लेखक : वासुदेव पाटील
संपर्क : vasudevpatil108@gmail.com
वडावरच भुत – Marathi Katha Vadavarach Bhut
दातारवाडीत माना शिर्के ही एक बडी आसामी. मानाजी थोरला ,गणाजी शिर्के मधला व दिवाण्या लहान. सर्व राबता मानाजीरावच सांभाळत. शेती ,वडिलोपार्जित सावकारी,उसाची खानसरी पाऊण्याची उठबस, घेणंदेणं सर्व मानाजी रावच पाहत. अंगची हुशारी पाहुन वडिलांनी पाचवीतुनच शाळेस रामराम ठोकावयास लावला. तेव्हापासुन मानाजी रावांनी ही मागे वळुन पाहिलं नाही व होतं त्या ऐश्वर्यात कित्येक पटीनं भर घातली. पण मनात अपुर्ण राहिलेल्या शिक्षणाची खंत त्यांना कायम सले व तालुका ,जिल्ह्याला अधिकाऱ्यात उठबस करतांना ती त्यांना जाणवेही. म्हणुन आपण नाही शिकलो पण आपले भाऊ गणा व दिवाण्यानं भरपुर शिकावं म्हणुन त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. जिल्ह्याला मराठा बोर्डिंग ला ठेवलं घरुन सर्व काही पुरवलं. बोर्डिंगला घसघसीत देणगी व शिक्षकांना रानातल्या हरेक जिन्नसीचा वानवळा पोहोचता केला. पण दिवाण्याला आपल्या मोठ्या भाऊपेक्षा जास्त शिकणं म्हणजे भावाचा उपमर्द वाटला कि काय तो पाचवीपर्यंत जेमतेम शिकला व गणा सातवी फायनलच् झाला व गावात येवुन आयुष्यभर तिच शेखी मिरवु लागला कि मी जिल्ह्यातील पहिला व पहिल्या क्रमांकानं फायनल पास होणारा गडी. त्या काळात तरी गणाजी रावांना घरबसल्या स्कुलमास्तराची ऑर्डर आली. सातपुडयात अक्राणीमहलमधील पाडयावर नेमणुक. मानाजी रावांना तरीही समाधान कि भाऊ नाही अधिकारी पण मास्तर तर होतोय. पैशाची ददात नव्हती पण एक मानाची नोकरी म्हणुन त्यानं ती करावी त्यांची अशी इच्छा. दुसऱ्या दिवशी लवाजम्यासह गणाजी रावांना पाठवलं. परंतु दोनतीन दिवसांनी तिथले पहाड, नद्या, वनराई,श्वापदे,तिरकमठाधारी आदिवासी लोक पाहुन स्वारी परत आली. औटघटकेची नोकरी मात्र गणाजी रावांना हयातभरची मास्तर ही पदवी बहाल करुन गेलीव सारी दातीरवाडी त्यांना पुढे गणा मास्तरच म्हणु लागली.
दिवाण्याची कहाणी तर याहुन सरस. स्वारी एकदम विसरभोळी. माणसाच्या भाकऱ्या द्यायला बजावुन बजावुन खालच्या रानात पाठवलं तर हे मावळतीच्या रानात जाऊन बसणार. बसुन बसुन वाटलं तेव्हा घरी परतणार व संताप त्रागा करणार कि माणसाला मुर्ख समजतात व्यवस्थित सांगत नाही. माणसं कुठं व कुठं पाठवतात. मग सारा वाडा त्यांची समजुत काढी.
एकंदरीत सारा राबता,कुटुंब ,भावांना मानाजी रावांनाच सांभाळावं लागे. मानाजीरावही भावावर तितकचं प्रेम करी. मानाजीराव हुशार,व्यवहार कुशल प्रेमळ पण तेवढेच अंधश्रद्धाळु.
अख्ख्या गावाला पाणी पाजणारी वाडीत वाडीबाहेर मानाजीरावांच्या खळ्यालगत बांधीव एकच विहीर. अतिशय खोल व नित्य भरपुर पाणी असणारी. विहीरीलगत दोन तीन पिढीचा वारसा सांगणारं भलं-मोठं वडाचं झाड होतं. या झाडाखाली वाडीतील झाडुन सारे आबाल-वृद्ध मुंजे, वीर, वडडाकिणी हारीनं व दाटीवाटीनं अंग चोरुन बसवलेली. अमावस पाडा,कर ला साऱ्या वाढीचा घास चढे व तो खाण्याकरिता कुत्र्यांची झुंबड उडे. तसेच मयताची दसवं तर्पन आदी विधीही विहीरीवरच होई. अख्ख्या वाडीत एक वदंता होती कि अमावस पाड्याला या वडावर सुभान वडाराचं भुत वावरतं व अनाहुत कुणी माणुस दिसलं कि वडावरुन धपकन विहीरीत उडी मारतं. दिवसा धुणी धुुणाऱ्या बायांनी गजबजणाऱ्या विहीरीवर जुनी जाणती माणसं असल्या दिसी वा सणासुदीला अपरात्री विहीरीजवळ वा वडाजवळ जात नसत. एक अनामिक भितीचं सावट या झाडाखाली वावरे. त्यामुळं खळ्यात नाईलाजानं कामवाले माणसं झोपत असली तरी मानाजी अमावस पाडा टाळत असे.
