लेखक : मंगेश उषाकिरण अंबेकर
संपर्क : mangeshambekar@gmail.com
दिल दोस्ती आणि ती – Marathi Katha Dil Dosti Ani Ti
गोड गुलाबी थंडीतल्या त्या सकाळी मी आणि दत्ता थोडं लवकरच कॉलेजला येऊन ठेपलो होतो, आता इतक्या लवकर काय करायचं म्हणुन कॅन्टीन कट्ट्याला जाण्यासाठी मागे फिरलो तोच समोरून सडसडीत बांधा, नाके-डोळी सुंदर असलेली ‘शालिनी’ कॉलेजच्या आत शिरत होती, दरवाज्यात आमची नजरेला नजर जशी भिडली रे भिडली, तसा कधीही कोण्यामुलीशी दोन वाक्य बोलतांना हजारदा लाजणारा दत्ता पचकन माझ्या काना जवळ मोठयाने पचकला “अरे ती हीच ना, जी परवा गदरिंगमध्ये कॅटवाक करताना सँडल निसटून धडपडली होती” दत्याने हे असं काय केलं हे काही समजण्याच्या आत लालबुंद झालेल्या शालिनीने आमच्याकडे पाहिले आणि हे वाक्य ‘मी नाही तर दत्या ने म्हंटलं आहे’ हे दर्शविण्यासाठी निरागस भावाने आपली बाकदार मान दत्याकडे वळवली. तो पर्यंत अपेक्षेपेक्षा भयानक आवाजात शालिनी उवाच झालाच “हो, ती मीच होती आणि ती सँडल हीच होती, काढू का?” आईग!!!! दत्याला बघून, दोन पायांच्या मध्ये बॉल लागुन मैदानावर किंकाळत आडवा झालेला नयन मोंगिया आठवला.
दत्या असलं भलतंसलतं काही करेल असं कधी वाटलंच नव्हतं किंवा हे सगळं पूर्ववैमनस्यातून घडण्यासारखा प्रकारही नव्हता, कारण फॅशन डिझाइन शिकणारी शालिनी आणि इंजिनिअरिंगचा दत्ता काडीमात्र संबंध नव्हता……परंतु कोणालाही कमी लेखण किंवा टोचुन बोलणं हा दत्याच्या अंगवळणी पडलेला एक भाग.
दत्या उर्फ दत्तात्रय महादू दगडे, महाभारतातल्या भीमा सारखा अंगाखांद्यानी धिप्पाड, मजबुत धाटणी, निरागस चेहरापट्टी आणि विशेषतः डोक्यानेही अतिशाबुत असलेल एक ‘रांगड’ व्यक्तिमत्त्व. परंतु त्याचं हे बाह्यरुप त्याच्यातल्या कुचित विवेक बुध्दीला अजिबात साजेसं नव्हतं, कुचकं बोलण्यात तर साहेबांची जिभ सरड्या पेक्षाही लांब आणि त्यावर त्यांचं कुचित हसणं बघून ढाण्यावाघही “सालं आपल्यात खरंच काहीतरी कमी आहे” असं समजून डरकाळी फोडायचं सोडून मॅव मॅव करेल.
हे त्याचं बाह्यरुप त्याच्या अंतरुपला झाकून टाकण्यात खूप फायदेशिर पडायचं कारण त्याच्या निरागस चेहऱ्याला बघून बरेच जण दत्या समोर आपली गुपिताचे गाठोडे सोडायची आणि हा पण त्यांना भलतं सलतं मार्गदर्शन करून त्यांच्या गाठोड्यातील मुक्ताफळे चाखायचा, अर्थात हा दत्यचा सर्वात आवडता छंद.
