‘कास’ क्षण
आपल्या व्यस्त schedule मधून वेळ काढून आपल्याला चक्क कुठे गावाला जायला जमू शकतं हे आपल्याला याआधी कसं काय लक्षात आलं नाही?सगळं कसं सहज जुळून आलं ना? यावेळी ही idea नेमकी कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडली माहीत नाही पण आपल्यापैकी कोणीही काहीही सबबी पुढे न करता अगदी मनापासून सगळं काही किती सहजतेने ठरवत गेलो. प्रत्यक्ष निघेपर्यंत कोणी टप्पा तर देणार नाही ना याची धाकधूक तरीही मनात. आणि एकीकडे मन खूप आतूर, उत्सूकही. आपल्या नेहमीच्या रुटीन मधून मुद्दाम घेतलेला, अचानक मिळालेला एक छोटासा ब्रेक किती आणि काय देऊन जातो आपल्याला, नाही? आणि तोही निसर्गाच्या अगदी जवळ नेणारा असेल तर? दोनच दिवस, पण सर्वार्थानं वेगळे. गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातले सुट्टीचे दिवस सोडून कास ट्रीप आपल्याला manage करता आली! तिथला खरा फुलांचा बहार अजून सुरु व्हायचा होता. फुलांचे गालिचे मऊ हिरवळीवर नुकतेच उलगडले असावेत असा अंदाज होता. निघतांना गाडीत पाय ठेवेपर्यंत खूप धावपळ, अनंत सूचना…
पुण्यात भेटायचं असं ठरलेलं, तिथपर्यंतचा प्रवास माझ्या एकटीचा. अनंत मित्रमैत्रिणी आपण जोडतो आयुष्याच्या प्रवासात आपण पण आपले शाळा सोबती, लहानपणापासूनचे जीवलग मित्र मैत्रिणी यांचे स्थान काही वेगळेच. कितीही वेळा आठवल्या तरी न संपणाऱ्या अवीट आठवणी सोबत.
मी तुमच्यापाशी पोहोचताच क्षणी पुढच्या प्रवासाला सुरवात. फोनवरून कितीही बोलत असलो आणि संपर्कात असलो तरी प्रत्यक्ष भेट ती खरी भेट! अखंड बडबड, गप्पा, उत्साह, खाणी, चौकशा यांचा धबधबा सुरु.
कास ला पोहोचता पोहोचता दुपार झालेली. कधी पाऊस तर कधी हलकेसे उन असे वातावरण. मन एकीकडे अधिक तरल, मुक्त.
स्वतःशी देखील संवाद साधू पाहणारे. माझ्या मनातल्या माझ्या जीवलग
सखीने मला साद घातली आणि माझं तिच्याकडे लक्ष वेधलं नाही असं कसं शक्य आहे?
ती आली..हलकेच, हळुवारपणे.
समोरच्या निसर्गाचा हात धरून अलगद उतरली मनाच्या कॅनव्हासवर.
डोंगरमाथ्याकडे वळणाऱ्या रस्त्यावर गाडी आली आणि मनात तिचे बोल उमटले.
माझ्या मनातलं सखीचं अस्तित्व तुम्हा कोणाला जाणवलंही नाही.
आपल्या सगळ्यांच्या अखंड मज्जा, मस्ती, गप्पा मस्करीमधून काही क्षण मी एकटीने माझ्या सखीसोबतही मिळवले.
ते खास क्षण आता तुमच्या सगळ्यांसाठी…!
जगणे सुंदरच असते ! फक्त ते जाणीवेने जगता यायला हवे.
चढ उतार नको म्हणून आपण प्रवास तर टाळू शकत नाही ना?
आयुष्याच्या ह्या प्रवासात काही क्षण shock absorber सारखे असतात.
प्रवासाचा आनंद द्विगुणीत करणारे !
जगणे सुंदर बनवणारे !
-अनन्या.
i how are you