पहिला भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
सौदा भाग २ – Marathi Katha Sauda Part 2
सकाळी मात्र तिने ठरवलं कि हार विकायचा अन पैसे घ्यायचे.
पैशे कुणाच्याही नजरेस पडू द्यायचे नाही.
हवे तेव्हां अडी -अडचणींत कामी येतील.
कधी कामाला नाही जाऊ शकले तर त्यातले पैसे वापरता येतील.
एवढं कशाला, बा माझं लग्न ठरवल कि तेव्हा लग्नात पण पैसा कामाला येईल.
हो बराबर हाय असंच कराव लग्न होईपर्यंत तर हा नेकलेस सांभाळणं अवघडच होतं हे तिला कळालं .
सकाळी रोजच्या सारखी ती उठली.
न्याहारी केली आणि मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या कामावर निघाली.
तास दोन तासात २-४ कॉलन्या पालथ्या घातल्या.
सामान विकुन रोजचे पैसे मिळाले .
ते घेवून निघाली.
पाय आज सराफ बाजाराकडे वळले .
सगळ्या दुकानांसमोरून जाताना तिला पुनःपुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती.
सगळे पॉश लोक कारमधून उतरत होते.
भारी कपडे अन् परफ्युमच्या वासाने परिसर दरवळत होता. लोक तिच्या कडे तिरस्कृत नजरेने पहात होते.
सगळ्या दुकानांसमोर सेक्युरीटी गार्ड होते , कोणीही तिला जवळ फिरकु देईना.
ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपर्यांमधे बसली.
कळकट प्लास्टिक च्या बाटलीतलं पाणी पिलं.
बटव्यातून दहा रुपये काढले, हार एकदा चेक केला.
वडापावच्या गाडीकडे गेली.
एक वडापाव खाल्ला, अजुन एक खावा वाटत होता पण तिने मन मारलं .
पाणी पिऊन सराफ गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली.
तिथं एक छोटं दुकान होतं .
तिथे काम करणारा माणुस हळुच बाहेर येऊन तिला म्हणाला,
” काय पायजे अंगठी का झुमका?”
त्याच्या त्या बोलण्याची अन् बघण्याची तिला शिसारी आली.
“काय बी नको ” म्हणत ती भराभर पुढे निघाली.
तो मागुन बोलवत होता पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातुन झाली होती.
आता गल्लीतलं शेवटचं छोटंस दुकान तिने पाहिलं. दागिने घडविणाराचे दुकान होतं.
गल्ल्यावर बसलेला चश्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला.
धोती -शर्ट , पगडी घातलेली होती.
त्याच्या हाताखाली २-३ माणसे होती.
काचेच्या शोरूम पेक्षा तिला हे पेढीवजा दुकान बरं वाटलं. विश्वासुदेखील वाटलं .
सुभागी हिम्मत करून निघाली.
दुकानात चढताना नोकरानी हटकलं ,” चल बाई ! बाहेर चल. कुठे घुसु राह्यली ?”
“अरे बाबा असं काय हाकलतो ? मी काय भीक नाय मागत. शेटकडं काम हाय म्हणून आली ना!”
कर्मचार्याने विचारलं” काय काम आहे ,सांग ना?”
“हार विकायचा हाय!”
“सोन्याचा????”
“हो ss! मंग काय खोटा?”
तो आत गेला .
सेठच्या कानात कुजबुजला , सेठने मान डोलावली.
“ये पोरी, आत ये बस .” शेट नरमाईने बोलला.
“काय चहा पाणी घेशील का? ” कर्मचार्याने अदबीने विचारले.
“नाय बा! पाणी नगं, हां चाय चालल ना ! पण चिल्लर नाय माझ्याकडे.!”सुभागी बोल ली.
“अगं पैसे कशाला? असंच प्यायाचा चहा. ए पोर्या दोन चहा सांगरे!”
” हं पोरी, बोल काय काम आहे दुकानात.?” शेठ ने विचारलं.
“हां शेट ह्यो हार कितीचा हाय ते इचारायचं होतं ?!”
तिने परकराच्या खिशातून हार असलेली चिंधी काढली.
गाठ सोडून हार समोर ठेवला.
हार मळकट झाला असला तरीही त्याची बनावट , नक्षीकाम आणि बसवलेले पाचू अप्रतिम होते, हे जाणकार माणसाला लगेच कळंलं .
