अंधारातील दिवाळी – Marathi Katha Anadharatil Diwali

0
3499

Marathi-Katha-Anadharatil-Diwali
लेखक : ज्योती थोरवत
संपर्क : jyoti.thorwat55@gmail.com

अंधारातील दिवाळी – Marathi Katha Anadharatil Diwali

“हा सुट्टीचा अभ्यास, सर्वांनी पूर्ण करून आणायचा फक्त दिवाळी खात ,नवे कपडे घालून मिरवायच नाही….” .

गावातील एकुलत्या एक सरकारी शाळेतील कामनिष्ठ शिक्षिका वर्गातील मोठ्या मुलींच्या समूहाला सांगत होत्या…

पोरी लगेच  दिवाळीच्या नावानेच आपापसात कुजबुज करून गलबला करू लागल्या. पण अनुजा मात्र  अभ्यास काय आहे कसा करायचा इतकं बघून शांत बसून होती..

“लगेच गेल्या दिवाळीत … आवाज कमी करा काय बाजार भरवलाय ..??” शिक्षिकेच्या आवाजाने वर्ग शांत झाला.. “आणि बरं का सर्वांनी दिवाळी नंतरच्या पहिल्या बुधवारी आपापले दिवाळीचे नवे ड्रेस घालून यायचे आहेत…”

यानंतर मात्र पोरी कल्ला करत घरच्या दिशेने धूम ठोकल्या.. अनुजाला मात्र इतकं लांब अंतर पायी कापून घरी पोचण्याची धडपड..

घरी जात असताना दिवाळी साठी सज्ज दुकाने तसेच खरेदीसाठी लोकांची झुंबड दिसत होती.. रंगीबेरंगी रांगोळ्यांचे ढीग बाजूलाच वेगवेगळ्या आकाराच्या नक्षी असलेल्या, रंग केलेल्या पणती अनुजाच लक्ष वेधून घेत होत्या.. मधेच कुठून तरी कपड्याच्या दुकानातून किंमतीवर घासाघीस ऐकू येत होती..इकडे मात्र तिने जाणीवपूर्वक नजर जाऊ दिलं नाही.. वेगवेगळे आकाशकंदील वाऱ्यावर झुलत घरांची वाट पहात होते तर विविध फराळाच्या पदार्थ विक्रीही जोरदार सुरू होती..

“दिवाळीत इतकं सगळ करतात का?? आपण तर कधीच करत नाही इतकं..!!” अनुजा आईला विचारत होती.. आई बिचारी सगळं माहीत असून ही आनुजाला कस बसं समजवायला बघत होती.

“हो करतात ना.. रोज पणत्या लावतात, मोठमोठ्या रंगीत रांगोळ्या काढतात, आकाशकंदील लावतात जो दिवाळी संपल्यानंतरही महिनाभर राहतो, फराळ बनवतात,एकमेकाला देतात, नवे कपडे, वस्तू खरेदी करतात…”

छोटी अनुजा अचंबित होऊन आईकडे बघत होती, “आई शाळेत बुधवारी नवा ड्रेस घालून यायला सांगितलाय.. निरागसपणे अनुजा सांगत होती..”

जशी आई बाजार घेऊन आली तशी अनुजा आणि तिचे मोठे बहीण भाऊ धावत जाऊन पिशवी धुंडळू लागले पण दिवाळीच्या तयारीच त्यात काही नव्हतं.. कांदे बटाटे टोमॅटो असलच दैनंदिन सामान बघून तिघेही हिरमुसले…कारण त्यात दिवाळीची तयारी म्हणून फक्त उटणे आणले होते. आसपासच्या ओळखीच्या बाया आईला सांगताना अनुजा ऐकत होती…

“करंज्या झाल्या बनवून, लाडू झाले, आता बाकीचं बनवायचं, कढीपत्ता द्या ना  चिवडा बनवणार आहे… तुमचं कुठवर आलं काय काय बनवलं…??”