असाच एक खूप गाजलेला किस्सा आठवतो. दत्ता, प्रकाश आणि सोमु हे तिघे एकदम चड्डी दोस्त, तिघेही चड्डी घालण्यापासून पायजमा घालण्याजोगे होऊस्तोवर सोबतच खेळले, शिकले पण कधींच न सवरलेले अशे तिघे. पक्या बद्दल एका शब्दांत सांगायच झालं तर, हा मुळात एक “भोभाभा” जीव (भोळा-भाबडा आणि भावुक) पण दत्याच्या संगतीत तोपण तेवढाच परिपक्कव ढोंगी आणि चाबरा झालेला. म्हणजे बघा, पक्या घरी आपण गेलो आणि त्याला चुकून दुसऱ्यांदा जर पाणी प्यायला मागितले तर तो सरळ सांगायचा “अरे तू आत्ताच पाणी पिलं ना ढसा ढसा आणि आता सगळे ग्लास धुवायला टाकले आहे”, पण हीच गोष्ट जर कोणी थोडया भावुकतेने मागितली तर पक्या घरातले हांडे आणून नरड्यात ओतेलं त्याच्या…..असा पक्या
असंच एकदा भावुकतेच्या भरात पक्याने दत्ता समोर आपल्या प्रेमाची व्यथा मांडली, खरं पाहिलं तर दत्ताला प्रेमा बाबत विचाराने म्हणजे ‘भावी कसायाने भटाकडे बोकडं कसं कापायच? ह्याचं प्रशिक्षण घेण्यासारखं होतं’ कारण दत्ता मुलीं बाबत आधिच चार हात दूर, त्यात मुलींसोबत बोलण्या बाबत लाजाळूच्या झाडाला पण लाजवेल एवढा लाजरा. त्यातल्यात्यात ह्या पक्याला प्रेमपण कोणाशी व्हावं तर आपलाच चड्डीदोस्त सोमुच्या मैत्रिणीशी जिचं नाव होतं “मालू”.
खरंतर पक्यानेच आपल्या वर्गातल्या मालूची दुसऱ्या वर्गात असलेल्या सोमुशी भेट घडवून आणलेली, पण म्हणतात ना प्रेम भल्या भल्याला येडं करून सोडतं, हेच खरं! पक्या कळत नकळत फितूर झाला आणि त्याला फितवणारा प्रेमगुरु पण कोण तर दत्ता, ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात एकच व्हाह्यात रोमँटिक सिनेमा पहिला होता आणि त्यातलं प्रेमाबद्दलचं एक व्हाह्यात ब्रीदवाक्य तो त्याच्या शिष्याना चिपकवयचा आणि तेच पक्याला पण ऐकवलेलं ते म्हणजे ” पक्या! एव्हरी थिंग इज फेअर इन लव्ह अँड वार, तू बिनधास्त रहा”
जसं भिमाला नकुल आणि सहदेव प्रिय होते अगदी तसेच दत्ताला पक्या आणि सोमु प्रिय, पण भीमाने कदाचित नकुलला समजवले असते की, “प्रिय नकुल, हे बघ जी सहदेवावर प्रेम करते, तिच्यावरच तू प्रेम करणे उचित नाही, तू अश्या या प्रेमाचा अट्टहास नको करुस” तसंच दत्ताने पक्याला याच्या अगदी उलट सांगून “अरे, ती तर तुझ्या वर्गात आहे राव, तू बिनधास्त प्रेम कर” असं पक्याला भडकवायचा आणि दोंघांची मजा बघायचा.
असंच एकदा वेलेन्टाइन डेच्या आदल्या रात्री, “पक्या हे बघ, आज तिला सोमुने प्रपोज करण्याआधी तू करायलाच हवा” असं बोलून दत्ताने पक्याला ‘आपल्या शेतातून जाणाऱ्या दुसऱ्यांच्या बांध कसा फोडायचा हे सांगितल’ आणि मग काय चवताळून उठलेल्या पक्या शेवटी हाती ना टिकाव न फावडे घेताच बांध फोडायला निघाला. त्यात पक्याची तरी काय चूक, प्रपोज कधी, कुठे आणि कसं करावं हे ना त्याला स्वतःला न त्याचा गुरूला माहिती. बरं ते तर सोडाचं, प्रपोज करतांना मुलींच्या अपेक्षे प्रमाणे एखादी भेटवस्तू ,कार्ड, रिंग, किंवा निदान एखादं साधं फुलं तरी न्यावं हे पण साधं पक्या कळलं नाही. भुरट्या सारखा हात हलवत, पक्याने सरळ सकाळी ड्रॉइंग हॉल गाठलं. मालू आपली एकटीच होती, पक्या तिच्यापाशी गेला.