सरत्या अश्विनला वाडीनं लक्ष्मीपुजन साजरा केलं व वाडी झोपली. बारा नंतर वाडीवर बोचऱ्या थंडीनं हातपाय पसरले. सारी वाडी पाड्याच्या पहाटेला गाढ झोपेत असतांना काही मोकाट कुत्री केकाटत होती. पहाटेची वेळं. अचानक मानाजी रावाचं पोटं कापुन आलं. त्या तिरमिरीत आज पाडा हे मानाजीराव विसरले व अंगावर शाल टाकुन एका हातात विजेरी घेऊन खळ्याकडं निघाले. गल्लीत कुत्री भेसुर केकाटत होती. सारा गुडुप अंधार. विजेरीच्या झोतात कुत्र्याचे डोळे चकाकत होते. मानाजी राव खळ्याजवळ आले व खळ्यात झोपलेल्या माणसाला हाक मारणार तेवढ्यात विहीरीत धपकन आवाज आला. व मानाजीच्या अंगाचा थरकाप उडाला . विजेरीचा हात एकदम विहीरीकडं वळला. त्या उजेडात विहीरीच्या रहाटाच्या कठड्यावर दिवाण्या वापरत असलेली जाड काठी,बुट,शाल व डबा दिसताच मानाजीनं भितीनं बोंब ठोकली . माझा दिवाण्या गेला रं पळा पळा!आवाजानं खळ्यात झोपलेली सदु , महादु निंब्या हि माणसं खडबडुन उठली व विहीरीजवळ पळत आली. मानाजीचा आकांत चालुच होता. साखरझोपेत असलेली वाडीतील माणसेही उठली व काय झालं काय झालं करत आवाजाच्या दिशेनं विहीरीकडं पळत येऊ लागली. दिवाण्या विहीरीत पडला कि कुदला हेच कळेना. जो तो चौकशी व सुचना करु लागला पण विहीरीत उतरायला तयार होईना. कारन प्रत्येकाला आज कोणता दिस व सुभाण्याचं भुत हे पुरतं ठाव होतं तितक्यात कुणीतरी सुचवलं दोर आणा व दोर कमरेला बांधुन उतरा मग दिवाण्याला शोधा. मग दोर आणण्याकरिता धावपळ सुरु झाली. खळ्यातुन आणण्याकरिता सदु पळणार तितक्यात महादुनं ते जुने आहेत नविन वाड्यावर आहेत तेच आण म्हणुन सदुला वाड्यावर पिटाळलं . सदु पळत पळत गेला व मानाजी रावांची पत्नी सोजरा आक्काला बोंबलुन “आक्का दिवाणराव विहीरीत पडले” सांगुन दोर मागणार तितक्यात देवळीत पडुन असलेला दिवाण्याच बाहेर येऊन काय झालं म्हणुन चौकशी करु लागला. त्याला पाहताच सदुला जोराचा सुखद धक्का बसला व अवं तुम्ही इथं मग तुमचं बुट काठी शाल विहीरीवर कशी?मग विहीरीत कोण पडलं असावं? आरं तिच्या मारी!बुट तिथं राहिलेत का? मी हाळीवर हातपाय धूतांना काढलेत वाटतं व कुठं ठेवलेत हे शोधत शोधत वाड्यावर आलो. सदुनं कपाळावर हात मारला व पळत येऊन दिवाणराव सुखरुप घरी हाईत व ते या वस्तु हाळीवर हातपाय धुतांना इथं विसरलेत असं सांगताच मानाजी बरोबर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. पन मानाजीच्या मनात मग पाल चुकचुकली जर दिवाण्या नाही तर विहीरीत धपकन आवाज करत पडलं ते कोणं? जुन्या जाणत्या मानसांना कळुन चुकलं कि कोण असावं!त्यांनी लगेच सारवा सारव करत चला रं बरं झालं दिवाण्या सुखरुप आहे चला निघा आपापल्या घरी. व महादुला मानाजीला घरी घेऊन जायला फर्मावलं.