आईला त्यांच्या बोलण्यातली खोच समजायची “आमचं पण झालंय बनवून…” अस सांगून मोकळी व्हायची…

“आई आपण तर काहीच नाही बनवलं मग तू तर सगळ केलं म्हणून सांगितलं असं का?? कधी करायचं आपण.??”

“लेका तुझ्या बाबांना काम नाही. मग पैसे नाहीत कुठून आणणार सगळ आणि कुठून बनवणार..?? रोजचा दिवस कसा घालवायचा तेच समजत नाहीये…कोण बघायला तरी येत नाही.. आपला त्रास आपल्यालाच माहिती…!!!”

अनूजाला आज खरी गोष्ट समजली होती,पण तिच्या मोठ्या बहिणीला आधीपासूनच माहीत होती, ती मातीपासून पणत्या बनवण्यात गुंग झाली होती.. पण प्रत्येक पणती सुकल्यानंतर पेटण्याआधीच मोडून जायची आणि त्यातलं तेलही वाया जायचं मग परत त्यावर आईचा ओरडा असायचा…

अनूजाला मात्र दिवाळी साजरी करायचीच होती…कोणाला काही न विचारता, न सांगता ती कामाला लागली … तसा अजून थोडा वेळ तिच्याकडे होता.. घर रंगवण्यासाठी आणलेला शेडू ,जुने फाटलेले जॅकेट मधील नायलॉन चे धागे, चाळण, पाणी अस सगळ घेऊन तिने भराभर वेगवेगळ्या आकार ,प्रकारच्या पणत्या बनवून त्या सुकण्यासाठी ठेऊन दिल्या… मग तिने घरातील विविध उपलब्ध असणारे रंग घेऊन रंगीत रांगोळ्या बनवल्या.. अगदी उपेक्षित कोळसा, वीटेलाही तिने वरवंटयाने बारीक करून इतर रंगांसोबत जागा दिली…

सुकलेल्या पणत्याना मग तिने तीच्याकडील पेंटिंगच्या रंगाने सजवले.. घरातील जे काही सामान असेल त्यानुसार तिघांनी मिळून कसा बसा कंदील बनवला..

पोरांचं कौतुक बघण्यावाचून आई बाबा काही करू शकत नव्हते…

दिवाळीचा पहिला दिवस अजून उजाडायचा होता… कडकडून थंडी पडली होती. दाट धुक्यात सगळ काही समावून घेतलं होतं .. आदल्या दिवशीच अनुजाने शेणाने जमीन सारवून मोठा सडा बनवून ठेवला होता. दोघी बहिणी  सगळ सामान घेऊन दिवाळी साजरी करायला तयार होत्या.. आदल्या दिवशी ठरवलेलं रांगोळी डिझाईन घेऊन दोघी सुरू झाल्या.. डासांचा त्रास रोखण्यासाठी मागे पालापाचोळा पेटवून धूर ही बनवला होता… बघता बघता धुकं सरून सूर्य प्रकाशाचं राज्य आलं.. तोपर्यंत पोरीनी भली मोठी रांगोळी काढली होती… दिवसभर त्या रांगोळीचे रंग उन्हाने इतर रंगासारखे फिके पडले नाहीत.. अनुजाची दिवाळी सुरू झाली होती…

संध्याकाळ झाली तशी अनूजाची पणती परीक्षा वाट बघत होती.