सेठच्या डोळयांत चमक आली तरीही त्याने चेहर्यांवर साधारण प्रश्नार्थक भाव ठेवले.
हाताखालच्या मदतनिसाची तर बेचैनी वाढली.
“हा हार तु़झ्याकडे कसा?” सेठने चष्म्यावरून पाहत विचारले.
“कसा म्हणजे ?” सुभागी.
“कुणाचा आहे?” सेठ.
आता मात्र सुभागीची हुशारी एकदम जागृत झाली.
शाळा जास्त शिकली नसली तरी जन्मजात हुषारी आणि जीवनातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण कामी येतंच .
कालपासून सगळे विचार झाले , पण या प्रश्नाचा विचार तिने केलाच नव्हता .
तिचा आताचा अवतार आणि राहणीमान बघता हा प्रश्न येणारच होता.
हार सापडला म्हणून सांगावं तर परिणाम काय होईल ? ती विचारात पडली.
“एवढा काय विचार करतीय? हा हार विकायचाय ना तुला? मग त्याचं बिल नाहितर खरेदीखत लागेल ना . ते आहे का तुझ्याकडे?” मदतनिस विचारत होता.
“सेठ ते कसं असल माझ्याकडं ? ह्यो लई जुना हार हाय. माझ्या आजीनं माझ्या माईला दिला व्हता अन् माझ्या मायनं मरताना मला दिला. ” तिचे डोळे ओलसर झाले.
“अरेरे होय का? कधी गेली तुझी आई?”
“झाली धा वर्ष .तिला वाटलं म्या लगनात घालन हा हार !”
“मग आता का विकायचाय.?”
“सेठ , माझा बा काय बी काम करत न्हाय. पीतो अन् त्यो बीमार बी हाय . घर चालवाया पैसा न्हाय म्हणून ईकायचाय.” ”
“बरं बरं असू दे बघतो. हरकत नाय.”
“सूरजमल हे जरा तपासून घे रे ” शेठने आदेश दिला.
तिने मदतनिसाला हार दिला.
पोर्या चहा घेऊन आला.
सुभागी ला एक चहा आणि एक पारले जी चा पुडा दिला.
तिची भूक अर्धवट राहिली होती.
ती चहा बिस्किटात रमली.
तिला सेठबद्दल खूप आदर वाटला.
सूरजमलने सेठला इशार्याने बोलावले.
सेठ गल्ल्यावरून उठून हळूच आतल्या खोलित गेला.
दार लावलं.
दोघांत काहितरी गूप्त बोलणं झालं.
शेठ बाहेर येवून गल्ल्यावर बसला.
सुभागीचं चहा बिस्किटं खावून झालं.
निरागसपणे ती दुकानातले सगळे डिझाइन्स बघत होती.
सेठने हाक मारली. , “सूरजमल झालं का नाय? लवकर ये ना बाबा”
सूरजमलने त्याच मळक्या कपडयांच्या पुरचुंडीत हार आणून दिला.
“काय झालं काका?” तिने आश्चर्याने विचारले.
सेठ बोलले , ” हे बघ पोरी, तुमच्या घरातला जुना हार असला तरी पण , हा मला विकत घेता येणार नाही.”
“काऊन सेठ?”
“हे बघ मनाला नको लावून घेवू. पण हा हार नकली आहे , सोन्याचा नाही.” सेठ बोलला , पण सुभागीच्या सगळ्या योजनांवर पाणी पडल.
सुभागी मनात खूप दुखी झाली.
आपण उगीच इतका आटापिटा केला असं वाटलं .
चला बरंच झालं ताण गेला ,असही वाटलं एक क्षण.
पुन्हा वाटलं खोटा आहे म्हणजे घालून मिरवताही येईल.
” अहो काका , असं कसं म्हणता?”
तिला आता खोटं बोललेलं निभावणं भाग होतं .
मन म्हणालं – कोणीपण कचर्याच्या ढिगात सोन्याचा हार कशाला टाकल?
आपलंच चुकलं .
असा सगळा विचार डोक्यात चालला होता.
तिच्या चेहेऱ्याचे भाव पाहुन सूरजमल बोलला , ” हे पहा पोरी तुला आमच्यावर विश्वास नसेल तर सराफ्यात कुठंपण विचारून ये. आमचं काय नाय.”
