आज कवी मंगेश पाडगावकर यांचे दुख:द निधन झाले. त्यांच्या कविता नेहमीच आपल्या मनात असतील आणि मंगेश पाडगावकर हि. अगदी लहानपणापासून मला कविता आवडायच्या, बालकवींची निर्झरास आणि औदुंबर तर मी पाठच केली होती. पण पहिल्यांदा कविता सोपी आणि जवळची वाटली जेव्हा “बोलगाणी” हातात पडले . सहज सोप्या वाटणारया कविता, परत परत वाचल्या आणि त्या मागे असणार विचार हि कळत गेला. सोपे आणि सहज वाटणारे लिखाण हे सगळ्यात अवघड. शब्दांना बोलके करणारी हि कविता मला भावली आणि पहिल्यांदा मला वाटले कि हे शब्द आपणही गुंफावे कि, बघू आपले शब्द बोलके होतात का.
माझे पहिले स्फूर्तीस्थान म्हणून कवी पाडगावकर यांना माझ्या मनात विशेष स्थान आहे. माझ्या कित्येक पहिल्या वहिल्या कवितांवर वाट त्यांच्या खास शैलीची छाप आहे. त्यांची उंची गाठणे हे अशक्यच आहे. पण तरी जेव्हा माझी बहिण मला म्हणते कि (कधी कधी वैतागून), बोलगाणी सारखी झालीये, किंवा नेहमी सारखीच झालीय (म्हणजे मंगेश पाडगावकर यांचा छाप जाणवतोय), तेव्हा थोडे बरच वाटते.
एक मात्र आहे, कि कविता वाचनाचे एक नव दालन आपल्यासाठी उघडे केले ते बापट, विंदा आणि पाडगावकर यांनी. पुस्तकातली कविता , माणसात आली आणि ओठांवर रुळली. कधी सांगा कसे जगायचे म्हणून जगणे शिकवून गेली, कधी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम अस म्हणत प्रेम करायला तर कधी यात काही पाप नाही म्हणत, आनंद शोधायला शिकवून गेली.
खर तर पाडगावकरनि अनेक प्रकारचे काव्य लिहले, कधी लयबद्ध , तालबद्ध, कधी निसर्गकविता, कधी प्रेमकाव्य तर कधी विडंबन सुद्धा. सिद्धहस्त लेखणीचे ते राजे होते. वयाच्या १४व्या वर्षापासून अव्याहत मांडलेला हा शब्द खेळ ते आज स्वताच अर्ध्यावर टाकून निघून गेले.
मिश्किल हसू चेहऱ्यावर खेळवता खेळवता, जगण्यातल्या आनंद कसा घ्याव्या हे त्यांनी सोपे करून शिकवले. अवघड गोष्ट सोपी वाटावी असे सांगणे हीच तर उत्तम कवित्वाची निशाणी आहे नाही का !!!
त्यांनी बायबलचे भाषांतर केले, सूरदास आणि मीराबाई यांचे लेखन हि मराठीत आणले. काही महिन्या पूर्वीच त्यांनी अनुवादित केलेल्या “महाभारत” चे दोन खंड वाचण्याचा योग आला. एका कवीचे महाकाव्य, अजून एका महाकवीच्या वाणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच.
खर तर किती कवितांबद्दल लिहू तितके थोडेच आहे. पण पाडगावकर हे नेहमीच मनाच्या जास्त जवळ राहतील पहिले स्फूर्तीस्थान म्हणून यात शंकाच नाही. त्यांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे कविता सामान्य लोकांपर्यंत पोचवली. कवी संमेलन, काव्य वाचन हे त्यांनी साहित्यिक, प्रज्ञावान्य अश्या लोकांसाठी आहे हा विचार मोडून काढला. साधी सोपी सहज कविता त्यांनी जनात रुजवली आणि मनात तिचे एक आवड निर्माण केली.
रोजचेच शब्द किती छान , हळुवार रुंजी घालतात तर कधी दाहक बनतात आणि कधी हळवे पण करतात हे पाडगावकरांच्या कवितीत दिसते. खचितच एखाद्या कवीला इतकी लोकप्रियता मिळाली असेल, त्यांच्या पिढीत हि आणि आज हि. पाडगावकर नवल वलय होते पण कवी म्हणून त्यांचा दरारा नव्हता, त्याचे शब्द अगदी आपले वाटायचे आणि म्हणूंनच तेही वाटत असावेत.
तुम्ही लिहले म्हणून शब्द बोलके झाले
तुम्ही लिहिले म्हणून शब्द हि पिसापारी हलके झाले
कविता अगदी रोजची झाली,
धुणे वाळत घालतानाही
अन पसारा आवरताना हि
सांजवेळी पायरीवर हुरहूर लावून गेली
खरच “कविता”, अगदी घरचीच झाली
प्रेम करायला शिकवून गेली
जगायला शिकवून गेली
बोजड शब्दांचे ओझे हलके करून
निसर्गाचे अध्यात्महि शिकवून गेली.
कविते मध्ये बोलता येते
कविते मध्ये गाता येते
कविते मध्ये प्रेमपत्र सुद्धा लिहिता येते
अहो इतकच, तुमचे ते तत्वज्ञान सुद्धा सांगता येते
हे देणे तुम्ही दिलत, आणी आम्हाला कायमचे ऋणी केलत
जगताना मृत्यूला घाबरायचे नसते
आयुष्याचे दान भरभरून घ्यायचे असते
शब्दांच्या या मोहात तुमच्या कवितेने अडकवले
तुमच्या माघारी, या काव्यालाच आम्ही मनात साठवले