वाटेत जीवनाच्या – Marathi Katha Vatet Jivanachya
लेखक : श्रीनिवास गेडाम
संपर्क : shrinivasgedam510@gmail.com
“वाटेत जीवनाच्या, काटेच फार होते
हळुवार वेदनांचे, हळुवार वार होते
घालून मान खाली, सारेच सोसले मी
डोळ्यांस आसवांचे, जडले विकार होते!”
गझल नवाझ भीमराव दादा पांचाळेच्या आवाजात मनाला पिळवटून टाकणारी ही गझल आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकली असेल! या अप्रतिम गझलेचा शिल्पकार माझा जिवश्च कंठश्च मित्र पंकज भारती आता या जगात नाही हे ऐकून अनेकांना धक्का बसेल! पंकज केवळ गझलकारच नव्हे तर उत्तम कथाकार, कवी नि चांगला माणूस पण होता. पंकजनं चार महिन्यापुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा कसूर एवढाच होता की, तो या जगाचा नव्हता. तो एक जगावेगळं रसायन होता. इथल्या व्यवस्थेशी जुळवून घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण जमलं नाही! शेवटी नाइलाज झाल्याने त्यानं आत्महत्या केली!
आत्महत्या करण्यापुर्वी त्यानं, ” वाटेत जीवनाच्या” या नावाचं आत्मचरित्र लिहलं जे नागपूरच्या ” अभिनव” प्रकाशननं नुकतचं बाजारात आणलं. या पुस्तकावर वाचकांच्या इतक्या उड्या पडल्या की, पहिली आवृत्ती हातोहात खपली. पंकज खूप प्रतिभावंत होता पण तितकाच दुर्दैवीही होता. एकीकडे साहित्य जगतात त्याचं खूप नावं होतं तर दुसरीकडे हाताला काम नव्हतं. घरची परिस्थिती खूप बेताची होती. वडील बँकेत चपराशी होते. कँन्सरनं त्यांचाही मृत्यू झाला. सारी जबाबदारी पंकजवर येऊन
पडली होती. थोडासा खटाटोप केल्यावर पंकजला बँकेत अनुकंपा तत्वावर कारकुनाची नोकरी मिळाली. पण….तो खुश नव्हता. बँक हे त्याचं क्षेत्र नव्हतंच मुळी! मी त्याचं अभिनंदन करायला गेलो तेव्हा तो खूप नर्व्हस होता. मला म्हणाला, ” मित्रा, बँक वैगेरे हे आपलं काम नव्हे! इथलं काम मला जमेल असं वाटत
नाहीये! काम्पुटर, संगणक बघीतले की, हातापायात गोळे येतात! तुला सांगतो….माझं काही खरं नाही! येणारा काळ मला स्पष्ट दिसत आहे! इकडे आड तिकडे विहीर अशी विचित्र परिस्थिती माझी झाली आहे!” मी त्याला धीर देण्याच्या उद्देशाने म्हटलं, “पंकज….तू उगाच चिंता करतोस! या जगात अशक्य असं काही नाही! सगळं काही ठीक होईल!” पंकज माझ्याकडे बघून उदासपणे हसला. मग म्हणाला, ” तू म्हणतोस तसं झालं तर …चांगलंच आहे! पण …तसं घडणार नाही…. हे मी नक्की सांगतो! बरं ते राहू दे…तुझं कसं चाललं ते सांग….!” माझा धंदा नीट चालत नव्हता. कर्ज वाढलं होतं. पण पंकजला त्रास
होऊ नये म्हणून मी सगळं व्यवस्थित सुरू असल्याचं सांगितलं.
पंकज म्हणाला, ” मला सगळं माहिताय! तुझा धंदा डबघाईस आलाय! पण तुला खरं सांगतो, तू म्हणतोस तसं माझ्या बाबतीत चागलं घडलंच तर….मी माझ्या परीनं तुला खूप मदत करीन! तू काय कमी मदत केली आहेस मला!”