आईने कणकेचा दिवा लावला आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करून ती आत गेली तशी अनुजा हळूच आपल्या बनवलेल्या पणत्या घेऊन आली… ती आणि तिच्या बहिणीने घाबरतच तेल घालून पेटवल्या आणि निरीक्षण करत बसल्या… तेल पूर्ण संपल पण पणती फुटली नाही… दोघींच्या आनंदाला पारवर उरला नाही… मग आईही त्यांना साथ देत विजलेल्या पणत्या एकाजागी आणून ठेवायची.. इकडे वेडावाकडा कंदील ही रात्रीच्या अंधारात आणि पणत्याची सोबत घेऊन झुलत होता…

अनुजाची दिवाळी साजरी करण्याची इच्छा जणू सर्वांनी पूर्ण करण्याचं ठरवलं होतं.. आजच्या दिवसाचा तिचा आनंद इतका मोठा होता की फराळाच्या पदार्थाची उणीव तिला जाणवली देखील नाही.. दुसऱ्या दिवशीच्या रांगोळीचे डिझाईन ठरवून आणि बाकी तयारी करून दोघी बहिणी आनंदाने झोपी गेल्या…

दुसऱ्या दिवशी ही अशी मोठी आकर्षक रांगोळी, संध्याकाळी इतक्या पणत्या ,हे रस्त्यावरून येणाजाणाऱ्या लोकांसाठी कुतूहलाचा विषय बनले… इतके की ते काही क्षण थांबून हे दृश्य डोळ्यात साठवून घेऊ लागले….. आपण इतक्या इतक्या कीलोचे इतके पदार्थ बनवले अस सांगणारे ही आता नजर चोरू लागले…. काय लॉटरी लागले वाटतं…!! इथपर्यंत बोलून गेले.. लोकांना काय माहिती अनुजा ची दिवाळी कशी साजरी होतेय ते.

प्रत्येक दिवस अनुजाचा होत चालला होता… लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र अनुजा हतबल होती.. नवे कपडे नव्हते.. कुणाकडेही.. आणि यात ती काहीही करू शकत नव्हती.. जे जस आहे त्यातच साधेपणाने पण श्रद्धेने पूजा झाली.. अगदी नैवेद्यासाठी ही काही गोडधोड बनवण शक्य नसल्याने रोजचे जेवणच नैवेद्य बनवले होते..

पाडवा  , घरच्या भाकड असलेल्या जनांवरांच औक्षण केलं, शेणाने बनवलेल्या गवळणी आणि त्यांची मुले, जाते भाकरी, भाजी डोक्यावरील टोपली सगळ.. त्यांना शेतातील कुर्डूची फुले, आघाडा ,मका ,झेंडू ई ने समजून घरातील उखळाभोवती पूजा करायची… मग चुन्यात हाताचे ठसे भिजवून जनावरांच्या खुराचे निशाण जमिनीवर उमटवायचे… मिळाला तर ऊस लावायचा नाहीतर ज्वारी… हे सगळ आई कौतुकाने करायची… अनुजा इथे फक्त रांगोळी काढण्या पुरती असायची… शेणाच्याच गवळणी आणि त्यांचं जेवण, वस्तू ही शेनाच्याच फक्त त्यांच्या टोपलीत दही तेवढंच असायचं.. पण त्यांनाही कधी नैवेद्य म्हणून गोडधोड मिळाला नाही.. पीठल भातावरच त्या समाधान मानून संध्यकाली घरच्या छपरावर जाऊन बसायच्या… आणि मग घरातील बोका कृष्ण बनून त्यांच्या टोपलीतील दही चाटून आपली दिवाळी साजरी करायचा .

भाऊबीजेला भावाच औक्षण हसत मस्करित पार पडायच. अगदी ओवाळणी म्हणून दार्शनिक किंवा वस्तू रूपातही काही मिळत नसलं तरी दोघी बहिणी हट्ट न करता सगळ समजून घ्यायच्या…

दिवाळी संपली, सगळ्या पणती ,रांगोळी गोळा करून घरात वरती कुठेतरी पुढच्या वर्षासाठी ठेवून दिल्या.. पण एक पणती तुळशी जवळ तेवत असायची ते तिच्या लग्नापर्यंत.. अनुजा हे काम आठवणीने करायची.. मग रात्रीच्या अंधारात आकाशकंदील आपलं वेडवाकड अंग वाऱ्याच्या हेलकाव्यासोबत सांभाळत पणतीला सोबत करत नव्या उदयाची वाट पाहत राहायचे…