“तसं नाय काका आजीनं खोटा हार कसा जपला एवढं वर्ष अस वाटलं.”
“बनावट तर फार छान आहे हाराची. ” सेठ बोलले .
“मालक ते पॉलिश खूप छान केलंय, जुन्या काळातलं. त्याच्यामुळे तो सोन्याचा आहे अस वाटतं बघितलं की!” सूरजमलने पुष्टी केली.
सुभागीच्या मिश्र भावना होत्या. पण तिला या लोकांवर खूप विश्वास जडला होता.
“तसं नाही काका. तुमच्या वर भरोसा हाय, पण हार विकायचा होता पैशाची गरज होती. ”
ती खंत करत बोलली आणि पुरचुंडी घेवून उठली.
“मग नाय घेणार का विकत?” शेवटचं बोलून ती जायला निघाली.
तेवढ्यात सेठने सूरजमलला इशारा केला.
“सेट गरीब पोरगी आहे. ईमानदार आहे, पैशाची गरज आहे बहुतेक . ते पॉलिश चे पैसे तरी देवू शकता ना बिचारीला.” सूरजमल बोलला.
ती थबकली. “होय का काका? मिळतील का थोडे काही पैशे?”
” सूरजमल बघ बरं, पुन्हा एकदा काही निघतात का?” सेठ बोलला अन सुभागी पुन्हा आशेने थांबली.
हार त्याला दिला अन बाकड्यावर बसली.
तो आत गेला, बाहेर आला .
बोलला ,पुन्हा गेला, आला.
ती आशेने बघत राहिली.
“सेठ ,४३० रुपये भरतील पॉलिशचे , अन ते जडलेल्या खड्यांचे . तेवढे देऊ शकता तुम्ही. ” सूरजमल बोलला.
“एवढेच ??” सुभागी मनातून खूश होती. फुकटात पैसे मिळत होते पण चागले लोकं म्हणून ती तानत होती.
“बरं’ ४७०₹ लावून टाकू . घे “.सेठ बोलला.
“काय शेट ५०० ₹ तरी लावायचे ना केवढ्या आशेने आले होते मी. !” सुभागी नाराजीने म्हणाली.
” बरं पोरी. तुझ्या मनासारखं होऊ दे घे ५०० रुपये.” सेठ हसत म्हणाले.
ती हरखली. ५०० चे पण सुटे घेतले, घरात लपवायला सोपे. बापाने मागितले तरी थोडे थोडे देता येतील.
ती निघणार एवढ्यात सेठ बोलला,” अरे सूरजमल , ते डिजाइन साठी ठेवलेले खोटे हार आहेत ना वरच्या डब्ब्यात. त्यातला एक पोरीला दे बरं ! बिचारी रिकाम्या हाताने चालली ना”
“बऱ मालक ” पाच मिनिटात त्याने खूपच सुंदर नकली हार
आणुन दिला.
आतातर तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
तिने कृतज्ञतेने सेठला हात जोडले अन हार घेवून घरी निघाली.
नवा हार घालुन , स्वतःला आरशात न्याहाळताना ती खूप सुंदर दिसत होती. सुभागी खुश होती.
नवा हार मिळाला, ५०० रुपये मिळाले , अन् आता कुण्णाची भीती पण नाय.
“कचर्यातल्या हाराचा सौदा मात्र फायद्याचा ठरला. देवमाणसं भेटली बुआ आज” सुभागी देवाला म्हणाली.
तिकडे सुभागी गेली अन् सेठ चष्म्याआडून सूरजमलकडे बघून हसले.
“एक चाय बिस्किटं , ५०० रुपये नगद आणि २०० रुपयाचा नकली हार! बदल्यात – तीन तोळ्याचा पाचूचा हार , तो पण अॅन्टीक!! सेठ सौदा फायद्याचा झाला का नाय? ” सूरजमल टाळी वाजवून हसत बोलला.
सेठने पाकिटात ५००० रुपये घातले अन त्याला देत म्हणाले,
” तुझं बक्षिस ठेव बरं. तुला पण फायद्याचा सौदा. ! जा सगळ्यांना एक- एक चहा सांग पटकन.”
सेठ आणि सूरजमल दोघे खुश!
समाप्त
* * * *
©सौ. स्वाती बालूरकर देशपांडे ,” सखी ”