लेखक : अंकुश गाजरे, शेळवे ,पंढरपूर
संपर्क : ankushgajare88@gmail.com
भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा
सारीपाट भाग २ – Marathi Katha Saripat – Part 2
सखातात्याच्या अन शांताकाकूच्या आयुष्यभराची कमाई दहाबारा हजार रुपये साठली होती. आख्या आयुष्यभरची कमाई होती ती. दोघंबी थकली होती. हातपाय थांबल्यावर कुणाला भीक मागायची…? म्हणून कसंबसं दहा- बारा हजार रुपये साठवलं होतं. तेही जीव मारून. दहा – बारा हजर रुपये म्हणजे दोघांच्या जीवाला ते दहा- बारा लाख रुपये होतं. काकूंनी ते पैसे काखेतल्या बोचक्यात बांधलं होतं. पिशवीत ठेवलं तर प्रवासात पिशवीची चोरी होईल. बोचका कोण न्हेतंय …? त्यात काय असणाराय …? शांताकाकूनं पुढचा विचार केला होता….
सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. सखातात्या एस. टीतून उतरला. मागनं काकू उतरली. तात्या पुढं काठीच्या आधारानं वाकत रेल्वे स्टेशनच्या दिशेनं चालायला लागला.मागनं काकू चालायला लागली. रस्त्याने माणसांची…. वाहनांची गर्दी.. उंचच्या उंच इमारती . सीमेंटच्या जंगलातून दोघंजण चालत होती. पहिल्यांदाच दोघंबी रेल्वेनं प्रवास करणार होती. चालून-चालून तात्याचा दम भरला. थांबून तात्यानं मोठ्यानं श्वास घेतला. पुन्हा तात्या चालायला लागला. काकू आपली गप गुमान मागून चालत होती. कशीबशी रेल्वे स्टेशनवर जाऊन दोघंजण विसावली. चालून-चालून तात्याला घाम आला होता. धोतराच्या सोग्यानं तात्यानं तोंडावरचा, मानेवरचा घाम पुसला. पुन्हा एकदा मोठ्यानं श्वास घेतला. पाण्याचा एक घोट घेतला. दमलं भागलेलं दोन्ही जीव बाकडावर स्थिरावलं……
रेल्वे यायला आजून तासभर टाइम होता. चापून-चोपून तात्या-काकू गरिबावानी बाकडावर बसली होती. स्टेशनवरच्या लोकांचं चेहरं न्याहाळनं एवढंच काम दोघांचं चालू होतं. शहरातली लोकं सारी फॅशनेबल… शहरातली आज्जीपण पॅंट-शर्ट मध्ये दिसत होती. काकूला-तात्याला सारं वेगळंच वाटत होतं. वेगळीच दुनिया दिसत होती. काकू तात्या गावठी…. येणारी जाणारी लोकंही म्हाताऱ्या जोडप्याकडं कौतुकानं बघत जात होती.
तात्या – काकू बाकडावर बसलेली होती. दोघाचीबी नजर स्टेशनवरचं सारं दृश्य टिपत होती. तेवढ्यात दोन भिकाऱ्याची पोरं तात्यासमोर येऊन उभा राहिली.
“ओ बाबाsss, एक रूपाया द्या ना !, लय भूक लागलीय…”
तात्यानं न बोलताच खिशातून पाच रुपये काढलं. एका पोराच्या हातात टेकवलं. दोन्ही पोरं पळतच उड्या मारत गेली. तात्या पोरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता… तेवढ्यात समोरून एक आजी-आजोबा चालली होती. तात्या – काकूच्या वयाचीच. तात्याची त्या दोघांकडे नजर गेली. म्हातारा आंधळा होता. म्हातारीनं त्याच्या हाताला धरलं होतं. म्हातारा बायकोच्या आधारानं चालत होता. अंगावरची कपडे मळलेली, इटलेली. दोघांनीबी आंघोळ केलेली दिसत नव्हती.
तात्या काकूला डोचवत म्हणला,
“शांता sss, खराय तुझं… आपलं चांगलाय…आपण नशीबवान आहोत…”
काकू तात्याकडं बघत नुसतंच हासली.
