समकालीन चातकाला – Marathi Kavita Samakalin Chatakala
कवयित्री – मंजिरी पाटील
संपर्क – patilmanjiri1972@gmail.com
‘डिलिट फॉर एव्हरीवन’
चा.. ऑप्शन वापरावाच लागतो
व्हर्चूअल फ्रेंडशीपच्या
व्हाट्सपी जगात…
कारण इथंसुद्धा लक्ष असतं थर्ड पार्टीचं
खर्या जगातल्या ‘हितशत्रुसारखं’…
घ्यावी लागते काळजी
कायम ऑफलाईन दिसु याची..
रीड झालेले मेसेज दिसु नये म्हणून
सेटिंगमध्ये जाऊन वारंवार करावी लागते खात्री…
गर्भ राहु नये म्हणून वापरावा लागतो जसा.. कंडोम.. कंपलसरी..
तसंच..
‘लास्ट सीन’ दिसु नये कोणाला म्हणून रहावे लागते.. आटोकाट.. सावध..
नाहीतर .. आपल्या प्रेमाचा अकाली गर्भपात ठरलेला…
रोजमर्राचे ताणेबाणे सहन करणार्या मनाला
पोलिओ होण्यापासून वाचवण्यासाठी
‘दो बूंद व्हर्चुअल प्रेमा’चे का होईना..
चोचीत पडावेत किमान.. म्हणून..
एवढीतरी काळजी घ्यायलाच हवी..
खर्या जगात प्रेमाच्या एका थेंबालासुद्धा महाग झालेल्या..
प्रत्येक.. समकालीन.. चातकाने….
@कवयित्री मंजिरी पाटील,
पुणे-४११०५१