
Marathi Katha – Marathi Story – जिद्द
लेखिका – सौ. सविता खाडिलकर, हैद्राबाद
ही एका साधारण मुलीच्या मोठ्या स्वप्नाची व जिद्दीने मिळवलेल्या यशाची गोष्ट आहे. माधुरी… माझी बालमैत्रीण, जी अगदी सर्वसामान्य होती पण स्वप्नमात्र तिची सर्वसामान्य नव्हती. घरची परिस्थिती चांगलीच होती. आई अगदी साधी पण धीराची होती, तर वडील मात्र अत्यंत कडक शिस्तीचे होते.
दिसायला उंच, सडपातळ व बुद्धीने तल्लख होती. तिचं लहानपणीच स्वप्न होतं कि आपण क्रिडा क्षेत्रात जावं व काहीतरी कामगिरी करावी, पण वडील कडक स्वभावाचे असल्यामुळे तिने स्वतःची ही इच्छा कधीही व्यक्त केली नाही.
मग काय?, ती मोठी झाली, शिक्षण झालं आणि सर्वसामान्य सारखंच तिचंही लग्न झाल. वैवाहिक जीवनात ती आनंदी होती व ती चांगलीच रमू लागली. पुढे जाऊन इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे माधुरीने आपल्या क्रीडा क्षेत्रातील इच्छेला मुरड घातली व पूर्णविराम दिला. तसेही लग्नानंतर क्रीडाक्षेत्रात अगदी शून्यातून सुरुवात करायची वगैरे माझ्यातरी निदर्शनात आलेल नाही. पुढे जाऊन तिने शैक्षणिक क्षेत्रात नोकरी सुद्धा करायला सुरुवात केली. दोन गोंडस मुलं झाली. आयुष्य कसं सुरळीत सुरू होत. लग्नाला पंधरा वर्षे होऊन गेलीत, मुलेही आता बर्यापैकी मोठे झालेली.
शैक्षणिक क्षेत्रात आल्यामुळे तिला अनेक कार्यक्रमात सहभागी व्हायच्या संधी मिळायच्या, पण एका कार्यक्रमाच्या निमित्याने तिच्या खेळण्याच्या इच्छेला नव्याने चालना मिळाली. तो कार्यक्रम होता खेळाडूंच्या सत्कार समारंभाचा. इथे तिच्याच वयोगटातील महिला खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. हे बघून माधुरीला आश्चर्य व कौतुकही वाटले. अचानक तिचे बालवयातील स्वप्न ताजे झाले. एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळाली आणि हे सगळ बघुन तिच्याही आशा पल्लवित झाल्या. मग काय माधुरीने कसेही करून त्या खेळाडूंची भेट घेऊन खेळांबद्दल व त्यातील सहभागाच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेतली. त्या सर्व स्पर्धा चाळीशीच्या वर वयोगटासाठीच होत्या. आता बालपणातील राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधीच जणू तिला मिळाली होती आणि पुढील वर्षीच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे तिने ठरविले.
स्पर्धेच्या तयारीला तिने हळू हळू सुरुवात सुद्धा केली होती. माधुरीला सरावा दरम्यान अनेक अशा मैत्रिणी मिळाल्या, ज्यात काही तिच्या सारख्या खेळात नवीन होत्या तर काही अगदी मुरलेल्या खेळाडूसुद्धा होत्या. माधुरी आता खेळाचा सराव, इतर खेळाडूंचे अनुभव व त्यातून मिळणारा आनंद हे सगळं अनुभवत होती.
पण या सगळ्यातच अचानक तिच्या आयुष्यात नवीन काही घडले. तिला पोटाचा त्रास होऊ लागला तपासणी नंतर असे निदान झाले की पोटातील गाठीमुळे मैदानी खेळ खेळू शकणार नाही,तसेच त्या गाठी शस्त्रक्रिया करून काढाव्या लागणार होत्या. लगेचच शस्त्रक्रियाही करण्यात आली पण त्यामुळे तिचा त्रास कमी न झाल्यामुळे, पुढे एका वर्षांनी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली. आता ह्या सगळ्यातून ती हळू हळू सावरत होती. ती मनाने खंबीर असल्यामुळे, पुन्हा एकदा आपले स्वप्न उराशी धरून खेळायला सुरुवात केली. मैदानात हरलो तरी चालेल पण हरण्याच्या भीतीने मैदानात उतरलो नाही याची कायम खंत राहायला नको या निर्धाराने तिने सरावाला पुन्हा एकदा जोरात सुरुवात केली. महिन्यातच अथक परिश्रम घेऊन जिल्हास्तरावर’ हॅमरथ्रो’ मध्ये प्रथम आली व राज्यस्तरीय पातळीवरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली. तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता. मला व ज्यांना तिच्या ह्या यशाबद्धल कळलं, त्यांना तर फारच आश्चर्य झालं कारण माधुरीने शाळा कॉलेजमध्ये असतांना क्रीडाक्षेत्रात काही विशेष प्राविण्य मिळवले नव्हते.
आता माधुरीला ध्यास लागला होता राज्यस्तरीय स्पर्धेचा. एकाहून एक सरस असे स्पर्धक असतील, याचं दडपण आलेलं होत. तिच्या अडचणी व क्रीडाक्षेत्रातील तिची कामगिरी मी जवळून बघत होती. एक जवळची मैत्रीण म्हणून मी तिला धीर दिला. स्पर्धेचा दिवस उजाडला, तिची धडधड अधिकच वाढत होती. तिचे नाव घोषित झाले. आता माधुरीला आपल्या खेळातील कौशल्य दाखवण्याची वेळ आली होती. तिने अशी ‘हॅमर’ फिरवली व थ्रो केला,की रजतपदक थेट तिच्या गळ्यात आलं.
क…मा…ल दुसरा शब्दच नाही, ह्यालाच म्हणतात जिद्द, ह्यालाच म्हणतात इच्छा तिथे मार्ग. आपल्या मनात प्रबळ इच्छा असली तर, लाख संकटे येऊ देत, तिथूनही आपण मार्ग काढत जातो. मुख्य इच्छाच प्रबळ असली पाहिजे.
आपल्या मनातहि अशा अनेक इच्छा असतील. इच्छेला वयाचं बंधन नाही, मनाचं दालन उघडा- मोकळे व्हा –व्यक्त व्हा, इच्छेचा मागोवा घ्या- पाठपुरावा करा, सतत प्रयत्न करत राहा, कारण…..प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेल ही गळे.. !
(लेखिका- मराठी साहित्य परिषद, विश्व मराठी परिषद इ. संमेलनांत पारितोषिक विजेती असून, क्रीडा क्षेत्रात राज्यस्थरीय सुवर्ण आणि रजतपदक विजेती आहे )