सकाळ होताच सारी सणात व कामात गर्क झाली पण मानाजी देवळीत बसत ,उठत येरझारा घालत एकच विचार करु लागले तो आवाज कसला?कोण कुदलं असावं? खुळ्यागत बसुन बसुन तोच विचार. सोजराईनं काय झालं?बरं नाही का?म्हणुन चौकशी केली. पण काही नाही गं कणकण भरलीय. सोजराई जे काय समजायची ते समजली. तिनं गावातल्या डाॅक्टरांना बोलवुन उपचार केले. पण दुपारनंतर ताप चढतच राहिला. व संध्याकाळ पर्यंत मानाजी बरबडायला लागलेत. गावातल्या देवऋष्याला बोलवुन उतारा झाला. तरीही फरक नाही. सारी वाडी चिंतेत पडली. जुनी खोडसाळ खोडं खाजगीत बोलु लागली,आरं लेकांनु तुम्ही काहीही करा पण मानाजीचे आता दिस भरलेतच . सुभाण्या हाय तो !सोडणार नाही तो. व चारपाच लोकांना जमवुन सुभाण्याचा किस्सा खुलवुन सांगु लागली. माज्या बा नं खुद्द पाहिलय ते,सुभाण्या कर्नाटकातला होता. विहीर फोडायचं काम घ्यायचा. विहीर खोदतांना खडक लागला कि लोक त्याला बोलवत. तो दारुला बत्ती देऊन खडक फोडी. वाडीची विहीर खोदतांना तो विहीरीत सुरुंग करुन दारु भरुन बत्ती देऊन वर चढण्याआदीच बार उडाला व सुभाण्याच्या देहाचा भाजला कोथळा जवळच्या वडावर अडकला. त्या दिवसी तो पाडा असल्यानं बत्ती देण्याचं नाही म्हणत होता पन काम लांबणीवर पडतंय म्हणुन वाडीतल्या लोकांनी त्याला धमकावलं होतं तो राग मनात घेऊनच तो मेला म्हणुन अमावस पाड्याला, कर असला म्हणजे तो आपला इंगा दाखवतो.
सोजराई हुशार होती . हिंमतीची होती . लग्न होऊन दातीर वाडीत आल्यापासुन ती प्रत्येक निर्णयात मानाजीरावाच्या खांद्याला खांदा लावुन उभी राहायची व आपल्या साध्याभोळ्या दिरांवर, जाऊंवर जीवही लावायची. म्हणुन तिला सारे आक्काच म्हणत. तिनं मनाशी काही ठरवलं व आपल्या धनीचा भरवसाचा माणुस महादुला बोलावलं. ‘महादु धन्यावर प्रसंग बाका आलाय,धन्यानं मनानं कच खाल्लीया’ मी सांगते तस रातीला कर व ती महादुच्या कानात कुजबुजली.
सकाळी मानाजी रावाची तब्येत जास्तच बिघडली सारी वाडी येऊन घटका दोन घटका बसुन जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी रात्री महादुनं आपल्या म्हशीचं एक पारडु गायब झालय म्हणुन मानाजीरावाच्या कानावर घातलं पण शुद्ध हरपायला आलेल्या मानाजीरावांनी ‘आता कायबी खरं नाही’ एवढं बोलुन मान फिरवली. महादुनं आक्काकडं पाहत काम फत्ते झाल्याचं सुचवलं.
आज मानाजीरावांना पडुन चार दिस झाले. ते आता आल्या गेल्यांकडे निर्वाणीचं बोलु लागले. आता मी काय जगत नाय. माझ्या भावांना सांभाळा. सोजरे हा राबता आता तुच सांभाळ. सारी वाडी हबकुन गेली. संध्याकाळी पाच वाजेला धावत पळत सदु वाड्यावर आला व” मालक , त्या रातीला तुम्ही आवाज ऐकला तो आपल्या म्हशीच्या पारडुचा होता. पहाटेला सुटलं असावं व चरत विहीरीजवळ जाऊन पडलं. सकाळ पास्न दुर्गंधी कसली येतेय म्हणुन ढुंकुन पाहिल्यावर पाण्यात फुगुन तरंगतांना दिसलं. सारी वाडी विहीरीवर गोळा झालीय व त्याला बाहेर काढत आहेत. हे ऐकल्यावर शुद्ध हरपलेल्या मानाजीरावांना एकदम त्राण आलं व ते उठुन बसले. त्याही स्थितीत त्यांनी सदुबरोबर विहीरीवर धाव घेतली. वाडीतल्या साऱ्या बाया माठातलं पाणी बाहेर फेकत होत्या लोकं नाक बांधुन पारडु बाहेर काढत होते काही ओकत होते. पण मानाजीला हायसं वाटलं व तरतरी आली. त्यांची खात्री पटली कि ते पारडु होतं सुभाण्याचं भुत नव्हतं . ते तसेच घरी आले व “सोजरे मला जेवायला वाढ लई भुक लागलीय गं!,अन् तुम्ही पण जेवा आता मला काहीच होणार नाही” असं ठणकावुन सांगु लागले.
देवळीत थांबलेल्या महादुकडं मिश्कील हसत सोजरानं जोरात श्वास सोडला.