“ए!!!मालू ऐकणं एक सांगायचं होतं तुला” पक्या बिचकत बिचकत पुटपुटला. “अरे प्रकाश तू, बोल काय हवंय तुला ” मालूने पेन्सिल पुढे करत विचारलं. पक्या नाहीतरी मालूकडे भुरट्या सारखा काहीही मागायचा पेन्सिल, खोडरबर, गिरमिट आणि हे सगळं तो दत्त्याला जाऊन सांगायचा, “तिने मला आज खोडरबर दिलं” “मी तिला थँक्स म्हणलो” यावर दत्या त्याला “उद्या फुटपट्टी माग,बघू काय म्हणते ती ?” असले टुकार सल्ले दायचा.
आणि शेवटी असल्या सल्ल्याने पक्याने सर्व जीव एकवटून मालूला ‘आय लव्ह यु’ म्हणाला.
दत्ता नेमका त्याच दिवशी कॉलेजात फिरकला पण नव्हता, परंतु गोष्ट जेव्हा पक्याच्या हाता बाहेर गेली तेव्हा तो शेवटी सोमुला सांगायला आला, “सोमु एक लोचा झाला राव, मी मालूला आय लव्ह यु म्हणालो पण ती जाम रागावली यार माझ्यावर काय करू?” सोमुचा जबडा ऊन खात असलेल्या मगरी सारखा उघडाच पडला, त्याला काहीच कळतं नव्हतं की पक्या असा कसा खंजीर खुपसु शकतो, पण ह्याहून सोमुला एकीकडे ‘मालू पक्याला नाही म्हटली’ याचा आनंद जास्त होता. सोमु तसाही अत्यंत फ्लेक्सिबल (लवचिक), समंजस मुलगा, मैत्री खातर हवा तसा, हवा तिथे वळणारा.
पक्या शेवटी कपाळावर हाथ मारून पश्यतापच गाऱ्हाणं मांडल “कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ह्या दत्याच ऐकलं! सोमु काहीतरी सांग तिला,फार चिडलीय ती, ती बोलणार नाही कधीच माझ्याशी राव” सोमुची गाडी एक्सप्रेसवे वर अगदी मधोमध बंद पडावी आणि मागून एक एक गाडीने जोरदार ठोकर द्यावी असं काही झालं होतं. पक्याच्या धक्क्यातून सावरत नाही तोवोस्तोवर अजून एक नवीन धक्का म्हणजे ह्या सर्वा मागे दत्ता होता आणि ज्याला तो पण आपली प्रेमाची गाठोडी त्यासमोर खुली करून मांडायचा.
सोमु समोर उभा राहिलेला प्रश्न फार गहन होता, एकीकडे लहानपणीचा मित्र प्रकाश आणि तिकडे नुकतीच प्रेमात पडु पाहणारी मालू. शेवटी मैत्री आणि प्रेम यामध्ये मित्राला मोठ्यामनाने माफ करून, त्याला वाचवण्यासाठी सोमुने अखेर प्रेमाचा न टाकलेला डाव मालू समोर टाकलाच.
“पक्या, तुला जीवनात जेवढा अभिनय करता येईल, तो तुला आज करावा लागेल, आता जसं मी सांगतो अगदी तसंच कर, मालुकडे जा आणि तिला सांग की सोमुला तुला काहीतरी सांगायचं आहे, कदाचित प्रपोज करण्यासाठीच तुला त्याने समोरच्या कॅफेवर बोलवलं आहे, आणि मी तुला तेच सांगायला आलो होतो पण तू पुढचं ऐकण्याच्या आत गैरसमज करून निघून गेलीस” पक्याने नंदीबैल सारखं गुबुगुबु करत अखेर सुटकेचा सुस्कारा सोडला, निदान ह्या युक्तीतून आपण तरी वाचू ही त्याची भाबडी आशा खरी झाली.
