चार लोकं – Marathi Kavita Char Lok

0
1397

Marathi-Kavita-Char-Lok

कवी : मो.बा. देशपांडे
संपर्क : mohanbadeshpande@gmail.com

चार लोकं – Marathi Kavita Char Lok

अस्मादिक पोरसवदा असताना
आमचे ते धूळमाखले अवतार बघून
आरामखुर्चीत पेपरने वारा घेत
वडिलधारे सहज म्हणून गेले
…..अरे अशाने चार लोकं काय म्हणतील ?

ते शब्द कानी, मनी, ध्यानी
घुमत राहिले वेळोवेळी पदोपदी
किमान पदवीधर व्हायला हवं
नोकरी तर मिळायलाच हवी
…..नाहीतर चार लोकं काय म्हणतील ?

धंद्यात जम बसावा राजेहो
बायको पोरं घर गाडी
घरामध्ये घरगडी असं सारं
गुडीगुडी दिसाया हवं हो
…..नाहीतर् चार लोकं काय म्हणतील ?

म्हातारपण कसं हवं
वयोमानाने मर्यादेत
जबाबदारी उरकून
टाम टूम मजेत
….नाहीतर शेवटी चार लोकं काय म्हणतील ?

हे चार लोकं कोण ?
ते कधीच भेटले नाहीत !
काय म्हणतात शेवटी ?
उत्तर मिळालंच नाही की
…..शेवटी ते चार लोकं काय म्हणतील ?

श्वास थांबला तेव्हा आले
ते चार लोकं …उचलायला
मी कान टवकारले ऐकायला
ते फक्त एव्हढंच म्हणाले
…..राम नाम सत्य है !!

मो.बा. देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here