Marathi Movie Ramchandra Purushottam Joshi – रामचंद्र पुरुषोत्तम जोशी
आत्मा अमर आहे त्याला कधीच कोणी मारू शकत नाही. माणूस मरतो म्हणजे फक्त शरीर सोडतो अशी आपल्या सर्वांची धारणा असते मात्र तरीही मरणोत्तर आयुष्य असा काही प्रकार अस्तित्वात आहे? मेल्यानंतर आत्म्याच काय होतं ? शरीरापासून आत्मा वेगळा होतो म्हणजे नेमकं काय होतं ? यांसारखे अनेक प्रश्न आजवर अनुत्तरीतच आहेत.
अजय फणसेकर आणि सचिन शिंदे निर्मित आणि णानो एन्टरप्रायझेस तसेच मनोज खळतकर यांची प्रस्तुती असलेल्या “रामचंद्र पुरुषोत्तम जोशी” या आगामी सिनेमामध्ये मार्मिक आणि हलक्या फुलक्या शैलीमध्ये यासर्व प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. मरणोत्तर यमलोकातील जीवन आणि तेथील प्रवास असा वेगळाच विषय रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या सिनेमाद्वारा मांडण्यात येणार आहे.
नुक्र्तीच या सिनेमाची पत्रकार परिषद मुंबई येथे घेण्यात आली यावेळी सिनेमाचा फर्स्ट लूक सुद्धा दाखविण्यात आला. याप्रसंगी आमदार नितीन सरदेसाई, दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, अजय फणसेकर, दीपक शिर्के, शीतल क्षीरसागर, मनोज खळतकर तसेच सिनेमातील इतर कलाकार मंडळी उपस्थित होती.
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी हे एक सरकारी कर्मचारी असून त्यांची बायको, दोन मुलं, सुना, एक मुलगी असा परिवार आहे. परिवारातील सर्व सदस्यांमध्ये उत्तम स्नेहसंबंध असून त्यांच्या नात्यातील विण अतिशय मजबूत आहे. समुद्रकिनारी असलेल्या एका टूमदार घरात हे सुखी कुटूंब रहात असत.
अचानक रामचंद्र जोशी स्वर्गवासी होतात आणि ते यमलोकी जातात. तिथे त्याना यमदेव भेटून तिथे राहण्यासंबंधीचे सर्व नियम समजावून सांगतात. सुरुवातीला भांबावून गेलेले रामचंद्र जोशी तेथील वातावरणाशी जुळवून घेऊ लागतात. बघता बघता वर्ष सरते आणि रामचंद्र जोशींच्या चांगल्या वागणुकीवर खुष होत यमराज त्याना त्यांच्या वर्षश्राद्ध समयी घरी जावून येण्याची परवानगी देतात. आपल्याला बायको आणि मुलाना बघायला आणि भेटायला मिळणार याचा रामचंद्र जोशीना अत्यानंद होतो. ते आपल्या गतस्मृतीमध्ये रममाण होतात. परंतु घरी आल्यानंतर मात्र रामचंद्र जोशीना काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळते.त्यांना आपली वाटणारी माणसे खूप बदलली दिसतात हे सर्व पाहून रामचंद्र जोशीना खूप वाईट वाटते . या सर्व बदलाचा रामचंद्र जोशी कसा स्वीकार करतील ? यातून ते काही मार्ग काढतात का ? भूतकाळात रममाण झालेल्या कैलासवासी रामचंद्र जोशींच पुढे काय होईल ? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे “रामचंद्र पुरुषोत्तम जोशी” हा सिनेमा !!
कथा ,पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनेता आणि निर्माता अशा सहाही भूमिका अजय फणसेकर यांनी या सिनेमात चोखपणे बजाविल्या आहेत. याआधी रात्र आरंभ,एक होती वादी, एनकाउंटर यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांच दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले आहे. आगामी रामचंद्र पुरुषोत्तम जोशीच्या मुख्य भूमिकेत मातब्बर अभिनेते दिलीप प्रभावळकर असून त्यांच्यासोबत सुहास जोशी , विकास कदम, अजय फणसेकर, राजन ताम्हाणे, शीतल क्षीरसागर, दीपक शिर्के, प्रीती जोशी, मनोज खळतकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत या सिनेमाला स्वप्नील केणी आणि विलास पवार यांचे कलादिग्दर्शन लाभले आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात व्ही एफ एक्स तंत्राचा वापर अत्यंत कौशल्यपूर्ण केला असून हे या सिनेमातील आणखी एक आकर्षण आहे. येत्या ४ ऑक्टोबरला हा सिनेमा ढगातून जगात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे