खरी हरतालिका ..!! – Marathi Kavita

0
45
Marathi Kavita – Khari Haratalika – खरी हरतालिका ..!!

Marathi Kavita – Khari Haratalika – खरी हरतालिका ..!!

कवयित्री – मधुरा धायगुडे

जन्मदाते आई बाबा
पहिल्या कप्प्यात होते बसले
त्यांच्या सवे घालवलेले बालपण
मला बघुन खुदकन हसले

दुसऱ्या कप्प्यात होती शाळा
भाऊ,बहिणी, मैत्रीणी गोतावळा
डोकावून बघताच सारे जण
आठवणीच्या रुपात झाले गोळा

स्वप्न आणि परंपरा
ह्यातील दऱ्या संधात होते
नकळत माझ्या भोवतालच्या
भिंती मीच बांधत होते

सासर माहेर नवरा मुले
चौथ्या कप्प्यात होती गर्दी
नकळत साऱ्या जबादाऱ्यांची
अंगावरती चढली वर्दी

पट या आयुष्याचा
सरसर पुढे सरत होता
अनुभवांची शिदोरीही
कणाकणाने भरत होता

ह्याच कप्प्यात दिसली मला
एक छोटीशी जागा रिकामी
तीला बघताच मागे फिरले
वाटले ही तर आहे निकामी

का कोणास ठाऊक
हा कप्पा जरा नाराज दिसला
मला वळताना बघुन
किंचितसा खिन्न हसला

साऱ्यांसाठि जगुन झाले
आता तरी येऊदे भान
ह्या छोट्याश्या कप्प्यात तरी
दे जरा स्वतः ला स्थान

झाले अपमान ही बरेच
नाकारले जगणेच तुझे
अस्तित्व तुझे उरले काय
तुझे नकोशीच हेच स्थान

साऱ्यांच्या भावना जपताना
काय लागले हाताला
आता मात्र मैत्रीच्या डोहात
दे झोकुन स्वतःला

ठाऊक नाही श्वास आता
किती उरलेत आयुष्याचे
आता तरी या कप्प्यात
स्थान जप स्वतःचे
स्थान जप स्वतःचे

ओळख आता अस्तित्व स्वतःचे
इतरांच्या आणि स्वतःच्याच मनातले
सर्वांना हरणारी खरी हरतालिका तूच
ही ओळखच तुझी स्वतःचीच स्वतःला
हरणारी हरतालिकाच स्वतःच स्वतःला

©मधुरा धायगुडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here