पंकजचा आज बँकेतील पहिला दिवस होता. मी आज मुद्दाम त्याला सोडायला बँकेत गेलो होतो. त्याला नोटांचे बंडल मोजायला देण्यात आले होते. समोर नोटांचे भलेमोठे बंडल बघून तो अक्षरशः गर्भगळीत झाला . खूप प्रयत्न करूनही नोटांचे बंडल मोजता येईना. तो खूप नर्व्हस झाला. ” कसं काम कराल बँकेत? साधं नोटा मोजणं तुम्हाला जमत नाही! तुमचे वडील तरी बरे होते तुमच्या पेक्षा! कुलकर्णी साहेब बोलले. पंकजच्या जिव्हारी शब्द लागले. तो मनात खूप विव्हळला. मान खाली घालून त्यानं निमूटपणे ऐकून घेतलं. त्याचे सहकारी त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. तो संध्याकाळी आफिस सुटल्यावर खूप जड अंतःकरणानं घरी आला.त्याची आई नि नववीत शिकणारा लहान भाऊ त्याची मोठ्या
आतुरतेनं वाट बघत होते. त्याचा पडेल चेहरा बघून आई धास्तावली. लहान भाऊ काही खायला मिळतं का म्हणून शोधू लागला. “पंकज कुणी काही बोललं का?” आईनं शंका व्यक्त केली. ” नाही गं…तू उगीच चिंता करतेयस!” ” तुझा चेहरा सांगतो रे….काहीतरी
बिनसलं म्हणून!” ” नोटा मोजता आल्या नाही म्हणून थोडंसे साहेब रागावले. पण…होईल हळूहळू सगळं व्यवस्थित!” पंकज बोलला. शहाणं माझं बाळ म्हणून आईनं त्याचा गालगुच्चा घेतला. पंकजला रडू कोसळलं पण त्यानं दिसू दिलं नाही. रात्री खूप उशिरा
त्याला झोप लागली. अत्यधिक ताणतणावामुळे बराच वेळ तो इकडेतिकडे करत होता. उद्याचा दिवस परत एक नवीन संकट घेऊन येणार होता. त्याची चाहूल आधीच त्याला लागली होती.
बँकेतील आजचा दुसरा दिवस! तो पायीपायीच बँकेत जायला निघाला. त्याचं मन त्याला मागं खेचत होतं. बँकेत जायची अजिबात इश्चा होत नव्हती. पाय मात्र तो जाणीवपूर्वक पुढे रेटत होता. मनाचा हिय्या करून कसाबसा तो बँकेत पोहचला. त्याला बघून त्याचे सहकारी कुजबुजले. काहींनी बडा आया गझलकार म्हणून
टोमणेही मारले. तो चुपचाप आपल्या खुर्चीवर येऊन बसला. आतून खूप धास्तावला होता. ब्रँच मँनेजरनं त्याला कँबीनमध्ये बोलावलं. मँनेजर यू. पी. साईडचा होता. तो म्हणाला, ” कुलकर्णी साहब बता रहे थे कि, तुमको नोट गिनना नही आता। ” ” ठीक कहा उन्होने। मैने कभी इसके पहले गिने नही थे।” ” देखो, ध्यान लगाकर काम करो। काम्पुटर चलाना सिख लो। काम नही करोगे तो
नोकरीसे हाथ धोना पडेगा। समझे…? अब तुम जा सकते हो। कुलकर्णी साहब काम बतायेंगे….!”
बँकेत आल्याआल्याच त्याला दोन गोष्टी ऐकाव्या लागल्या. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. कुलकर्णी साहेबानं त्याला पासबुक प्रिंट करण्यासाठी दिले.पंकज बावन बावन करायला लागला.समोर ग्राहकांची गर्दी वाढत होती. सगळे चुळबूळ करायला
लागलेत. पंकजची बोटं इकडं तिकडं जात होती. काम्पुटर वर थांबत नव्हती. कुलकर्णी साहेबानं दहादा
त्याला काम समजावून सांगितलं पण ते त्याला जमत नव्हतं. ग्राहक हसत होते. टोमणे मारत होते. थट्टा मस्करी चालली होती. ” ना नोटा मोजता येत…ना काम्पुटर चालवता येतं….बँकेतील लोकांच्या
हजामती करायला सांगू का तुम्हाला? युजलेस!” कुलकर्णी साहेब कडाडले. धरती फाटावी नि त्यात सामावून जावं….असं क्षणभर पंकजला वाटून गेलं. तोअक्षरशः थरथर कापत होता. लंचब्रेक झाला होता. त्याचे सहकर्मी बाजूच्या हाटेलात चहाला गेले. हा एकटाच
हिरमुसल्या मनानं एका कोप-यात बसून राहिला. लंच ब्रेकनंतर चपराशी करतात ती कामे पंकजला देण्यात आली. पण त्यातही सतरा चुका त्यानं करून ठेवल्या होत्या.
पंकजच्या आत्मसन्मानाला ठेस लागल्यामुळे तो कुठलंच काम करण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
कधी एकदाचं आफिस सुटतं नि घरी जातो असं त्याला होऊन गेलं. घरी आल्याआल्याच पंकजनं स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. आईनं आवाज दिला पण त्यानं दरवाजा उघडला नाही. बेडवर काही काळ तो डोळे गच्च मिटून पडून राहिला. डोळे उघडले तेव्हा त्याचं लक्ष कपाटाकडे गेलं. साहित्यात मिळालेले अनेक पुरस्कार नि ट्राफिज बघून तो ढसाढसा रडला. साहित्यात मिळालेला दुर्मिळ असा सन्मान आणि बँकेतला पराकोटीचा अपमान अगदी विरूद्ध दोन टोकं
होती. नियतीनं पंकजच्या आयुष्यात अजब खेळ खेळला होता.