ठरल्या प्रमाणे पक्याने उत्कृष्ठ अभिनयाचं प्रदर्शन करत घश्यात अडकलेला आवळा काढला आणि तो सोमुच्या ताटात पडला. मालू कॅफेत भेटायला जशी तयार झाली तसं सोमुच्या मनात आनंदाने मोर नाचू लागले, कारण एवढं सगळं सांगून जर ती भेटायला येतंय म्हणजे होकार पक्काच, पण सोमुला काय ठाऊक की अजून एक धक्का त्याची वाट पाहतोय ते. जो आवळा पक्याच्या घशात नाही उतरला तो आपल्या घश्यात कसकाय उतरेल, पण पक्या नि दत्ताच्या नादापाई विष पचवण्याचं धारिष्ट स्वतः कडे घेतलं .
बिचाऱ्या पक्याने न बोलता होणाऱ्या सगळ्या बिलाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन, ठरल्या प्रमाणे कॅफेत भेट घडवून आणली, सोमुपण होकारासाठी फुलं पुढे सरसावत “मालू आता तुला अजून काय सांगू, प्रकाशने तर तुला माझ्या मनातलं सगळंच सांगितलं, आता तू तुझा निर्णय काय तो सांग” मालूने हातातलं फुल घेतलं खरं पण एकदम स्तब्ध होऊन मुलींचा पेटंट डायलॉग फेकत “हे, बघ आपली फक्त मैत्री आहे, आणि मी तुला माझा सर्वात खास मित्र मानते, माझा मनात तुझ्या विषयी असलं काही येऊ शकतच नाही” झालं फसला सगळा खेळ. सोमु हिरमुसला हातातल्या ज्युसमध्ये कोणीतरी दही टाकावं असंल आंबट तोंड झालं होतं पण इकडे मात्र पक्या, बिलाचे पैसे फिटले म्हणून, न मला न तुला ज्युस घाल कुत्र्याला करत जाम खुष झाला होता.
सोमुच्या पदरी पडलेली निराशा पक्याच्या निराशेपेक्षा थोडी नवी होती, म्हणून त्याच खापर फोडायला दत्ताला भेटण्यासाठी संध्याकाळी त्याच्या घरी तावातावात गेला, पार शिव्यांची बरसात घेऊन ती संध्याकाळ दत्ताला भेटायला गेली होती.
सोमु दत्ताच्या दारात उभा राहून, ” काकू, दत्ता आहे का हो घरी?” काकू आतल्या खोलीतून ” कोण! अरे सोमु, ये आत ये दत्ता थोडा आजरी आहे , ये तू पण आत ये, हे बघ अजून कोण आलाय?” काकूंनी सोमुला आवाज दिला. सोमुला वाटलं की पक्या येऊन बसलाय दिसतोय म्हणून तो पण आत गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या अंगातील सर्व ताव जागच्याजागीच फतकल मांडून बसला.
शेषनागा वर जसे श्रीहरी विराजमा होतात, तसंच खाटेवर हाताची उशी करून झोपलेल्या दत्ताच्या पायाशी खुर्चीवर साक्षात मालू बसलेली होती आणि त्यांवर दत्ताच कुचित हास्य सोमुला अजून खूज करून गेलं. पण तुम्हाला आणि सोमुला जे वाटत होतं तसं काही नव्हतं, मुळात दत्ता प्रेमात पडणं एक अश्यक्यप्राय बाब होती.
बऱ्याच दिवसांनी कळलं की, मालू दत्ताच्या बहिणीची खास मैत्रीण होती आणि मालूला दत्ता फ़ार आवडायचा,पण ह्या अ-रसिक दत्याने मुली ऐवजी मैत्रीला साथ देत आपल्या मित्रांना न म्हणणाऱ्या मालूला “सगळं कळतं असतांनाही विनाकारण एखाद्यला झुलवणे योग्य नाही” असे खडे अन कडवट बोल ऐकवत, तिच्या जन्माचा उद्धार केला.
नंतर मालू कधीच त्या तिघांच्या आणि ते तिघे मालूच्या वाट्याला गेले नाही. बरं असेही नाही की मालू नंतर कोणी भेटली नाही परंतु पक्या,सोमु आणि दत्ता ह्या तिघांनीं मालूचा विषय ज्या ज्या वेळी निघाला त्या त्या वेळी खळखळून हसल्याशिवाय राहिले नाही आणि आजही होतो.
समाप्त