तासभर टाइम निघून गेला. एका तासाभरानं स्टेशनवर सोलापूरला जाणारी रेल्वे लागली.. थकल्यालं दोन्ही जीव जनरल डब्याच्या तोंडाशी गेलं…भयाण गर्दी दिसत होती. आत शिरायला जागा नव्हती. थकल्यालं जीव बघून एका पोरानं आत शिरायला जागा दिली. कशीबशी शांताकाकू आगोदर चढली. तात्याच्या हाताला धरून तात्यालाही आत घेतलं. एकही बाकाड बसायला मोकळं दिसत नव्हतं. चौफेर एकदा बघून तात्यानं-काकूनं खालीच बैठक मारली. डब्यामध्ये माणसांचा गोंगाट होता. हजार घरची हजार माणसं, शांत कोण बसतो ? त्यात जनरलचा डब्बा… बसायच्या जागेसाठी जो तो धडपडत होता. काकू अन तात्या कशीबशी खाली टेकली होती. आत डब्यात शिरणारांचा त्रास होतच होता. तात्या-काकूनं मध्येच बैठक मारल्यामुळे अनेकजण ओरडतही होते. तात्या-काकू गप्प बसली होती…
रेल्वेचा बोंगा वाजला.. आणखी डब्यात गर्दी वाढली.. बसल्याली माणसं तितकीच… उभी राहिलेली ही तितकीच…कुणाचा कुणाला मेळ नव्हता. जत्रेचं रूप आलं होतं डब्याला..रेल्वेनं स्टेशन सोडलं.. बोंगा वाजवत डुगुडुगू करत रेल्वे पळायला लागली…
एक तास दीड तास निघून गेला. स्टेशनं येत होती. स्टेशनं जात होती. प्रवाशी उतरत होती- चढत होती..थोडीशी गर्दी कमी झाली होती. शांताकाकूनं बोचका मांडीवर घेतला होता. पिशवी मांडीच्या शेजारी ठेवली होती.
तात्याकडे बघत काकू म्हणली,
“व्हय व्हं sss, भाकरी खाऊन घ्यायची का थुडी थुडी…भाकरी खाऊन झाली गी आंग टाकुया इथंच.. सकाळपर्यंत सोलापूर इल… मग लवकरच तुळजापूरला पोहचेल आपण…
तात्या शांताकाकूकडे बघत म्हणला,
“व्हय-व्हय… खाऊ गी…दी हातावरच थोडी भाकरी…”
शांताकाकूनं पिशवीतलं भाकरीचं गाठोडं काढलं. सोडलं. त्यातली एक भाकरी हातावर घेतली. त्यावर थोडी शेंगदाणा चटणी घातली. ती भाकरी तात्यासमोर धरली. तात्यानं भाकरी हातात घेतली. काकूनं पुन्हा दुसरी आर्धी भाकरी हातावर घेतली. थोडी चटणी घेतली. दोघांनीबी एक-एक घास मोडून भाकरी खायला सुरुवात केली. दुसरी प्रवाशीबी जेवत होती. गाडीत गोंगाट सुरूच होता. एक-एक घास करत तात्यानं भाकरी संपवली. चटणीने तोंडाला चव आली. पाण्याचं दोन घोट घेतलं. काकूनंही भाकरी संपवून पाण्याचं दोन घोट घेतलं. भाकरीचं गाठोडं बांधून ठेवलं. झोपण्यापुरती थोडी इकडेतिडके सारून जागा केली. तात्यानं पिशवी घेतली. दोन्ही बंधांची गाठ मारली. ती पिशवी उशाला घेतली. आंगाचा मुटकुळा करून आंग खाली टाकलं. डोक्याखाली पिशवीची उशी झाली. शांतकाकूनं बोचका उशाला घेतला. त्यावर डोक टेकवलं. तात्याच्या कडेलाच आंग टाकलं. भवानी मातेचं डोळ्यासमोर रूप आठवून डोळं मिटून घेतलं. दोघंही अंगाचा मुटकुळा करून पडून राहिली. रेल्वे डुगूडुगू पळत होती, थांबत होती. बोंगा वाजवत होती. पुन्हा पळत होती. लोकं उतरत होती, चढत होती. तात्या काकू नुसतीच पडून होती…
निम्मी रात्र उलटून गेली…