बँकेतील नोकरीचा आज तिसरा दिवस! पंकज न जेवताच आज बँकेत गेला. नेहमीप्रमाणेच त्याची हेटाळणी झाली. तो
चुपचाप खुर्चीत जाऊन बसला. कुणीच त्याला काम सांगायला तयार
नव्हतं. रिकामटेकडं बसणं त्याच्या जीवावर आलं. तो कुलकर्णी साहेबांकडे काम मागायला गेला. त्याला ठाऊक होतं कुलकर्णी चांगलं
उत्तर देणार नाही. ” सर, कुठलं काम करू….?” त्यानं थोडं चाचरत विचारलं. ” तू एकच काम कर. नोकरीचा राजीनामा दे. म्हणे कुठलं काम करू?” पंकज काहीच बोलला नाही. ” जा तुझ्या जागेवर जाऊन बस. मँनेजर बघतील काय करायचं तुझं!” पंकज जागेवर येऊन बसला. पाच वाजता मँनेजरनं पंकजला कँबीनमध्ये बोलावलं.
” कितने पढे हो?” मँनेजरनं त्याला विचारलं. ” सर, ग्रेज्युएट हूँ।”
” किस गधेने तुमको ग्रेज्युएट बनाया….तुमको तो कुछ आता नही।
अरे तुमसे अच्छे तो हमारे प्यून काम करते है। बस बहुत हो गया। मै और बर्दाश्त नही कर सकता। तुम नोकरीका इस्तिफा दे दो।”
” सर, हम बहुत गरीब लोग है। नोकरीका इस्तिफा दुंगा तो भुखे मर जायेंगे।” ” अब तुम निकलो। कल देखेंगे!” मँनेजर बोलला.
एव्हाना बँकेतील बरेच कर्मचारी घराकडे निघाले होते. पंकज जड अंतःकरणानं घरी जायला निघाला. त्याच्यात चालण्याचं त्राण सुध्दा उरलं नव्हतं. अचानक घरी जायचं सोडून तो
माझ्याकडे निघून आला. तो खूप थकलेला वाटत होता. त्याची सुंदर चर्या पार काळवंडली होती. मी बस म्हणायच्या अगोदरच तो सोफ्यावर बसला. मी त्याला प्यायला पाणी दिलं. पाण्याचे एकदोन घोट घेतल्यावर तो म्हणाला, ” मित्रा, मी आता फार तर दोनचार दिवसाचा सोबती आहे! आता अजून काही सहन करण्याची शक्ती माझ्यात उरली नाही!” ” पंकज, अरे झालं तरी काय?” मी बोललो.
” मी आधी तुला म्हटलं होतं ना अगदी तसंच झालं! आत्महत्या केल्याशिवाय आता माझी सुटका नाही! रबर सुध्दा एका मर्यादेपलीकडे ताणला तर तुटून जातो. मी तर माणूस आहे! ”
” पंकज, मी तुझी स्थिती समजू शकतो. पण…तू मेल्यावर तुझ्या आईचं अन् लहान भावाचं कसं होईल…. विचार केला आहेस कां?”
” खूप काळजी वाटते रे त्यांची! पण….मी करू तरी काय! खूप छी थू झालीय माझी बँकेत! मँनेजर, राजिनामा दे म्हणून सारखा मागे लागलाय! ” ” तरीही आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय तू घेऊ नको! काहीतरी मार्ग नक्कीच निघेल!” ” आता कसला मार्ग निघतो…? सगळे रस्तेच बंद झालेत! बस अजून एक उपकार कर! मी
मेल्यावर माझ्या आई, भावाला अंतर देऊ नकोस! ” घरी जाण्याआधी तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडला. ” बराय निघतो मी! खूप खूप थकलो आहे….रे, घरी जाऊन आराम करतो. आई, भाऊ वाट बघत असतील! ”
पंकजची नि माझी ही शेवटची भेट होती. रात्री त्यानं
पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला होता. आत्महत्या करण्यापुर्वी
तो खूप खूप रडला असावा असं त्याच्या चर्येवरून वाटतं. पंकजच्या
मृत्यूचा धक्का पचवणं त्याच्या आईला खूप कठीण गेलं. बँकेच्या लोकांनी त्याच्या मृत्यूची साधी दखलही घेतली नाही. पंकज खूप दुर्दैवी होता. उच्च कोटीची प्रतिभा त्याच्यात असूनही त्याचा खूप
दुर्दैवी अंत झाला. पंकजच्या मृत्यूनं सारं साहित्य जगत खूप हळहळलं. विशेषतः गझलेचं क्षेत्र,एकदम पोरकं झालं. आत्महत्या
करण्यापुर्वी त्यानं एक गझल लिहली होती. त्यात तो म्हणतो….
” हसता मला न आले, रडता मला न आले
जुळवून या जगाशी, जगता मला न आले”