लेकीचे मनोगत – Marathi Kavita Lekiche Manogat

0
958

Marathi-kavita-lekiche-manogat

लेकीचे मनोगत – Marathi Kavita Lekiche Manogat

कवी: श्रीनिवास आठल्ये,डोंबिवली
संपर्क – smathalye42@gmail.com

आई, लेक मी लाडकी, ऐकविते मनोगत।
तुझ्या सहवासातील, क्षण क्षण आठवित॥१॥

तुझा स्वभाव ग शांत, समई ती देव्हा-यात।
रागाविण्यामध्येसुद्धा, प्रेमभाव ओतप्रोत॥२॥

बोलणे ग तुझे गोड, जसा ठिबकितो मध।
आजारावरती तुझे, शब्द धीराचे औषध॥३॥

गुंतलेली कामामध्ये, चाले सदा लगबग।
कपाळीच्या घामामध्ये, चांदण्यांची झगमग॥४॥

फुटण्याआधी तांबडे, झोप तुझी होते पुरी।
दिवेलागणीपर्यंत, विसावा ना पळभरी॥५॥

काही नाही देणे-घेणे, कुठे नाही येणे-जाणे।
कसे वाढविले मला, गूढ सारे तूच जाणे॥६॥

आता परी नको चिंता, दिसू लागे जरी पैल।
रोप तूच लाविलेले, फोफाविले ऐलपैल॥७॥

माझ्या समईच्यासाठी, मीच होईन दिवली।
आई, करीन सांभाळ, आयुष्याच्या संध्याकाळी॥८॥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here