पहाटेच्या चार वाजून गेल्या होत्या. रेल्वेच्या खिडकीतून गार वारा आत येत होता. रेल्वे डुगू-डुगू पळतच होती. चाकांचा खडखडाट आवाज घुमट होता. रेल्वे डब्यातील बरीच माणसं झोपली होती. कोणी कसंही झोपलं होतं..बाकडावर माना टाकल्या होत्या. काही माणसं तर मेलेल्या मड्यागत झोपली होती. झोपीनं त्यांना खाऊन टाकलं होतं. तात्या-काकू गाढ झोपली होती. उतरता-चढता लोकांचं धक्क लागत होतं. झोपीत कुणाला काहीच जाणवत नव्हतं…
शांताककूच्या मानेला अचानक धक्का बसल्यागत झाला. …पण झोप गाढ लागलेली होती. त्यात थोडी अंगात कणकण… झोपीत शांताकाकूला काहीच कळालं नाही… पाच दहा मिनीटं निघून गेली. रेल्वे एका स्टेशनवर थांबली. पाच मिनिटाने बोंगा झाला. पुन्हा रेल्वे पळायला लागली. शांताकाकूला थोडी जाग आली. मानेला बसलेला हिसका आठवायला लागला. तात्या गाढ झोपला होता. तोही मेलेल्या मढ्यागत. शांताकाकू उठून बसली. हातानं डोळं चोळलं. चांगली जाग आणली. सगळ्या डब्यात नजर फिरवली. मग उशाला बघितलं. बोचका गायब. दुसराच बोचका उशाखाली दिसत होता. काकूनं पुन्हा-पुन्हा नीट बघितला. दुसराच बोचका होता. शांताकाकूनं बोचका सोडला. बोचक्यातील सारी कापडं दुसऱ्याचीच. चिंध्याच नुसत्या. शांताकाकूला झरझर घाम फुटला. आंग गार-गार पडायला लागलं. डोळं पाण्यानं गच्च भरलं. हुंदका दाटून आला. तोंडातून आवाज निघेना. ओरडायला येईना. मुक्यागत अवस्था झाली. हातपाय थरथर कापायला लागलं. काय होतंय ते काळेना झालं. क्षणात छातीत वीज चमकल्यागत झालं. हलक्या काळजाची काकू धाडदिशी बसल्याली कोसळली… काय झालंय ते कुणालाच काही कळालं नाही… दोन तासाचा काळ उलटून गेला…
क्रॉसिंगसाठी रेल्वेनं एका स्टेशनवर ब्रेक मारला. कुरकुर आवाज करत गाडी थांबली. ‘च्याय च्याय च्याय…’ चहा विकणाऱ्या माणसांचा मोठ्यानं आवाज घुमला. रेल्वे डब्यातील निम्मी-आर्धी लोकं उठून बसली होती. माणसांच्या बोलण्याचा गोंगाट सखातात्याच्या कानावर पडला. आवाजानं तात्या जागा झाला. डोळं उघडलं. चांगलं उजाडलं होतं. थोडी बोचरी थंडी जाणवत होती. शेजारी शांताकाकू निवांत झोपल्याली तात्याला दिसली. तात्या उठून बसला. आपल्या बायकोकडं बघितलं. पूर्वेकडून सूर्य वर आला होता. त्याच्या प्रकाशाने आत खिडकीतून डोकावले होते. सूर्याच्या त्या गोल लाल गोळ्यागत काकूच्या कपाळावरील ते लाल भडक मोठंच्या मोठं कुंकू दिसत होतं. तात्यानं स्वत:च्या तोंडावरून हात फिरवला. डोळं चोळलं. शेजारची काठी घेतली. काठीच्या आधारनं तात्या उठला. वाकत-वाकत चालत हळूहळू टॉयलेट गाठलं. पुन्हा बाहेर येवून तोंडावर पाणी मारलं. चूळ भरली, पुन्हा तात्या वाकत-वाकत चालत आला. आपल्या बायकोच्या शेजारी बसला. पुन्हा ‘च्याय च्याय च्याय’ चहावाल्या माणसाचा आवाज घुमला.
“ये चहावाल्या , थांब…” तात्यानं आवाज दिला.
“ये उठ, चहा घी…. उजडलंय…” तात्यानं ककूला डोचवलं.
खिशात हात घालत तात्या म्हणला,
“दोन कप चहा भर रे बाबा…”
चहावाल्याने दोन मोठे चहाचे कप भरले. तात्यानं खिशातातून वीस रुपये काढलं . त्या चहावाल्या माणसाच्या हातात देत दुसऱ्या हातानं पुन्हा शांताकाकूला डोचवलं.