इतरांसारखे दिवाळी कधी साजरी करणं जमलं नसलं तरीही अनुजाची दिवाळी मात्र  खऱ्या अर्थाने साजरी झाली होती. रोज मोठमोठ्या रंगीत रांगोळ्या, पणत्यांची आरास, वेडावाकडा असला तरीही स्वतः बनवलेला आकाशकंदील, पिठलं भाताच्या नैवेद्यावर समाधान मानून गेलेल्या शेणाच्या गवळणीचा गोतावळा, आणि त्यांच्या टोपलीतिल दही खाऊन समाधानाच ध्यान पावणारा बोका.. ओवाळणी मिळाली नसली तरीही आशीर्वादाची वाढत जाणारी शिदोरी.. सकाळच्या थंडीत उटण्याने आंघोळ…. सगळ काही तरी होतच…. कारण हे सगळ तिच्या आवाक्यात होतं, तिने घडवून आणलं होतं..

पण नवे कपडे..???

“सगळ्यांनी सुट्टीचा अभ्यास केलाय का? ज्यांनी केला नाही त्या उभ्या रहा आणि ज्यांनी केलाय त्यांनी इकडे टेबलावर आणून ठेवा…” शिक्षिका स्थिर आणि कडक आवाजात बोलत होत्या… अनुजाने आपला अभ्यास जमा केला..

ज्यांनी नाही केला त्यांनी उलटतपासणी झाली, छडीची शिक्षाही झाली.. वर्गात अभ्यास तपासणी करता करता शिक्षिका एक वही हातात घेऊन बोलू लागली… “ही कोणाची वही आहे..?”

आपली वही बघून अनुजा घाबरली, कारण ती नवी वही नव्हती. सुट्टे ताव एकत्र करून त्यावर जुन्या वहीचा पुठ्ठा लाऊन काहीशी ओबडधबड वही बनवली होती.

“माझी आहे…” अनुजा उभी रहात घाबरतच बोलली..

मधेच असं नवी वही घेणं तिला परवडणार नव्हत. अनुजाला समोर बोलवत शिक्षिकेने तिची वही सर्वांसमोर उघडून पूर्ण वर्गाला दाखवायला सुरू केली..

” बघा किती सुंदर पद्धतीने अभ्यास केला आहे. पूर्ण तर आहेच पण व्यवस्थित, सुटसुटीत पण आहे, हस्ताक्षर ही सुंदर काढले आहे.. शिवाय जुन्या वस्तू वापरून वही बनवली आहे…. तुम्हाला यातून शिकलं पाहिजे…”

अनुजाला अशी अकल्पित शाबासकी तिच्या दिवाळीच्या आनंदाला द्विगुणित करून गेली..कदाचित तिच्या दिवाळी साजरी करण्याच्या कल्पनेलाही ती शाबासकी होती असं तिला वाटलं..

मी हा ड्रेस घेतलाय, मी मुंबई वरून घेतलाय , मी अमुक अमुक दुकानातून घेतलाय… खूप छान आहे.. पोरी त्यातच हरवल्या होत्या कारण उद्या बुधवार होता…

उद्याचा दिवस येऊच नये.. शाळेला सुट्टी असावी, काहीतरी घडू देत पण मला उद्या शाळेत जाव लागू नये… अनुजा एकटीच बसून मनात बोलत होती.. “जेवायला चल…” आईच्या या जोराच्या हाकेने ती भानावर आली.. “आई मला जेवायचं नाही आणि उद्या शाळेत पण जायचं नाही…”

“का ग काय झालं ..??आज शाळेत तुझं कौतुक झालय…!!”

“आई उद्या बुधवार आहे आणि माझ्याकडे दरवर्षी सारखच नवा ड्रेस नाही..सगळ्या मुली नवे कपडे घालून येतात.. मला चिडवतात , हिनवतात..  खूप वाईट वाटतं…आणि असं वाटतं की बुधवार कधी येऊच नये…!” चेहऱ्यावर नाराजी आणि रडू दोन्ही दिसत होते.

“असं नाही करायचं , नवीन नाही पण फाटके तर नाहीयेत ना कपडे.. कित्येक लोकांना तेही मिळत नाहीत.. आपण इतके श्रीमंत नाही की सगळ्यांना दरवर्षी नवे कपडे घेऊ शकू…”आईला सगळ माहीत होत पण ती तरी बिचारी काय करणार..

जीवावर आल्यासारखं ती शाळेत गेली आणि नेहमीसारखं तेच चिडवण सुरू झालं…  तू नाही घेतला ड्रेस..?? म्हणून बऱ्याच मुली नवीन ड्रेसच्या तोऱ्यात होत्या.. मुलींचं वय जास्त नसलं तरी गल्लीतल्या राजकारणात वाढलेल्या होत्या.. आणि अनुजा आश्रमात वाढलेल्या शिष्यासारखी निष्पाप ,निरागस होती.. तिचा ड्रेस किती छान आहे ना…?? असं उगाचच अनुजाला चीड वण्यासाठी तिलाच येऊन विचारायच्या…  अश्यावेळी.. अनुजाची राग आणि दुःख यांच्या द्वंद्वात  खूप घुसमट व्हायची ..मग एकदा असह्य होऊन परस्थितीचे वारंवार  फटके  खात असलेल्या अनुजाचे व्यवहार ज्ञान काही कमी नव्हते आणि ती बोलून गेली….

” पैसे दिले की मिळतात छान कपडे त्यात तिने काय केलय ड्रेस छान असायला….!!!”

सगळ्या मुली क्षणात तेथून पांगल्या…

पण या सगळ्याच दुःख ही वाटतं होतच पण रागही आला होता आणि पुढेही असच घडत राहील…. का असं आपल्या बाबतीत.. का एखाद्यावेळीही आपण कधीच नवे कपडे घेऊ शकत नाही.. नेहमी इतरांनी वापरून टाकून दिलेले कपडेच आपली वेळ आणि परिस्थिती सांभाळून नेतात….नवीन कपडे खरच इतके महाग असतात का??? जे आपल्याला कधीच घेणं शक्य होत नाही…हे उत्तर न सापडणारे अनुजाचे प्रश्न होते..

शाळेतील प्रत्येक बुधवार असच तिला त्रास देऊन जायचं..

कॉलेजची वर्षे संपली तरीही  नव्या कपड्यांचा सुवास ही अनुजाला माहीत नव्हता…

हे सगळं तिचा पिच्छा सोडत नव्हतं..

तोपर्यंत… जोपर्यंत ती स्वतः कमावू नाही लागली…

अनुजा मागच्या काही वर्षाप्रमाणे यंदाही काहीशी विचारात होती की कुणासाठी काय घ्यावं.. शेवटी सर्वांसाठी नवे कपडे घ्यायचे ठरवलं कारण याईतकी अमूल्य खरेदी दुसऱ्या कशाची असू शकेल असं तिला वाटलं नाही आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू पसरलं.. कारण काही दिवसांवर दिवाळी आली होती आणि ती त्याचं निमित्त साधून घरी सर्वांना भेटायला जाणार होती… पण नवे कपडे आणि दिवाळी हा विषय निघाला तशी ती नकळत तिच्या चेहऱ्यावर च हसू जाऊन निराकार भाव आले आणि ती बालपणीच्या काळात पोचली होती…

आईच्या फोन कॉल ने ती भानावर आली… दिवाळीत तर ती घरच्यांसाठी नवे कपडे घेऊ लागलीच पण वर्षभर ही काही ना काही निमित्ताने नवे कपडे खरेदी करण्याचं चक्र चालू ठेवलं…

कदाचित ती  आता परिस्थितीवर सूड उगावत होती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here