच त्या पावसात भिजणार. मी हसत हसतच माझ्या समोरची खिडकी उघडली. खिडकी उघडताच गार वारे आतमध्ये येऊ लागले. थोड्याच वेळात पाउस पडायला सुरवात झाली. समोर खूप मोठे झाड असल्यामुळे डायरेक्ट आभाळातून पडणारा पाउस आम्हाला पाहता येत नव्हता. त्या झाडावरून पडणारे मोठे मोठे पावसाचे थेंब पाहत व त्या थेंबामुळे होणारा आवाज ऐकत आम्ही बसून राहिलो.
पाउस एकसारखा चालू होता. पावसाचे थेंब खिडकीच्या गजावर आढळून त्याचे तुषार माझ्या चेहऱ्यावर येत होते. एव्हाना माझी सुस्ती केंव्हाच गेली होती. केसीला लांबून पावसाची मज्जा घेता येईना, त्यामुळे ती माझ्या शेजारी आली व पावसाचे उडणारे थेंब हातावर झेलू लागली.
“केसी, तू आता एवढी मोठी झालीस, पण पाउस आला की तू खूप लहानगी होवून जातेस” मला त्या पावसाच्या थेंबाबरोबर खेळणाऱ्या केसीकडे बघून खूप हसू येत होते.
“स्यान, हा पाउस ना! अगदी माझ्या लहानपानाचा सोबती आहे. मी लहान होते त्यावेळेस या पावसात मी मनसोक्त भिजायची. त्यावेळेस माझी आई मला खूप रागवायची कारण दुसऱ्या दिवशी मला सणकून ताप आलेला असायचा. हे असे प्रत्येक वर्षी, प्रत्येक पावसळ्यात व्हायचे. या अशा पावसात दरवर्षी भिजत भिजतच मी लहानाची मोठी झाले. पण माझी ना, पावसात भिजायची हौस काही कमी नाही झाली”. केसी तिचा हात तसाच त्या पावसांच्या थेंबात धरत म्हणाली.
तिच्या हातावरून परत उडणारे तुषार आता माझ्या चेहऱ्यावर येऊ लागले. मला तिचे हे रूप कधी माहीतच नव्हते. नेहमी कामात स्वतःला गुंतवलेली केसी इतकी भावनाशील आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी तिच्याकडेच पाहतोय हे समजल्यावर मला केसी म्हणाली,
“आणि तू? तुला सांग ना कसा वाटतो हा पाउस? तू नेहमी दुसऱ्यांचे ऐकून घेत असतोस. कधी स्वतःबद्दल सांगत नाहीस”.
“मी! मी काय सांगू? केसी, मला नाही इतरांसारखे मन मोकळे करता येत. मी अगदी साधाभोळा आहे ग, अन मी काय सांगणार.” मी रुमालाने चेहऱ्यावरील तुषार पुसत म्हणालो.
पावसात भिजणारे हात तसेच ठेऊन केसी म्हणाली,
“हां, तू साधाभोळा आहेस यात शंकाच नाही, पण तुझे डोळेच सांगताहेत की, तुझ्याकडे सांगावयास खूप काही आहे. अगदी कोणत्याही क्षणी तुझ्या मनाचा बांध फुटू शकतो. पण कदाचित ज्याच्याजवळ सांगावे अशी व्यक्ती तुला आजपर्यंत भेटलीच नसेल.”
“केसी, आर यू ब्लाक्मेलिंग मी?”
“आय डोंट थिंक सो, स्यान, पण इट इस ट्रू”
हो, हे नक्कीच खरे होते. कदाचित माझ्या समोर आजपर्यंत अशी व्यक्तीच आली नसावी जिच्यासोबत माझे मन मोकळे झाले. पण केसीने मला आज बरोबर पकडले होते. मी तिला नेहमीची उडवा उडवीची उत्तरे दिली, पण केसीने मला बरोबर ओळखले होते. आता मला गप्प बसता येणार नव्हते. आणि मग मी विचार करू लागलो.
सगळीकडे अंधार होता. ऑफिसमध्ये सगळे सूम होते. बाहेर पाउस पडत होता. केसीचे हात पावसात भिजतच होते. त्यांचे तुषार चेहऱ्यावर येत होते. ए.सी. चा थंडावा केव्हाच गेला होता. आता नैसर्गिक गारवा आला होता. केसी माझ्या डोळ्यांत डोळे घालून डोळ्यानीच मला म्हणत होती, “बोल ना बावळट!” अन मी विचार करत होतो. मागे मागे जात होतो. माझ्या भूतकाळात. अगदी माझ्या लहानपणात, बालपणात. माझ्या विचाराबरोबरच भूतकाळाचे चक्र फिरत फिरत मागे गेले आणि जिथून माझ्या बुद्धीची स्टोरेज व्हायला सुरवात झाली शेवटी तिथे जाऊन थांबले आणि माझ्या मनातील सर्व अलगद माझ्या ओठांवर आले…
(क्रमश:)