“ उठ की शांता, चहा घेतलाय तुझ्यासाठी…. चल उठ … उठ…
तात्यानं दोन चहाचे कप हातात घेतले. चहावाला पुढं निघून गेला. माणसाची गर्दी होतीच. गोंगाट होताच….
पुन्हा तात्यानं शांताकाकूला आवाज दिला. तात्याच्या दोन्ही हातात दोन्ही कप होते. दोन्ही हात गुंतून पडले होते.
“उठ की शांता, चहा घेतलाय तुला….” तात्यानं आणखी आवाज दिला.
शांताकाकूचं “ऊ” की “चू” नव्हतं… शांत गाढ झोपली होती काकू. तात्यानं हातातला एक चहाचा कप खाली ठेवला. मोकळ्या झालेल्या हातानं तात्यानं काकूला हालवलं. काकूचं गार पडलेलं शरीर हाताला जाणवून गेलं. काकूचं शरीर एकदम थंडगार पडलं होतं. तात्यानं पुन्हा हालवलं. तरीही काकूचं “ऊ” की “चू” न्हाय … शांत…शांत सारं….
“शांतेsss., काय झालंय तुला…? कसली झोप लागलीय तुला…? उठ गी… आता उतरायचाय थोड्या वेळात आपल्याला… कसली झोप ही…? ही झोप म्हणायची का काय म्हणायचं …?”
तात्यानं पुन्हा मोठ्यानं हालवत आवाज दिला.
“शांतेsss., ही काय म्हणायचं आगं..उठ गी…?
शांतकाकू जागची हाललीही नाही… गप्प गार शांत….
तात्यानं एक हात नाकाजवळ नेवून श्वास बघितला… श्वास कधीच बंद झाला होता. शांताकाकूनं जगाचा निरोप घेतला होता. तात्याचं लक्ष शांताकाकूच्या उशाला गेलं. बोचका नव्हताच, चिंध्या विस्कटलेल्या होत्या. त्याही वेगवेगळ्याच. अनोळखी.
“शांताsss,” थरथरत्या ओठांनी म्हाताऱ्याची किंकाळी रेल्वेच्या डब्यात घुमली…चहाचा कप ही हातातून खाली गळून पडला….
रेल्वे डब्यातल्या माणसांचं लक्ष तात्याकडं गेलं. लोकं उठून बघायला लागली. बघता-बघता गर्दी जमली. चर्चा सुरू झाली. शांताकाकू निपचीत पडली होती. सखातात्या मोठ्यानं रडत होता. एकट्याचाच आवाज डब्यात घुमत होता.
तात्या मोठ्यानं रडत म्हणत होता,
“शांताsss, व्हायचं तेच झालं बघ … मनात चुकचुकलेली पाल खरी ठरली… चोरीच्या भ्यानं पैसं बरूबर घेतलं… अन पैशानंच घात केला….जोडी फुटली आपली… शांताsss नकू होतं गं जायाला तू मला एकट्याला सोडून…आपलं ठरलं होतं ना.. आपल्यातल्या एकट्यानं कुणी जायाचं न्हाय म्हणून… गेलं तर दोघांनी संगट जायाचं… मग का आसं केलं त्वा…? मी काय करू आता एकटा राहून…? सांग गी शांताsss? बोल गी शांताsss?” तात्या ऊर बडवून घेत होता. डोळं घळाळा गळत होतं. नरड्याच्या शिरा रडण्यानं ताणल्या जात होत्या. थकलेल्या तात्याला रडनंही व्हतं नव्हतं… गलक्यातून –गोंगाटातून म्हाताऱ्याचा आवाज यायचा बंद झाला.
बघता-बघता स्टेशनवर बातमी पसरली. म्हातारा एकटाच म्हातारीसाठी डोळं गाळत होता.
आर्धा-पाऊण तास निघून गेला होता. लोकं नुसतंच बघत होती. तेवढ्यात तीन – चार पोलिस आली. एका पोलिसाने तात्याच्या हाताला धरलं . पिशवी घेतली. हाताला धरून रेल्वेतून खाली उतरवलं. तीन – चार पोलिसांनी काकूच्या प्रेताला खाली घेतलं . तात्याची पोलिसांनी चौकशी – विचारपूस केली., घरची-मुलाबाळांची चौकशी केली. नातेवाईकाची चौकशी केली. मग पोलिसांनी तीन – चार फोन केले. अॅम्ब्युलन्स आली. प्रेताला अॅम्ब्युलन्समध्ये घातलं . तात्यालाही आतमध्ये बसवलं. तीन-चार पोलिस बसले . अॅम्ब्युलन्स सरळ सिव्हिल हॉस्पिटलला पोहचली.
तात्या बाहेर दवाखान्यात एकटाच बाकडावर बसला होता. एकटक नजर होती. फक्त डोळं गळत होतं… सारा भूतकाळ डोळ्यासमोरून चित्रपटासारखा पळत होता…. दुपारच्या तीन चार वाजून गेल्या होत्या.
सायंकाळच्या पाच वाजता पुन्हा अॅम्ब्युलन्स दवाखान्याच्या दरवाजात लावली. डॉक्टरांची, पोलिसांची धावपळ सुरू झाली. तात्या गप्पगार बाकडावर बसला होता. काकूला पुन्हा अॅम्ब्युलन्समध्ये घातले. तीन-चार पोलिस आले. तीन चार रेल्वे प्रवासी संघटनेची माणसं आली.
तात्याला हाताला धरून अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं… अॅम्ब्युलन्स रस्त्याने पळायला लागली…..
अॅम्ब्युलन्स कुर्डूवाडी स्मशानभूमीत पोहचली… स्मशान शांतता… आठ-दहा माणसं.. तीही रेल्वे प्रवासी संघटनेची…. चार-पाच पोलिस…. एक अधिकारी …एक दोन नर्स… तात्या गप्प उभा… सताड डोळं उघडं… एकटक नजर…
रेल्वे प्रवासी संघटनेने माणुसकीच्या नात्यातून अंत्यविधीची तयारी केली. संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधवांनी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिता रचली. शांताकाकूच्या प्रेतावर पांढरं कापड झाकलं. आकाशातून कावळं काव-काव करत घिरक्या घालत होतं. आवाज त्यांचाच फक्त कानावर पडत होता. शांताकाकूला उचललं, चित्तेवर ठेवलं, भान गेल्यागत तात्या शांतच उभा होता. काकूच्या अंगावर तोंडावर चिता रचली. चितेत काकूचं तोंड झाकून गेलं…. हातात जाळाचा टेंभा दिला. तात्यानं डोळं गाळत चीतेला अग्नि दिला… चितेनं पेट घेतला. धुराचे लोट आभाळात घुसले. कावळ्यांनी काव-काव करत धूरांच्या भोवती फेरा धरला. चीतेचा आगडोंब पेटला…. काकू त्या आगडोंबातून दिसेनाशी झाली… तसा तात्या एकदम भानावर आला…. तात्यानं पुन्हा हंबरडा फोडला….
“शांताssss, आता मी कुणासाठी जगू….. ? चोरानं माझ्या पैशाची… सामानाची न्हाय चोरी केली… माझ्या आयुष्याचीच चोरी केलीयsss. माझं आयुष्यच घेवून गेलाय चोर… आयुष्यच चोरलंय माझं त्यानं… आयुष्यच चोरलंय…
तात्याचा आवाज साऱ्या स्मशानात घुमला…. तात्याच्या रडण्यानं…. बोलण्यानं….ओरडण्यानं साऱ्यांचंच मन गलबलून गेलं… साऱ्यांच्याच डोळ्याच्या कडा ओलावल्या…. तात्यानं डोळं मिटून उघडलं… पेटलेल्या चितेकड एकदा बघितलं… उशीर पर्यंत बघितलं….मग तात्या माघारी फिरला.. कुणाला काही न बोलताच लटपटत पाऊल पुढं टाकलं… थरथरतच तात्याचं पाऊल परतीच्या रस्त्यानं पडायला लागलं… पुन्हा आयुष्याचा सारिपाट खेळण्यासाठी तात्या रस्त्यानं चालायला लागला… तोही एकटाच……!!!
सुंदर ,वेधक कथा.सारीपाट हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच,व तो नियतीने ठरवलेल्या वेळी येतोच.जोडप्याचे आयुष्यही त्यांचीच साक्ष देतात.वाचना बरोबरच आयुष्याकडे एकवार हव्यास लावते.