मराठी कविता ती – Marathi Kavita Ti

0
1194

Marathi-Kavita-Ti

कवयित्री : निरुपमा महाजन, पुणे
संपर्क : ozone.point@gmail.com

मराठी कविता ती – Marathi Kavita Ti

ती भल्या पहाटे उठते
झाडांना देते पाणी,
लावीत दिवा देवाला
गुणगुणते मंजुळ गाणी!

ती असते, सकाळ होता,
बांधून पदर साडीचा
एकेक पसरतो दरवळ
भाजीचा, सोलकढीचा!

बाळास घालते न्हाऊ,
आजीचे औषधपाणी,
देऊन डबा राजाला
गालांत हासते राणी!

ती झटकन बदली कपडे
कामाला जाण्यासाठी,
बाळाचा घेई पापा
ओलावा पापणकाठी!

ती अखंड कामे करते
सावरते संसाराला,
सांजेला घरात परते
घे कवेत मग बाळाला!

ती परत उभी ओट्याशी
पाहुणे कुणी घरट्यात,
तृप्तीचे देती ढेकर
ती हळूच हसे गालांत!

ती खाते किंवा नाही
हे कोणी जाणत नाही,
तक्रार तरी ओठांवर
ती चुकून आणत नाही!

ती अफाट कामे करते,
मायेने करते सेवा
झोपता घरातील सारे
देवाचा करते धावा. .

निजल्या शांत जीवांच्या
डोक्यावर फिरवीत हात
मागते मागणे ‘त्याला’,
“सगळ्यांना ठेव सुखात!”

– निरुपमा महाजन, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here